पालेकेले : सलामीवीर पथुम निसांकाने (१०१ चेंडूंत ११८ धावा) साकारलेल्या सलग दुसऱ्या शतकाच्या बळावर श्रीलंकेने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात अफगाणिस्तानचा ७ गडी आणि ८८ चेंडू राखून धुव्वा उडवला. या विजयासह श्रीलंकेने मालिकेत ३-० असे निर्भेळ यश संपादन केले.
प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानचा डाव ४८.२ षटकांत २६६ धावांवर आटोपला. रहमत शाह (६५) आणि अङमतुल्ला ओमरझाई (५४) यांनी अर्धशतके झळकावली. रहमनुल्ला गुरबाझने ४८ धावा केल्या. मध्यमगती गोलंदाज प्रमोद मदूशनने ३, तर असिता फर्नांडो व दुनित वेल्लालागे यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
लक्ष्याचा पाठलाग करताना गेल्या सामन्यातील द्विशतकवीर निसांकाने १६ चौकार व २ षटकारांसह कारकीर्दीतील पाचवे शतक साकारले. त्याला अविष्का फर्नांडो (६६ चेंडूंत ९१) व कर्णधार कुशल मेंडिस (४०) यांनी उत्तम साथ दिली. अविष्का व निसांकाने २३ षटकांतच १७३ धावांची सलामी नोंदवली. त्यामुळे श्रीलंकेने ३५.२ षटकांत विजयावर शिक्कामोर्तब केले.
दरम्यान, ३९ वर्षीय मोहम्मद नबीने एकदिवसीय अष्टपैलूंच्या क्रमवारीत अग्रस्थानी झेप घेतली. अशी कामगिरी करणारा तो सर्वाधिक वयस्कर क्रिकेटपटू ठरला.