कोल्हापूरचा स्वप्निल जगात भारी! ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूला तब्बल ७२ वर्षांनी पदक

कोल्हापूरचा नेमबाज स्वप्निल कुसळेने अखेर गुरुवारी इतिहास रचला. पॅरिस ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत या मराठमोळ्या पठ्ठ्याने ऐतिहासिक कांस्यपदकावर वेध साधला.
कोल्हापूरचा स्वप्निल जगात भारी! ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूला तब्बल ७२ वर्षांनी पदक
Published on

पॅरिस : कोल्हापूरचा नेमबाज स्वप्निल कुसळेने अखेर गुरुवारी इतिहास रचला. पॅरिस ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत या मराठमोळ्या पठ्ठ्याने ऐतिहासिक कांस्यपदकावर वेध साधला. पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन्स प्रकारात ही कामगिरी नोंदवून स्वप्निलने भारतासाठी यंदाच्या ऑलिम्पिकमधील तिसऱ्या पदकाची कमाई केली. मुख्य म्हणजे तब्बल ७२ वर्षांनी प्रथमच महाराष्ट्राच्या खेळाडूने ऑलिम्पिक पदक पटकावण्याचा पराक्रम केला आहे. यापूर्वी १९५२मध्ये महाराष्ट्राचे कुस्तीपटू खाशाबा जाधव कांस्यपदकाचे मानकरी ठरले होते.

मध्य रेल्वेत तिकीट तपासणीस म्हणून कार्यरत असलेल्या २८ वर्षीय स्वप्निलने आठ जणांच्या अंतिम फेरीत ४५१.४ गुणांसह तिसरे स्थान मिळवले. चेटेरॉक्स राष्ट्रीय नेमबाजी केंद्रात झालेल्या या अंतिम फेरीत सहाव्या फेरीपर्यंत स्वप्निल पाचव्या स्थानी होता. त्यामुळे भारताला पदकाची हुलकावणी मिळणार, असे वाटत होते. मात्र त्यानंतर स्वप्निलने कामगिरी उंचावली व पदकावर अचूक निशाणा लगावला. भारतासाठी हे यंदाच्या ऑलिम्पिकमधील नेमबाजीतीलसुद्धा तिसरे पदक ठरले.

भारताचा माजी क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनीला आदर्श मानणाऱ्या स्वप्निलने यापूर्वी जागतिक स्पर्धेत कांस्य, तर आशियाई स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाईसुद्धा केली आहे. मात्र त्याच्या ऑलिम्पिकमधील कामगिरीने महाराष्ट्रासह भारताचेही नाव अधिक उज्ज्वल झाले आहे. स्वप्निलचे वडील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक आहेत, तर त्याची आई सरपंच आहे. दीपाली देशपांडे यांच्या मार्गदर्शनाने स्वप्निलच्या कारकीर्दीत मोलाची भूमिका बजावली. कोल्हापूरच्या कांबळवाडीतून सुरू झालेल्या स्वप्निलचा प्रवास आता खऱ्या अर्थाने वेगळ्या उंचीवर पोहोचला असून त्याच्यावर देशभरातून स्तुतिसुमनांची उधळण करण्यात येत आहे.

महाराष्ट्र शासनाकडून १ कोटीचे पारितोषिक

कोल्हापूरच्या स्वप्निलचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही कौतुक केले असून त्याला राज्य शासनाकडून १ कोटी रुपयांचे पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. शिंदे यांनी स्वप्निलच्या कुटुंबीयांशी दूरध्वनीद्वारे संवाद साधून त्यांचे अभिनंदन केले. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनीही कुसळे कुटुंबाशी संवाद साधला. त्याशिवाय कोल्हापूरचे पालक मंत्री हसन मुश्रीफ यांनी स्वप्निलची मायदेशी परतल्यावर कोल्हापूरमध्ये जंगी मिरवणूक काढण्यात येईल, असे सांगितले.

- ऑलिम्पिकच्या इतिहासात प्रथमच भारताने नेमबाजीतील ५० मीटर रायफल थ्री प्रकारात पदक जिंकले. यापूर्वी २०१२मध्ये जॉयदीप कर्माकरने या प्रकाराची फक्त अंतिम फेरी गाठली होती. मात्र त्याला पदक जिंकण्यात अपयश आले.

- भारतासाठी नेमबाजीतील हे एकूण सातवे ऑलिम्पिक पदक ठरले. यापूर्वी राज्यवर्धनसिंग राठोड (२००४, रौप्य), अभिनव बिंद्रा (२००८, सुवर्ण), विजय कुमार (२०१२, रौप्य), गगन नारंग (२०१२, कांस्य), मनू भाकर (२०२४, कांस्य), मनू-सरबजोत सिंग (२०२४, कांस्य) या नेमबाजांनी पदक प्राप्त केले होते.

logo
marathi.freepressjournal.in