Swapnil Kusale: स्वप्निलच्या जयघोषाने कोल्हापूर दुमदुमले ऑलिम्पिक पदकविजेत्या खेळाडूच्या स्वागतासाठी फटाक्यांची आतषबाजी

Kolhapur: प्रचंड उत्साहात तसेच जल्लोषात ऑलिम्पिक स्पर्धेत भारतासाठी कांस्यपदक जिंकणारा नेमबाज आणि कोल्हापूरचा सुपुत्र स्वप्निल कुसळेचे कोल्हापूरात स्वागत झाले.
Swapnil Kusale: स्वप्निलच्या जयघोषाने कोल्हापूर दुमदुमले ऑलिम्पिक पदकविजेत्या खेळाडूच्या स्वागतासाठी फटाक्यांची आतषबाजी
Published on

कोल्हापूर : ढोल-ताशांचा गजर, हलगीचा निनाद, हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी, मिरवणुक मार्गावरील रांगोळ्या, सजवलेल्या घोड्यावरून पारंपरिक वेशभूषा परिधान केलेल्या महिला... अशा प्रचंड उत्साहात तसेच जल्लोषात ऑलिम्पिक स्पर्धेत भारतासाठी कांस्यपदक जिंकणारा नेमबाज आणि कोल्हापूरचा सुपुत्र स्वप्निल कुसळेचे कोल्हापूरात स्वागत झाले.

यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ, लोकप्रतिनिधी व जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्याचे स्वागत केले. कोल्हापुरात जिल्हा प्रशासनाच्या वतीने स्वप्निलला चांदीची गदा, सन्मानचिन्ह, मानपत्र देऊन भव्य सत्कार करण्यात आला..

ताराराणी चौकात आल्यावर सर्वप्रथम स्वप्निलने महाराणी ताराराणी यांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यानंतर मिरवणुकीला सुरुवात झाली. ताराराणी चौकातून सुरू झालेली मिरवणूक मध्यवर्ती बसस्थानक-व्हीनस कॉर्नर मार्गे-दसरा चौकात मार्गक्रमण झाली. ढोल -ताशांचा गजर व हलगीच्या निनादाने वातावरण यांना दुमदुमून गेले. सजवलेल्या घोड्यावरुन पारंपरिक वेशभूषा परिधान केलेल्या महिला, हातात फुलांच्या पाकळ्या घेऊन उभे राहिलेले विद्यार्थी, हेलिकॉप्टरमधून होणाऱ्या पुष्पवृष्टीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. प्रचंड उत्साहाने केलेल्या स्वागताने स्वप्निल भारावून गेला. आपल्या मातीत झालेल्या सन्मानाचा आनंद त्याच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता.

व्हीनस कॉर्नर येथे मिरवणूक आल्यानंतर स्वप्नीलने छत्रपती राजाराम महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यानंतर मिरवणूक दसरा चौकात आल्यावर राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याला स्वप्निलने पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. तसेच राष्ट्रध्वज लपेटून उपस्थितांना वंदन केले, यावेळी उपस्थितांनी प्रचंड जल्लोष करत टाळ्या, शिट्ट्या व घोषणांनी त्याला दाद दिली.

ढोल-ताशांचा गजर, हलगीचा निनाद आणि हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी

कुटुंबियांसह रथातून मिरवणूक

झेंडूच्या फुलांच्या माळांनी अत्यंत आकर्षक पद्धतीने सजवलेल्या वन विभागाच्या वाहनातून स्वप्निलची मिरवणूक काढण्यात आली. या वाहनात स्वप्निलची आई अनिता, वडील सुरेश यांच्यासह कुटुंबीय व प्रशिक्षकही होते. मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी स्वागत कमानी व स्वप्निलचे कटआऊट्स लावण्यात आले होते.

logo
marathi.freepressjournal.in