चेटेरॉक्स (फ्रान्स) : प्रतिभावान २२ वर्षीय नेमबाज मनू भाकरने रविवारी कोट्यवधी भारतीयांची मने जिंकली. पॅरिस ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत तिने भारताचे पदकांचे खाते उघडतानाच ऐतिहासिक कांस्यकिमया साधली. देशासाठी ऑलिम्पिक पदक जिंकणारी ती पहिलीच महिला नेमबाज ठरली आहे. त्यामुळे संपूर्ण देशात सध्या ‘मनू की बात’ सुरू आहे.
चेटेरॉक्स येथील राष्ट्रीय नेमबाजी केंद्रात महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकाराच्या अंतिम फेरीत मनूने तिसरे स्थान प्राप्त केले. हरयाणाच्या मनूने २२१.७ गुण कमावले. दक्षिण कोरियाची जिन ये (२४३.२) आणि किम येजी (२४१.३) या दोघी अनुक्रमे सुवर्ण व रौप्य पदकाच्या मानकरी ठरल्या. मनूच्या ऐतिहासिक पराक्रमामुळे नेमबाजीतील भारताचा पदकदुष्काळ संपुष्टात आला. २०१२नंतर प्रथमच भारताच्या नेमबाजाने ऑलिम्पिकमध्ये पदक पटकावले.
या पराक्रमांची मनू मानकरी
-मनूने भारतीय नेमबाजांचा १२ वर्षांपासूनचा ऑलिम्पिकमधील पदकांचा दुष्काळ संपुष्टात आणला. यापूर्वी २०१२च्या ऑलिम्पिकमध्ये विजय कुमारने नेमबाजीत भारतासाठी पदक जिंकले होते.
-१० मीटर पिस्तूल प्रकारात अंतिम फेरी गाठणारी मनू भारताची पहिलीच महिला नेमबाज ठरली होती. यापूर्वी २००४मध्ये सुमा शिरूरने १० मीटर रायफल प्रकारात अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. मात्र तिला पदक जिंकण्यात अपयश आले.
-मनू ही भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी एकूण पाचवी नेमबाज ठरली. यापूर्वी राज्यवर्धनसिंग राठोड (२००४, रौप्य), अभिनव बिंद्रा (२००८, सुवर्ण), विजय कुमार (२०१२, रौप्य), गगन नारंग (२०१२, कांस्य) या नेमबाजांनी भारतासाठी ऑलिम्पिक पदक प्राप्त केले होते.
गेल्या ऑलिम्पिकमध्ये मला पात्रता फेरीतच निराशेला सामोरे जावे लागले. त्यातून सावरण्यासाठी मला फार वेळ लागला. मात्र या पदकामुळे त्या कटू आठवणी पुसल्या गेल्या आहेत. अंतिम फेरीत दडपणाच्या स्थितीत भगवत गीता वाचल्याचा मला लाभ झाला. श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितल्याप्रमाणे मी निकालाचा विचार न करता फक्त माझ्या कामावर लक्ष केंद्रित केले. त्यामुळेच संयम बाळगून पदकाचा वेध साधू शकले. - मनू भाकर