Paris Olympic 2024: नेमबाज, कुस्तीपटूंचीच सर्वाधिक चर्चा

यंदा सर्वाधिक लक्ष लागून असेल ते नेमबाजी आणि कुस्तीपटूंच्या कामगिरीकडे. नेमबाजांना गेल्या दोन ऑलिम्पिकमध्ये आलेले अपयश मागे सारण्याचे, तर कुस्तीपटूंना मॅटबाहेरील वातावरणाकडे दुर्लक्ष करून पदक जिंकण्याचे आव्हान असेल.
Paris Olympic 2024: नेमबाज, कुस्तीपटूंचीच सर्वाधिक चर्चा
olympics.com
Published on

पॅरिस ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेला आता अवघ्या एका दिवसाचा अवधी शिल्लक आहे. भारताचे ११७ शिलेदार यंदा पदकांसाठी दावेदारी पेश करणार आहेत. मात्र यंदा सर्वाधिक लक्ष लागून असेल ते नेमबाजी आणि कुस्तीपटूंच्या कामगिरीकडे. नेमबाजांना गेल्या दोन ऑलिम्पिकमध्ये आलेले अपयश मागे सारण्याचे, तर कुस्तीपटूंना मॅटबाहेरील वातावरणाकडे दुर्लक्ष करून पदक जिंकण्याचे आव्हान असेल. त्यामध्ये ते कितपत यशस्वी ठरतात, हे पाहावे लागेल.

नेमबाजांना संघर्ष करावा लागेल : विजय कुमार

पॅरिस : पॅरिस ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत भारतीय नेमबाजांकडून पदकांची अपेक्षा बाळगली जात आहे. मात्र, माझ्या मते भारतीय नेमबाजांना या स्पर्धेत संघर्ष करावा लागू शकेल. त्यांच्या तयारीत नियोजनाचा अभाव होता, असे मत माजी ऑलिम्पिक पदकविजेता नेमबाज विजय कुमारने व्यक्त केले.

विजयने २०१२च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये अनपेक्षित कामगिरी करताना २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल प्रकारात रौप्यपदक पटकावले होते. यंदाच्या ऑलिम्पिकसाठी भारतीय पथकात सर्वाधिक २१ नेमबाजांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे नेमबाजांकडून पदकांची अपेक्षा केली जात आहे. गेल्या ऑलिम्पिकमध्ये भारतीय नेमबाजांनी निराशाजनक कामगिरी केली होती. भारताला नेमबाजीत एकही पदक मिळाले नव्हते. यंदा मात्र हे चित्र बदलेल अशी भारतीयांना आशा आहे. मनू भाकरवर विशेष लक्ष असेल.

“गेल्या सहा महिन्यांत आपल्या नेमबाजांच्या तयारीत नियोजनाचा अभाव होता, असे बाहेरून पाहताना मला जाणवले. ऑलिम्पिकपूर्वी नेमबाजांनी कोणत्या स्पर्धांमध्ये सहभागी झाले पाहिजे, कसा आणि कोणाच्या मार्गदर्शनाखाली सराव केला पाहिजे, याची स्पष्ट कल्पना नेमबाजी महासंघाला असणे गरजेचे आहे. गेल्या सहा महिन्यांत नेमबाजांनी सराव, गरजेचे असल्यास परदेशातील स्पर्धांत सहभाग यावर लक्ष केंद्रीत करणे गरजेचे होते. मात्र, तसे झाल्याचे मला जाणवले नाही,” असे विजय म्हणाला.

दोन वर्षांतील घडामोडींचा कुस्तीवर परिणाम : योगेश्वर

पॅरिस : पॅरिसमध्ये भारतीय संघात महिला कुस्तीगीरांची संख्या अधिक असली, तरी या वेळीही कुस्तीतील ऑलिम्पिक पदकांची मालिका कायम राहील, असा विश्वास लंडन ऑलिम्पिकमधील पदकविजेत्या योगेश्वर दत्तने व्यक्त केला. मात्र त्याच वेळी त्याने बजरंग पुनिया, रवी कुमार असे कुस्तीपटू यंदा नसल्याने अमन सेहरावतवर प्रचंड दडपण असेल, असेही सांगितले.

अमन सेहरावत (५७ किलो वजनी गट) हा एकमेव भारतीय पुरुष मल्ल आगामी ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे. महिला विभागात मात्र ऑलिम्पिकच्या सहा वजनी गटांपैकी पाचमध्ये भारताच्या कुस्तीगीर सहभाग नोंदवणार आहेत. यंदाच्या स्पर्धेत विनेश फोगट (५० किलो), अंतिम पंघाल (५३ किलो), अंशू मलिक (५७ किलो), निशा दहिया (६८ किलो) आणि रीतिका हुडा (७६ किलो) या भारताचे प्रतिनिधित्व करतील. केवळ ६२ किलो वजनी गटात भारताची महिला कुस्तीगीर ऑलिम्पिक पात्रता मिळवू शकली नाही.

“२००८ मध्ये भारताने कुस्तीतील वैयक्तिक पदकांचा दुष्काळ संपवला होता. तेव्हापासून टोक्योपर्यंत प्रत्येक ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने पदक मिळवले आहे. ही मालिका पॅरिसमध्ये कायम राहील असा मला विश्वास आहे,” असे योगेश्वरने सांगितले. तसेच बऱ्याच गोष्टी ‘ड्रॉ’ अर्थात सामने कोणाविरुद्ध होणार यावर अवलंबून असेल असेही योगेश्वरने नमूद केले.

“संघटन पातळीवर झालेल्या तीव्र संघर्षामुळे जवळपास दीड वर्षे भारतातील कुस्ती कार्यक्रम बंद होते. मैदानावर काहीच घडत नव्हते. जे काही चालले होते, ते मैदानाबाहेर सुरू होते आणि ते नक्कीच दुर्दैवी होते. त्यामुळे खेळाच्या विकासावर नक्कीच गंभीर परिणाम झाले आणि याचा फटका भारताला बसायचा तो बसला,” असे योगेश्वर म्हणाला.

“ऑलिम्पिक पात्रता फेरीच्या तयारीसाठीही भारतीय मल्लांना वेळ मिळाला नाही. केवळ एकच पुरुष मल्ल पात्र ठरणे याला शोकांतिकाच म्हणावी लागेल. महिला खेळाडूंनी मात्र मानसिकता कणखर राखली. त्याच भारतासाठी किमान दोन पदके जिंकतील,’’ असे योगेश्वरने सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in