Paris Olympics 2024: महाराष्ट्राच्या लेकाची विजयी 'दौड'! आज फायनलमध्ये अविनाश साबळेची पदकासाठी दावेदारी

Avinash Sable: बीडचा २९ वर्षीय स्टीपलचेसपटू अविनाश साबळेने सोमवारी मध्यरात्री पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी नोंदवली.
Paris Olympics 2024: महाराष्ट्राच्या लेकाची विजयी 'दौड'! आज फायनलमध्ये अविनाश साबळेची पदकासाठी दावेदारी
PTI
Published on

पॅरिस : बीडचा २९ वर्षीय स्टीपलचेसपटू अविनाश साबळेने सोमवारी मध्यरात्री पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी नोंदवली. पुरुषांच्या ३००० मीटर स्टीपलचेस शर्यतीची अंतिम फेरी गाठणारा पहिला भारतीय ठरण्याचा मान अविनाशने मिळवला. आता बुधवारी मध्यरात्री अविनाश पदकासाठी दौड घेईल. भारतीय वेळेनुसार रात्री १ वाजता अविनाशची अंतिम फेरी सुरू होईल.

महाराष्ट्राच्या अविनाशने पात्रता फेरीच्या दुसऱ्या गटात पाचवे स्थान मिळवताना ८ मिनिटे १५.४३ सेकंद अशी वेळ नोंदवली. तीन गटांतील आघाडीचे पाच धावपटू अंतिम फेरीसाठी पात्र ठरले आहेत. अविनाशने गेल्या महिन्यात पॅरिस डायमंड लीगमध्ये ८ मिनिटे ९.४१ सेकंद अशी वेळ नोंदवली होती. त्यापासून तो प्राथमिक फेरीत बराच दूर राहिला. मात्र आता अंतिम फेरीत अविनाश पुन्हा वेग वाढवून अव्वल तिघांत येईल, अशी अपेक्षा आहे. पात्रता फेरीत मोरोक्कोच्या मोहम्मदने ८ मिनिटे १०.६२ सेकंदासह अग्रस्थान मिळवले.

दरम्यान, अविनाशने आतापर्यंत राष्ट्रकुल, आशियाई स्पर्धेत चमकदार कामगिरी नोंदवली आहे. आता तो अंतिम फेरीत छाप पाडण्याची अपेक्षा आहे.

महिलांमध्ये किरण सहाव्या स्थानी

महिलांच्या ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत रेपेचेज राऊंडमध्येही भारताच्या किरण पहलने निराशा केली. किरणला ५२.५९ सेकंदाच्या वेळेसह सहाव्या स्थानी समाधान मानावे लागले. त्यामुळे तिला उपांत्य फेरी गाठण्यात अपयश आले. सोमवारी मुख्य पात्रता फेरीत किरण ५२.५१ सेकंदासह सातव्या स्थानी राहिली होती. त्यामुळे तिला रेपेचेज फेरीद्वारे पुन्हा उपांत्य फेरी गाठण्याची संधी होती. मात्र २४ वर्षीय किरणला आगेकूच करता आली नाही.

logo
marathi.freepressjournal.in