पार्थिव पटेलची माघार; निवड समितीच्या पदासाठी अर्ज करण्यास नकार, प्रज्ञान ओझा अध्यक्षपदी कायम राहण्याची शक्यता

बीसीसीआयच्या वरिष्ठ पुरुष निवड समितीमधील पश्चिम विभागाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी माजी यष्टीरक्षक पार्थिव पटेल यांच्या नावावर बरीच चर्चा होती, परंतु त्यांनी या पदासाठी अर्ज न केल्याचे समोर आले आहे.
पार्थिव पटेलची माघार; निवड समितीच्या पदासाठी अर्ज करण्यास नकार, प्रज्ञान ओझा अध्यक्षपदी कायम राहण्याची शक्यता
पार्थिव पटेलची माघार; निवड समितीच्या पदासाठी अर्ज करण्यास नकार, प्रज्ञान ओझा अध्यक्षपदी कायम राहण्याची शक्यता
Published on: 

नवी दिल्ली : बीसीसीआयच्या वरिष्ठ पुरुष निवड समितीमधील पश्चिम विभागाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी माजी यष्टीरक्षक पार्थिव पटेल यांच्या नावावर बरीच चर्चा होती, परंतु त्यांनी या पदासाठी अर्ज न केल्याचे समोर आले आहे. यामुळे प्रज्ञान ओझा यांना त्यांच्या उर्वरित कार्यकाळात समितीचे अध्यक्ष म्हणून कायम राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

अजित आगरकर यांच्यानंतर पश्चिम विभागातील रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत बुधवारी संपली, परंतु पार्थिव यांनी या निवड प्रक्रियेपासून लांब राहणे पसंत केले.

बीसीसीआयच्या एका सूत्राने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर पीटीआयला सांगितले, की १४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत पार्थिवने अर्ज केलेला नव्हता. बीसीसीआयने अर्ज करण्याची मुदत वाढवली किंवा पार्थिवने आपला निर्णय बदलला, तर परिस्थितीत बदल होऊ शकतो.

दक्षिण विभागाचे प्रतिनिधित्व करणारे ओझा हे विद्यमान निवडकर्त्यांमध्ये सर्वाधिक कसोटी सामने खेळल्यामुळे अध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये आघाडीवर आहेत. दरम्यान, ज्युनियर पुरुष निवड समितीचे अध्यक्ष बनतील, अशी अपेक्षा असलेले रमेश पावार आता पश्चिम विभागातून वरिष्ठ निवडकर्त्याच्या पदासाठी प्रबळ दावेदार म्हणून पुढे येऊ शकतात. तसेच माजी यष्टीरक्षक समीर दिघे यांचे नाव देखील चर्चेत असून, या दोघांनीही मागील वेळी अर्ज केले होते.

सद्यस्थितीत, पार्थिव पटेल यांनी अर्ज न केल्यास पश्चिम विभागातून प्रमुख पात्र उमेदवारांचा पर्याय मर्यादित असल्याचे दिसत आहे. सध्याच्या परिस्थितीनुसार पार्थिव हे वरिष्ठ निवड समितीची धुरा सांभाळण्याऐवजी गुजरात टायटन्सच्या कोचिंग स्टाफ आणि आपल्या समालोचनाच्या कामातच व्यस्त राहण्याची शक्यता अधिक आहे.

प्रज्ञान ओझा यांच्या उमेदवारीला बळ

वरिष्ठ निवड समितीतील दक्षिण विभागाचे प्रतिनिधी असलेले प्रज्ञान ओझा अध्यक्षपदी कायम राहण्याची शक्यता आहे. सध्या समितीत असलेल्या निवडकर्त्यांमध्ये त्यांच्या नावावर सर्वाधिक कसोटी सामने असल्याने त्यांच्या उमेदवारीला बळ मिळत असल्याचे वृत्तात म्हटले आहे.

पश्चिम विभागातून रमेश पोवार यांचे नाव चर्चेत

भारताचा माजी फिरकी गोलंदाज रमेश पोवार याची कनिष्ठ पुरुष निवड समितीच्या अध्यक्षपदासाठी निवड होण्याची अपेक्षा होती. मात्र, आता पश्चिम विभागातून वरिष्ठ निवड समितीच्या निवडकर्तेपदासाठी त्याचे नाव चर्चेत येऊ शकते. भारताचा माजी यष्टिरक्षक समीर दिघे याचे नावही या पदासाठी चर्चेत आहे. यापूर्वी निवडकर्त्यांच्या पदांसाठी अर्ज मागवण्यात आले होते, तेव्हा पोवार आणि दिघे या दोघांनीही अर्ज केले होते.

...तर समीकरणे बदलणार

पश्चिम विभागातून वरिष्ठ निवड समितीतील पदासाठी पात्र आणि प्रमुख उमेदवारांची संख्या मर्यादित असल्याचे मानले जात आहे. बीसीसीआयने अर्जाची मुदत वाढवून पार्थिव पटेलला संधी दिल्यास मात्र समीकरणे बदलू शकतात. सध्याच्या परिस्थितीत पार्थिव पटेल गुजरात टायटन्सच्या प्रशिक्षकवर्गातील आपली भूमिका आणि समालोचनाची बांधिलकी कायम ठेवण्याची शक्यता आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in