

मुल्लानपूर : आयपीएलमध्ये शनिवारी दुपारी होणाऱ्या लढतीत पंजाब किंग्ज आणि सनरायजर्स हैदराबाद संघांच्या फलंदाजांकडे सर्वांचे लक्ष असेल. दोन्ही संघांत एकापेक्षा एक धडाकेबाज फलंदाजांचा भरणा असल्याने यामध्ये कोण बाजी मारणार, हे पाहणे रंजक ठरेल.
मार्च महिन्याच्या सुरुवातीला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर टी-२० विश्वचषकाच्या महामुकाबल्यात भारताने न्यूझीलंडचा ९६ धावांनी फडशा पाडला. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारताने एकंदर तिसऱ्यांदा, तर सलग दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम केला. भारताच्या या विश्वविजयात अनेक हिऱ्यांचे मोलाचे योगदान लाभले. भारत हा सलग दोन टी-२० विश्वचषक जिंकणारा तसेच मायदेशात जेतेपद मिळवणारा पहिलाच संघ ठरला. त्यानंतर काही दिवसांच्या विश्रांतीनंतर भारताचे सर्व तारे पुन्हा आयपीएलच्या निमित्ताने मैदानात दिसत आहेत.
२८ मार्चपासून आयपीएलच्या १९व्या पर्वाला प्रारंभ झाला. काही लढतींमध्ये धावांचा वर्षाव पाहायला मिळाला, तर काही सामन्यांत गोलंदाजांनी फलंदाजांना रोखले. तसेच बहुतांश लढतींमध्ये नाणेफेक जिंकून धावांचा पाठलाग करणारा संघ जिंकला. यंदादेखील प्रत्येक संघाला १४ सामने खेळायचे आहेत. त्यांपैकी ७ लढती या घरच्या मैदानात, तर उर्वरित ७ लढती प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानात होतील.
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात खेळणाऱ्या पंजाबने ३ पैकी २ सामने जिंकले आहेत. तर त्यांचा एक सामना पावसामुळे रद्द झाला. पाच गुणांसह पंजाब यंदा जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानला जात आहे. श्रेयससह प्रियांश आर्य, प्रभसिमरन सिंग, शशांक सिंग, नेहल वधेरा असे उत्तम भारतीय फलंदाज आहेत. कूपर कोनोली, मार्कस स्टोइनिस असे विदेशी फलंदाजही त्यांच्याकडे आहेत. अर्शदीप सिंग, मार्को यान्सेन व झेव्हियर बार्टलेट यांचे वेगवान त्रिकुट व फिरकीपटू युझवेंद्र चहल यांच्यावर पंजाबची भिस्त आहे.
दुसरीकडे इशान किशनच्या नेतृत्वात हैदराबादने ३ पैकी १ लढत जिंकली आहे. लखनऊविरुद्ध पराभव पत्करल्यानंतर हा संघ पुन्हा विजयपथावर परतण्यासाठी आतुर आहे. अभिषेक शर्मा, ट्रेव्हिस हेड असे आक्रमक सलामीवीर त्यांच्याकडे आहेत. मात्र दोघांच्याही कामगिरीत सातत्याचा अभाव आहे. हेनरिच क्लासेन व नितीश रेड्डी यांनीच आतापर्यंत हैदराबादला सावरले आहे. गोलंदाजीत हर्षल पटेल, हर्ष दुबे व जयदेव उनाडकट यांच्यावर हैदराबाद अवलंबून आहे.
उभय संघांतील २४ पैकी १७ सामन्यांत हैदराबादने बाजी मारली आहे, तर पंजाबने फक्त ७ लढती जिंकल्या आहेत. यंदा मात्र पंजाबचे पारडे जड आहे.
प्रतिस्पर्धी संघ
सनरायजर्स हैदराबाद : इशान किशन (कर्णधार), पॅट कमिन्स, ट्रेव्हिस हेड, रविचंद्रन स्मरण, सलिल अरोरा, हेनरिच क्लासेन, अनिकेत वर्मा, अभिषेक शर्मा, हर्ष दुबे, लियाम लिव्हिंगस्टोन, नितीश रेड्डी, शिवम मावी, ब्रेडन कार्स, क्रेन्स फुलेत्रा, कामिंदू मेंडिस, हर्षल पटेल, शिवांग कुमार, डेव्हिड पायने, अमित कुमार, प्रफुल हिंगे, इशान मलिंगा, साकिब हुसैन, ओमकार तरमाळे, जयदेव उनादकट, झीशान अन्सारी.
पंजाब किंग्ज : श्रेयस अय्यर (कर्णधार), अर्शदीप सिंग, अझमतुल्ला ओमरझाई, कूपर कोनोली, हर्नूर पन्नू, हरप्रीत ब्रार, लॉकी फर्ग्युसन, मार्को यान्सेन, मार्कस स्टोइनिस, मिचेल ओवन, मुशीर खान, नेहल वधेरा, प्रभसिमरन सिंग, प्रवीण दुबे, प्रियांश आर्य, प्याला अविनाश, शशांक सिंग, सूर्यांश शेडगे, विजयकुमार वैशाख, विशाल निशाद, विष्णू विनोद, झेव्हियर बार्टलेट, यश ठाकूर, युझवेंद्र चहल.
वेळ : दुपारी ३.३० वाजता
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी आणि जिओहॉटस्टार ॲप