इंग्रजी परीक्षेत उत्तीर्ण; आता ऑस्ट्रेलियन टेस्ट भारतीय महिला संघाची वानखेडेवर आजपासून कसोटी

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर गुरुवारपासून भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकमेव कसोटीला प्रारंभ होणार असून या लढतीसाठी प्रेक्षकांना मोफत प्रवेश देण्यात येणार आहे.
इंग्रजी परीक्षेत उत्तीर्ण; आता ऑस्ट्रेलियन टेस्ट
भारतीय महिला संघाची वानखेडेवर आजपासून कसोटी
PM

मुंबई : हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय महिला संघाने काही दिवसांपूर्वीच इंग्लंडचा एकमेव कसोटी सामन्यात तब्बल ३४७ धावांनी धुव्वा उडवला. त्यामुळे आता इंग्रजी परीक्षेत उत्तीर्ण झाल्यावर भारतीय महिला ‘ऑस्ट्रेलियन टेस्ट’मध्ये कशी कामगिरी करतात, हे पाहणे रंजक ठरेल. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर गुरुवारपासून भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकमेव कसोटीला प्रारंभ होणार असून या लढतीसाठी प्रेक्षकांना मोफत प्रवेश देण्यात येणार आहे.

ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाविरुद्ध नेहमीच वर्चस्वपूर्ण कामगिरी केली आहे. विशेषत: आयसीसी स्पर्धा तसेच २०२२च्या राष्ट्रकुल स्पर्धेतही ऑस्ट्रेलियाचा अडथळा ओलांडण्यात भारतीय संघ अपयशी ठरल्याचे दिसून आले. उभय संघांत ४६ वर्षांत झालेल्या १० कसोटींमध्ये भारताला एकही सामना जिंकता आलेला नाही, हेच भरपूर काही सांगून जाते. अशा स्थितीत यंदा भारतीय संघ नवा इतिहास रचणार का, याकडे चाहत्यांचे लक्ष लागून आहे.

दुसरीकडे मेग लॅनिंग निवृत्त झाल्यावर एलिसा हिली ऑस्ट्रेलियाचे कसोटी प्रकारात नेतृत्व करण्यासाठी सज्ज आहे. या संघात एकहाती सामना जिंकून देणाऱ्या खेळाडूंची भरभराट आहे. वानखेडेची खेळपट्टी फिरकीपटूंना पोषक ठरण्याची शक्यता असल्याने अॅश्लेघ गार्डनर, एलाना किंग या फिरकीपटूंवर कांगारूंची भिस्त असेल. फलंदाजीत त्यांच्याकडे ताहिला मॅकग्रा, बेथ मूनी, एलिस पेरी असे तारांकित खेळाडू आहेत.

 दीप्ती, जेमिमावर भारताची भिस्त

इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत ऑफस्पिनर दीप्ती शर्माने ९ बळी मिळवण्यासह अर्धशतकी योगदानही दिले. त्यामुळे पुन्हा एकदा दीप्तीवर सर्वांचे लक्ष असेल. तिला राजेश्वरी गायकवाड, स्नेह राणा या फिरकीपटूंची साथ लाभेल. फलंदाजीत पदार्पणातच छाप पाडणारी जेमिमा रॉड्रिग्ज, स्मृती मानधना, शफाली वर्मा यांच्याकडून अपेक्षा आहेत. डावखुरी शुभा सतीश दुखापतीतून सावरून खेळण्यासाठी सज्ज आहे का, हे गुरुवारी सकाळीच समजू शकेल.

 १० भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या १० कसोटींमध्ये भारताला एकही लढत जिंकता आलेले नाही. ऑस्ट्रेलियाने ४ कसोटींमध्ये विजय मिळवला आहे, तर ६ कसोटी अनिर्णित राहिल्या आहेत.३९ तब्बल ३९ वर्षांनी ऑस्ट्रेलिया महिला संघ भारतात कसोटी सामना खेळणार आहे. यापूर्वी १९८४मध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ भारत दौऱ्यावर आला होता.

 प्रतिस्पर्धी संघ

भारत : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिग्ज, शफाली वर्मा, दीप्ती शर्मा, यास्तिका भाटिया, रिचा घोष, स्नेह राणा, शुभा सतीश, हरलीन देओल, साइका इशाक, रेणुका सिंग, तिथास साधू, मेघना सिंग, राजेश्वरी गायकवाड, पूजा वस्त्रकार.

ऑस्ट्रेलिया : एलिसा हिली (कर्णधार), डार्सी ब्राऊन, लॉरेन चीटल, हीदर ग्रहम, अॅश्लेघ गार्डनर, किम गार्थ, जेस जोनासन, एलाना किंगा, फोबे लिचफील्ड, ताहिला मॅकग्रा, बेथ मूनी, एलिस पेरी, मेगान शूट, अॅनाबेल सदरलँड, जॉर्जिया वेरहॅम

logo
marathi.freepressjournal.in