पदकांच्या दशकपूर्तीसाठी..! पॅरिस ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेचा आज शानदार उद्घाटन सोहळा, यंदा भारत किती पदके जिंकणार?

सीन नदीवर शुक्रवारी रात्री पॅरिस ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेचा दिमाखदार उद्घाटन सोहळा पार पडणार आहे.
पदकांच्या दशकपूर्तीसाठी..! पॅरिस ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेचा आज शानदार उद्घाटन सोहळा, यंदा भारत किती पदके जिंकणार?
Published on

पॅरिस : अवघं क्रीडा विश्व ज्या क्षणाची आतुरतेनं वाट पाहत होतं, तो दिवस अखेर उजाडला आहे. सीन नदीवर शुक्रवारी रात्री पॅरिस ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेचा दिमाखदार उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. खेळाच्या या महाकुंभात भारताचे तारे यंदा पदकांचे ऐतिहासिक दशक गाठण्याच्या उद्देशाने सहभागी होणार आहेत. त्यामुळे अपेक्षांचे ओझे यशस्वीपणे पेलून आपल्या खेळाडूंनी पॅरिसवारीत पदकांची लयलूट करावी, हीच आशा कोट्यवधी भारतीय बाळगून आहेत.

२६ जुलैपासून रंगणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये भारताचे ११७ खेळाडू पदकांसाठी दावेदारी सादर करतील. तसेच त्यांच्या सोबतीला १४० जणांचे सहाय्यक प्रशिक्षकांचे पथकही असेल. १९००मध्ये भारत सर्वप्रथम ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाला होता. यंदा भारताचे हे २६वे ऑलिम्पिक असून २०२०च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने विक्रमी ७ पदकांची कमाई केली होती. मात्र यंदा प्रथमच १० पदकांचा आकडा गाठण्याची भारताला सुवर्णसंधी आहे. टेबल टेनिसपटू अचंता शरथ कमल आणि बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू भारताच्या संचलनाचे नेतृत्व करणार आहेत. स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच एखाद्या स्टेडियमवर नव्हे, तर नदीवर ऑलिम्पिकचा उद्घाटन सोहळा होणार असल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

ऑलिम्पिकमध्ये १०, ७१४ खेळाडू सहभागी होणार असून ११ ऑगस्टपर्यंत रंगणाऱ्या या स्पर्धेत ३२ खेळांच्या ३२९ उपप्रकारांचा समावेश आहे. प्रत्येक देशातील काही खेळाडू उद्घाटन समारंभाचा भाग असणार आहेत. हे खेळाडू बोटीतून परेड करतील. ही परेड सहा किमी इतकी लांब असेल जी सीन नदीवर होईल. परेड ऑस्टरलिट्झ ब्रिजपासून सुरू होईल आणि शहराच्या मध्यभागी जाऊन आयफेल टॉवरपर्यंत पोहोचेल. सुमारे ९४ बोटी या परेडचा भाग असतील. ऑलिम्पिकमधील उद्घाटन समारंभासाठी देशांचा क्रम यजमान देशाच्या राष्ट्रीय भाषेच्या अक्षरानुक्रमे ठरवला जातो. ऑलिम्पिक स्पर्धेला १८९६ मध्ये अथेन्स, ग्रीस येथे सर्वप्रथम सुरुवात झाली. हा देश ऑलिम्पिक खेळांचे जन्मस्थान मानला जातो. यामुळे ग्रीसचे खेळाडू आधी संचलन करतात. भारताचे पथक या संचलनात ८४व्या स्थानी येईल.

उद्घाटन समारंभासाठी यजमान देश संचलनात शेवटी असतो. यावेळी फ्रान्सचे खेळाडू यामध्ये सर्वात शेवटी असतील. फ्रान्सच्या आधी पुढच्या ऑलिम्पिकचे म्हणजे २०२८चे यजमानपद मिळवलेला देश म्हणजे अमेरिका असेल.

यांच्याकडून पदकांची सर्वाधिक अपेक्षा

  • ॲथलेटिक्स : नीरज चोप्रा (भालाफेक), अविनाश साबळे (स्टीपलचेस शर्यत), पारूल चौधरी (धावपटू), पुरुषांचा रिले संघ.

  • बॅडमिंटन : पी. व्ही. सिंधू, सात्विकसाइराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी.

  • बॉक्सिंग : निखत झरीन, लवलिना बोर्गोहैन.

  • कुस्ती : विनेश फोगट, अंतिम पंघाल

  • नेमबाजी : मनू भाकर, सिफ्ट कौर सामरा, ऐश्वर्य प्रतापसिंह तोमर, सौरभ चौधरी.

  • टेबल टेनिस : शरथ कमल, मनिका बत्रा

  • हॉकी : भारतीय पुरुष संघ

  • वेटलिफ्टिंग : मीराबाई चानू

भारतीय चमूविषयी महत्त्वाचे

  • खेळाडूंची संख्या२०२०च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे विक्रमी १२१ खेळाडूंचे पथक होते. यंदा ११७ भारतीय खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले असून त्यामध्ये ७० पुरुष व ४७ महिला खेळाडूंचा समावेश आहे.

  • भारताने ७१ खेळाडू प्रथमच ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणार असून ॲथलेटिक्समध्ये सर्वाधिक २९ जणांचा समावेश आहे.

  • भारताचा या ऑलिम्पिकमधील सर्वात वरिष्ठ खेळाडू रोहन बोपण्णा (४४ वर्षे) असून सर्वात युवा खेळाडूचा मान १४ वर्षीय जलतरणपटू दिनीधी देशिंगूला मिळाला आहे.

खेळाडूंची संख्या:

  • ॲथलेटिक्स : २९

  • नेमबाजी : २१

  • हॉकी : १९

  • टेबल टेनिस : ८

  • बॅडमिंटन : ७

  • कुस्ती : ६

  • तिरंदाजी : ६

  • बॉक्सिंग : ६

  • गोल्फ : ४

  • टेनिस : ३

  • जलतरण : २

  • नौकानयन : ३

  • अश्वारोहण : १

  • ज्युडो : १

  • वेटलिफ्टिंग : १

  • एकूण : ११७

logo
marathi.freepressjournal.in