नवी दिल्ली : २२ वर्षीय नेमबाज आणि पॅरिस ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेता सरबज्योत सिंग याने सरकारी नोकरी नाकारली आहे. हरयाणा सरकारने त्याला क्रीडा विभागात उपसंचालकपदाची नोकरी देण्याचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र त्याने ही ऑफर नाकारली. त्याने नोकरीऐवजी आपल्या नेमबाजीवरच अधिक लक्ष केंद्रित करण्याचा निर्धार केला आहे.
“नोकरीचा प्रस्ताव खूप चांगला होता, पण सद्यस्थितीत मी नोकरीचा फारसा विचार करत नाही. मला सध्या नेमबाजी हेच माझे पहिले प्रेम आहे. माझ्या कुटुंबियांनी मला चांगली नोकरी पकडून स्थिरस्थावर होण्याचा दबाव टाकला होता. पण मी नेमबाजीची निवड केली. माझे खेळावरील लक्ष विचलित होऊ नये, यासाठी मी अन्य काही गोष्टी टाळत आहे. त्यामुळेच मी नोकरीचा विचार सध्या करू शकत नाही,” असे सरबज्योतने सांगितले.
सरबज्योतने मनू भाकर हिच्या साथीने १० मीटर एअर पिस्तूल सांघिक मिश्र प्रकारात कांस्यपदकाची कमाई केली आहे. पुरुषांच्या १० मीटर एअर रायफल पिस्तूल वैयक्तिक प्रकारात मात्र त्याला अंतिम फेरी गाठण्यात अपयश आले होते. त्याला पात्रता फेरीत नवव्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. सरबज्योतने अशीच कामगिरी सुरू ठेवली तर त्याला २०२८च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिक स्पर्धेतही पदक मिळवण्याची संधी मिळू शकते. क्रीडा मंत्रालयाकडून पुरस्कार स्वीकारल्यानतंर त्याचे हरयाणातील अम्बाला जिल्ह्यातील धीन गावात जल्लोषात स्वागत करण्यात आले.