पहिल्या दिवशीच पदकाचा नेम? १२ वर्षांचा दुष्काळ संपुष्टात आणण्यासाठी भारताचे नेमबाज सज्ज; आज दोन पदकांसाठी दावेदारी

Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या पहिल्या दिवशीच भारताचे तारे पदकाचा नेम साधणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. शनिवारी नेमबाजीत भारताचे खेळाडू पदकासाठी दावेदारी सादर करणार असून नेमबाजीतील गेल्या १२ वर्षांचा ऑलिम्पिक पदकाचा दुष्काळ संपुष्टात आणण्याचे त्यांच्यापुढे लक्ष्य असेल.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्रपीटीआय
Published on

चॅटेरोक्स (फ्रान्स) : पॅरिस ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या पहिल्या दिवशीच भारताचे तारे पदकाचा नेम साधणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. शनिवारी नेमबाजीत भारताचे खेळाडू पदकासाठी दावेदारी सादर करणार असून नेमबाजीतील गेल्या १२ वर्षांचा ऑलिम्पिक पदकाचा दुष्काळ संपुष्टात आणण्याचे त्यांच्यापुढे लक्ष्य असेल. चॅटेरोक्सच्या राष्ट्रीय केंद्रावर शनिवारपासून नेमबाजीच्या फेऱ्यांना प्रारंभ होणार आहे.

२०१२मध्ये लंडनला झालेल्या ऑलिम्पिकमध्ये भारताच्या विजय कुमारने नेमबाजीतील २५ मीटर रॅपिड फायर प्रकारात रौप्यपदक जिंकले होते. त्यानंतर २०१६ व २०२०च्या ऑलिम्पिकमध्ये भारतीय नेमबाजांच्या पदरी निराशा पडली. विशेषत: गेल्या ऑलिम्पिकमध्ये भारताच्या एकाही स्पर्धकाला अंतिम फेरीसुद्धा गाठता आली नव्हती. त्यामुळे हे अपयश बाजूला सारून आता राष्ट्रकुल व आशियाई स्पर्धेत चमक दाखवल्यावर भारताचे नेमबाज ऑलिम्पिकमध्ये यश मिळवण्यास आतुर असतील. त्यातच यंदा नेमबाजीत भारताचे २१ खेळाडू ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले असल्याने त्यांच्यावर दडपणही असेल. २०२०मध्ये भारताचे १५ नेमबाज पात्र ठरले होते.

महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारातील पात्रता फेरीत २२ वर्षीय मनू भाकर, रिदम सांगवान या दोघी भारताचे प्रतिनिधित्व करतील. मनूची ही दुसरी ऑलिम्पिक स्पर्धा आहे, तर रिदम प्रथमच कुंभमेळ्यात सहभागी होत आहे. गतवेळेस बंदुकीतील बिघाडाचा मनूला फटका बसला होता. शनिवारी त्यांनी पात्रता फेरीत अव्वल ८ जणांत स्थान मिळवले, तर रविवारी ते पदकासाठी अंतिम फेरीत खेळतील. त्याचप्रमाणे पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात अर्जुन चीमा आणि सरबजोत सिंगसुद्धा पात्रता फेरीत खेळणार आहेत.

पदकाचा विचार करता १० मीटर एअर रायफल मिश्र सांघिक प्रकारात भारताला दोन पदके जिंकण्याची संधी आहे. संदीप सिंग-इलाव्हेनिल वलारिवन आणि अर्जुन बबुता-रमिता जिंदाल या भारतीय जोड्या पदकावर नेम साधण्यास आतुर असतील. शनिवारी दुपारीच कांस्य व सुवर्णपदकाची लढत रंगणार आहे. भारताने यावेळी नेमबाजीतील १५ उपप्रकारांसाठी एक स्पर्धक पाठवला असल्याने २-३ पदके अपेक्षित आहेत.

ऑलिम्पिकसाठी भारताचे २१ नेमबाज यंदा पात्र ठरले आहेत. इतिहासात प्रथमच भारताचे इतके नेमबाज ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाले आहेत, हे विशेष.

logo
marathi.freepressjournal.in