Paris Olympics 2024: टेबल टेनिसमध्ये पुरुष संघ सलामीलाच पराभूत
AFP

Paris Olympics 2024: टेबल टेनिसमध्ये पुरुष संघ सलामीलाच पराभूत

टेबल टेनिसमध्ये भारतीय पुरुष संघाला चीनविरुद्ध उपउपांत्यपूर्व फेरीत पराभव पत्करावा लागला. त्यामुळे त्यांचे आव्हान सलामीलाच संपुष्टात आले.
Published on

पॅरिस : टेबल टेनिसमध्ये भारतीय पुरुष संघाला चीनविरुद्ध उपउपांत्यपूर्व फेरीत पराभव पत्करावा लागला. त्यामुळे त्यांचे आव्हान सलामीलाच संपुष्टात आले.

अचंता शरथ कमल, हरमीत देसाई, मानव ठक्कर यांचा समावेश असलेल्या भारतीय पुरुष संघाकडून चीनविरुद्ध प्रतिकार अपेक्षित होता. मात्र अनुभवी कमलव्यतिरिक्त कोणीही फारशी झुंज देऊ शकले नाही. चीनने भारताला ३-० अशी धूळ चारली. दुहेरीच्या पहिल्या लढतीत मा लाँग व चेक वांगने हरमीत-मानव यांना ११-२, ११-३, ११-७ असे नामोहरम केले. मग एकेरीच्या लढतीत शरथने पहिला गेम जिंकला मात्र फॅन झेंगडोंगने नंतर ११-७, ११-७, ११-५ अशी सरशी साधली. तिसऱ्या लढतीत चेक वांगने मानववर ११-९, ११-६, ११-९ अशी मात करून भारताचा पराभव पक्का केला. पुरुषांच्या पराभवामुळे आता फक्त महिला संघावर भारताच्या आशा टिकून आहेत.

मनिका बत्रा, श्रीजा अकुला व अर्चना कामत यांचा समावेश असलेल्या महिला संघाने सोमवारी उपउपांत्यपूर्व फेरीत रोमानियाला धूळ चारली. आता बुधवारी उपांत्यपूर्व लढतीत त्यांच्यासमोर जर्मनीचे आव्हान असेल. पुरुष व महिला खेळाडूंनी एकेरीत मात्र निराशा केली. मनिका, श्रीजा यांना उपांत्यपूर्व फेरीपुढे आगेकूच करता आली नाही. तर शरथ व हरमीत यांना गाशा गुंडाळावा लागला होता.

logo
marathi.freepressjournal.in