Vinesh Phogat : ऑलिम्पिकमध्ये अपात्र ठरल्यानंतर विनेश फोगाट पडली बेशुद्ध, थेट रुग्णालयात करावं लागलं दाखल

विनेश फोगाटचं ऑलिम्पिक पदक विजयाचं स्वप्न भंगलं. इतक्या जवळ येऊन पदक जिंकण्याचं स्वप्न अपुरं राहिल्यानं विनेश चक्कर येऊन बेशुद्ध पडल्याची माहिती मिळत आहे.
Vinesh Phogat
ऑलिम्पिकमध्ये अपात्र ठरल्यानंतर विनेश फोगाट पडली बेशुद्धCanva
Published on

भारताची महिला पैलवान विनेश फोगाट पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला कुस्तीच्या ५० किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत पोहोचली होती. मात्र अंतिम फेरीपूर्वी, आज सकाळी वजन केले असता केवळ काही ग्रॅम वजन जास्त असल्याने तिला अपात्र ठरवण्यात आलं. यामुळे विनेश फोगाटच्या ऑलिम्पिक पदक विजयाचं स्वप्न भंगलं. इतक्या जवळ येऊन पदक जिंकण्याचं स्वप्न अपुरं राहिल्यानं विनेश फोगाट चक्कर येऊन बेशुद्ध पडल्याची माहिती मिळत आहे. विनेशला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून सध्या तिची प्रकृती स्थिर असल्याचं कळतंय.

विनेश कशी ठरली अपात्र :

अंतिम फेरीपूर्वी सकाळी विनेश फोगाटला तिच्या वजनामुळे अपात्र ठरवण्यात आलं होतं. विनेश ५० किलो वजनी गटातून कुस्ती स्पर्धा खेळत होती. तेव्हा या गटात सहभागी असणाऱ्या स्पर्धकांचे वजन ५० किलो असणं गरजेचं असतं. परंतु, अंतिम फेरीपूर्वी करण्यात आलेल्या वजनात विनेशचं वजन हे १०० ते १५० ग्रॅम जास्त असल्याचं आढळलं. त्यामुळे समितीने विनेशला अंतिम फेरीपूर्वी अपात्र ठरवलं. इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनने विनेश फोगाटला अपात्र ठरवण्यात आल्याच्या माहितीला दुजोरा दिलेला आहे.

विनेश कशामुळे पडली बेशुद्ध?

ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीपूर्वी अपात्र ठरल्यावर विनेश डिहायड्रेशनमुळे बेशुद्ध पडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. बेशुद्ध पडल्यावर विनेशला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. विनेश फोगाट ही खरंतर ५३ किलो वजनी गटाची पैलवान आहे, मात्र ऑलिम्पिकसाठी तिने ३ किलो वजन कमी केलं होतं. यानंतर ती ५० किलो वजनी गटात खेळण्यासाठी उतरली. मंगळवारी उपांत्य आणि उपांत्यपूर्वी खेळी दरम्यान तिचं वजन हे ५० किलो इतकंच होतं मात्र मंगळवारी रात्री तिचं वजन ५२ किलो झालं. अंतिम फेरीपूर्वी वजन कमी करण्यासाठी विनेश अख्खी रात्र झोपली नाही तिने सायकलिंग, जॉगिंग इत्यादी सर्वकाही करून वजन कमी करण्याचा प्रयत्न केला. मात्र अखेर बुधवारी सकाळी तपासण्यात आलेल्या वजनात विनेशचं वजन हे अपेक्षेपेक्षा १०० ते १५० ग्रॅम जास्त होतं.

टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या स्पर्धकाला चारली होती धूळ :

मंगळवारी महिलांच्या ५० किलो वजनी गटात विनेशने पहिल्याच फेरीत टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेती तसेज जगज्जेती आणि जपानची अग्रमानांकित युई सुसाकीला धूळ चारली. त्यानंतर उपांत्यपूर्व आणि उपांत्य फेरीतही विनेशने धडाकेबाज विजयाची नोंद करताना थाटात अंतिम फेरीत धडक मारली होती.

logo
marathi.freepressjournal.in