पॅरिस : १९८८पासून सुरू असलेला तिरंदाजीतील पदक दुष्काळ संपुष्टात आणण्याची भारताला ऐतिहासिक संधी होती. मात्र तिरंदाजीतील मिश्र सांघिक प्रकारात भारताच्या धीरज बोम्मदेवरा आणि अंकिता भकत यांना अमेरिकन जोडीकडून पराभव पत्करावा लागला. त्यामुळे भारताचे पदकाचे स्वप्न पुन्हा उद्ध्वस्त झाले. गेल्या ३६ वर्षांत भारताला तिरंदाजीत एकही पदक जिंकता आलेले नाही.
धीरज व अंकिता यांच्या जोडीने दिवसाची धडाक्यात सुरुवात करताना प्रथम इंडोनेशियाला ५-१ अशी धूळ चारली. यामध्ये त्यांनी अनेकदा अचूक १० गुणांवर निशाणा साधला. त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत भारताने स्पेनला ५-३ असे पराभूत केले. येथे भारताने ३८-३७, ३८-३८, ३६-३७, ३७-३६ अशी गुणसंख्या नोंदवली. या विजयासह भारताच्या एखाद्या जोडीने प्रथमच तिरंदाजीतील उपांत्य फेरीत धडक मारण्याचा पराक्रम केला.
सायंकाळी झालेल्या उपांत्य सामन्यात पाचव्या मानांकित भारतासमोर अग्रमानांकित दक्षिण कोरियाचे आव्हान उभे ठाकले. तेथे पहिला सेट जिंकून भारताने एकवेळ सर्व देशवासियांना पदकाचे स्वप्न दाखवले. मात्र कोरियाने त्यानंतर अपेक्षेप्रमाणे पुनरागमन केले. कोरियाने ही लढत ६-२ अशी जिंकून अंतिम फेरीत धडक मारली. त्यांनी भारतावर ३६-३८, ३८-३५, ३८-३७, ३९-३८ अशी सरशी साधली.
या लढतीत पराभूत झाल्यामुळे भारताला कांस्यपदकाच्या लढतीत खेळावे लागले. तेथे तरी आपले तिरंदाज छाप पाडतील, अशी अपेक्षा होती. मात्र अमेरिकेविरुद्ध भारताला फक्त तिसरा सेटच जिंकता आले. अमेरिकेने एकूण ६-२ अशा गुणफलकासह कांस्यपदक मिळवले. त्यांनी ३८-३७, ३७-३५, ३४-३८, ३७-३५ असा भारतावर विजय मिळवला.
आज दीपिका, भजनवर लक्ष
पुरुष एकेरीत भारताचे सर्व तिरदांज पराभूत झालेले असताना महिलांमध्ये दीपिका कुमारी व भजन कौर यांनी उपउपांत्यपूर्व फेरीत (राऊंड ऑफ १६) प्रवेश केला होता. त्यामुळे आता त्यांच्याकडून तिरंदाजीत पदकाची अपेक्षा आहे. शनिवारी दीपिका व भजन आपालल्या लढती खेळणार आहेत.