पॅरिस : भारताचा यंदाच्या ऑलिम्पिकमधील सर्वाधिक वरिष्ठ खेळाडू रोहन बोपण्णा आणि त्याचा साथीदार एन. श्रीराम बालाजी ही जोडी शनिवारी टेनिसच्या पुरुष दुहेरीत पहिला सामना खेळतील. त्यांच्यासमोर रॉजर वॅसेलिन आणि फॅबियन रिबोल या फ्रान्सच्या जोडीचे आव्हान असेल.
४४ वर्षीय बोपण्णाने वर्षाच्या सुरुवातीला विदेशी सहकारीच्या साथीने ऑस्ट्रेलियन ओपन या ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेतील पुरुष दुहेरीचे जेतेपद मिळवले होते. तर ३४ वर्षीय बालाजी प्रथमच ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे. भारताने १९९६मध्ये टेनिसमध्ये एकमेव ऑलिम्पिक पदक जिंकले होते. त्यावेळी लिएंडर पेसने कांस्यपदक पटकावले होते. २००४ व २००८मध्ये पेस-महेश भूपती यांच्या जोडीला पदक जिंकता आले नाही. तसेच २०१२मध्ये बोपण्णा-भूपतीच्या पदरीही निराशा पडली. २०१६मध्ये मग बोपण्णा-पेस एकत्रित खेळूनही भारताला पदक मिळवण्यात अपयश आले. २०२०मध्ये बोपण्णा मिश्र दुहेरीत सानिया मिर्झाच्या साथीने सहभागी झाला. मात्र तरीही त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.
यंदा बोपण्णा बालाजीच्या साथीने कमाल करणार का, हे पाहणे रंजक ठरेल. टेनिसमध्ये बाद झालेला खेळाडू थेट स्पर्धेबाहेर जाणार असल्याने प्रत्येक लढत महत्त्वाची असेल. त्याशिवाय पुरुष एकेरीत सुमित नागल भारताकडून खेळणार आहे.