Paris Olympics 2024: दमदार पुनरागमनासह दीपिका बाद फेरीत

Archer Deepika Kumari: भारताची ३० वर्षीय तिरंदाज दीपिका कुमारीने सांघिक प्रकारातील अपयश बाजूला सारून बुधवारी झोकात पुनरागमन केले. अनुभवी दीपिकाने तिरंदाजीतील महिला एकेरीत उपउपांत्यपूर्व फेरीत (राऊंड ऑफ १६) मजल मारली.
Paris Olympics 2024
PTI
Published on

पॅरिस : भारताची ३० वर्षीय तिरंदाज दीपिका कुमारीने सांघिक प्रकारातील अपयश बाजूला सारून बुधवारी झोकात पुनरागमन केले. अनुभवी दीपिकाने तिरंदाजीतील महिला एकेरीत उपउपांत्यपूर्व फेरीत (राऊंड ऑफ १६) मजल मारली.

महिलांच्या सांघिक विभागातील उपांत्यपूर्व फेरीत भारताला नेदरलँड्सकडून दारुण पराभव पत्करावा लागला होता. त्यावेळी दीपिकाने ४ आणि ६ गुणांवर निशाणा साधल्यामुळे तिला टीकेचा सामना करावा लागला. कारकीर्दीतील तिसरी ऑलिम्पिक स्पर्धा खेळणाऱ्या दीपिकाला अद्याप एकदाही उपांत्यपूर्व फेरीपुढे जाता आलेले नाही. त्याशिवाय १९८८पासून तिरंदाजीचा ऑलिम्पिकमध्ये समावेश होऊनही अद्याप भारताला येथे एकदाही पदक जिंकता आलेले नाही. त्यामुळे किमान एकेरीत भारताला पदकाची अपेक्षा आहे.

दीपिकाने बुधवारी प्रथम राऊंड ऑफ ६४ लढतीत इस्टोनियाच्या रीना पर्नटला ६-५ असे पराभूत केले. दोन सेट गमावूनही दीपिकाने या लढतीत बाजी मारली. मग राऊंड ऑफ ३२ फेरीत दीपिकाने नेदरलँड्सच्या क्विंटी रॉफेनवर ६-२ असे वर्चस्व गाजवले. दीपिकाने फक्त दुसरा सेट गमावला, मात्र पहिल्या, तिसऱ्या व चौथ्या सेटमध्ये तिने अनुक्रमे २९-२८, २५-१७, २८-२३ अशी गुणसंख्या नोंदवून विजय पक्का केला.

दीपिकासमोर शनिवार, ३ ऑगस्ट रोजी जर्मनीच्या मिचेल क्रोपेनचे कडवे आव्हान असेल. तिच्यासह भजन कौरनेसुद्धा आगेकूच केली आहे.

तरुणदीपची झुंज अपयशी

> एकीकडे सर्व काही आलबेल सुरू असताना तिरंदाजीतील पुरुष एकेरीत भारताच्या तरुणदीप रायला पराभवाला सामोरे जावे लागले. रांऊड ऑफ ६४ फेरीत ग्रेट ब्रिटनच्या टॉम हॉलने तरुणदीपला ६-४ असे नमवले.

> उभय खेळाडूंतील पहिला सेट २७-२७ असा बरोबरीत सुटला. मात्र टॉमने दुसरा व चौथा सेट जिंकून गुणसंख्या ५ केली, तर तरुणदीपने दुसऱ्या सेटमध्ये विजय मिळवून गुणसंख्या ३ केली. तिरंदाजीत ज्याचे पहिला ६ गुण होतात, तो जिंकतो. अखेर निर्णायक पाचव्या सेटमध्ये दोघांमध्ये पुन्हा २९-२९ अशी बरोबरी झाली. मात्र टॉमला बरोबरीचा एक गुणही विजयासाठी पुरेसा ठरला, तर तरुणदीपला ४ गुणांवरच समाधान मानावे लागले. मंगळवारी धीरज बोमदेवरासुद्धा काहीशा अंतराने पराभूत झाला.

> आता गुरुवारी प्रवीण जाधव एकेरीतील अभियानाला प्रारंभ करेल. पुरुषांच्या सांघिक प्रकारात भारताला उपांत्यपूर्व फेरीतच पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे आता प्रवीणकडे सर्वांचे लक्ष आहे.

नेदरलँड्सच्या क्विंटीने तिसऱ्या गेममध्ये चक्क डॅशबोर्डच्या बाहेर निशाणा साधला. तिला एकही गुण कमावता आला नाही. समाज माध्यमांवर तिचा डॅशबोर्ड वायरल झाला आहे.

logo
marathi.freepressjournal.in