पॅरिस : ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारतीय संघ दाखल झाल्यानंतर ऐनवेळेस कोरियन प्रशिक्षकास अधिस्वीकृती नाकारली. या घटनेनंतर संघासाठी एका घटनेत दोषी असलेल्या फिजिओला त्याच्या खर्चाने संघात स्थान दिल्यावरून तिरंदाजी संघाला दुसऱ्या वादाचा सामना करावा लागत आहे.
ऑलिम्पिकसाठी पॅरिसमध्ये दाखल झालेला भारतीय तिरंदाजी संघ प्रशिक्षक वूंग की आणि द्रोणाचार्य पुरस्कार विजेते सर्वोच्च कामगिरी संचालक संजीव सिंग यांच्याशिवाय स्पर्धेच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. या दोघांनाही भारताच्या साहाय्यकांमध्ये स्थान देण्यात आलेले नाही. त्याच वेळी गेल्या वर्षी आयर्लंडमध्ये झालेल्या युवा जागतिक अजिंक्यपद स्पर्धेदरम्यान कॅनडाच्या किशोरवयीन मुलाशी अयोग्य दृष्टिकोन ठेवून वर्तन केल्याचा आरोप असलेल्या फिजिओ अरविंद यादव यांना सामावून घेण्यात आले आहे. भारतीय तिरंदाजी संघटनेच्या (एएआय) एका उच्चपदस्थ अधिकाऱ्यानेच ही माहिती दिली. त्या स्पर्धेत भारताने सहा सुवर्ण, एक रौप्य, चार कांस्यपदकांची कमाई केली होती.
जागतिक तिरंदाजी स्पर्धेचे व्यवस्थापक थॉमस ऑबर्ट यांनी त्या वेळी समाजमाध्यमावरून यादव यांनी कॅनडाच्या मुलाशी अयोग्य वर्तन केल्याची तक्रार केली होती. तेव्हा भारतीय तिरंदाजी महासंघाच्या नैतिकता समितीच्या बैठकीत हे वर्तन सामान्य असल्याचे सांगून फेटाळण्यात आले होते. दरम्यान, अरविंद यादव यांनी हे आपल्याला बदनाम करण्याचे षड्यंत्र असल्याचे सांगितले. “स्पर्धेत असे काहीच घडले नाही आणि घडले होते, तर मग भारतीय महासंघाने माझ्यावर कारवाई का केली नाही. तिरंदाजांनीही माझ्या नियुक्तीवर आक्षेप घेतला असता,” असे यादव म्हणाले.
अरविंदने कायमच मागल्या दाराने भारतीय संघासोबत आपले नाव जोडले आहे. सचिव वीरेंद्र सचदेवा यांच्या जवळचा असल्याने त्याचे नाव सहज समाविष्ट करून घेतले जाते अशी टीका करून या सूत्राने भारतीय तिरंदाजी संघटनेमधील वाद एक प्रकारे समोर आणला. महासंघाचे अध्यक्ष अर्जुन मुंडा यांनीदेखील ऑलिम्पिकच्या तोंडावर नवा वाद उकरून काढू नका, तिरंदाजांनीच आग्रह धरल्याने त्याची निवड केल्याचे सांगितले.
ऑलिम्पिकसाठी भारताची जर्सी तसेच संचलनासाठी विशेष वेशभूषेचे अनावरण करण्यात आले. तसेच गेम्स व्हिलेजमध्ये भारतीय खेळाडूंच्या खोलीबाहेर तिरंगाही फडकावण्यात आला आहे.