'स्टेडियममध्ये आमचा प्रतिनिधी होता, तरीही बोलावले नाही; जाहीर माफी मागा', PCB चा संताप, ICC कडे तक्रार

आयसीसीने स्पष्टीकरण दिल्यानंतरही पीसीबीने या घटनेला "वारंवार घडणाऱ्या चुका" म्हटले आहे. "यजमान देश असूनही अशाप्रकारे दुर्लक्ष केल्यामुळे आम्हाला धक्का बसला आहे. स्पर्धेचे डायरेक्टर आणि पीसीबी अध्यक्षांचे नियुक्त प्रतिनिधी असूनही सय्यद यांना न बोलावण्याचा आयसीसीचा निर्णय...
'स्टेडियममध्ये आमचा प्रतिनिधी होता, तरीही बोलावले नाही; जाहीर माफी मागा', PCB चा संताप, ICC कडे तक्रार
Published on

दुबईत चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या फायनलमध्ये भारतीय क्रिकेट संघाने धमाकेदार विजय मिळवल्यानंतर पार पडलेल्या पुरस्कार वितरण समारंभात पाकिस्तान क्रिकेट मंडळाचा (पीसीबी) एकही प्रतिनिधी उपस्थित नव्हता. स्पर्धेचे यजमानपद असूनही समारोप समारंभात प्रतिनिधिला न बोलावल्यामुळे आता पीसीबीने तीव्र नाराजी व्यक्त करीत आयसीसीकडे औपचारिक तक्रार दाखल केली असून स्पष्टीकरण देत जाहीर माफीची मागणी केली आहे.

पीसीबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमैर अहमद सय्यद हे भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील अंतिम सामन्याला उपस्थित होते परंतु पुरस्कार प्रदान करणाऱ्या मान्यवरांच्या व्यासपीठावर त्यांना आमंत्रित करण्यात आले नाही. सय्यद हे स्पर्धेचे डायरेक्टर देखील होते. पीसीबीने याबद्दल अधिकृतपणे तक्रार केल्याचे वृत्त 'द डॉन'ने दिले आहे.

अशाप्रकारे दुर्लक्ष केल्यामुळे आम्हाला धक्का

या वृत्तानुसार, "आयसीसीकडे औपचारिक तक्रार दाखल करण्यात आली आहे, ज्यामध्ये स्पष्टीकरण आणि सार्वजनिक माफी मागण्याची मागणी करण्यात आली आहे," असे बोर्डाच्या प्रवक्त्याने म्हटले आहे. "यजमान देश असूनही अशाप्रकारे दुर्लक्ष केल्यामुळे आम्हाला धक्का बसला आहे. स्पर्धेचे डायरेक्टर आणि पीसीबी अध्यक्षांचे नियुक्त प्रतिनिधी असूनही सय्यद यांना न बोलावण्याचा आयसीसीचा निर्णय त्यांच्या स्वतःच्या मानक कार्यपद्धतीचे उल्लंघन करतो. हा तत्त्व, न्याय आणि खेळाच्या जागतिक हितसंबंधधारकांच्या सन्मानाचा विषय आहे."

आयसीसीने दिले स्पष्टीकरण, पण पीसीबी म्हणतं "वारंवार घडणाऱ्या चुका"

दरम्यान, आयसीसीने सय्यद यांना व्यासपीठावर इतर मान्यवरांसोबत का बोलावले नाही हे स्पष्ट केले आहे. "आयसीसी केवळ यजमान मंडळाचे प्रमुख जसे की अध्यक्ष, उपाध्यक्ष, चेअरमन किंवा सीईओ यांना पुरस्कार सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आमंत्रित करते. इतर मंडळ अधिकारी, जरी कार्यक्रमस्थळी उपस्थित असले तरी, व्यासपीठाच्या कामकाजाचा भाग नसतात," असे आयसीसीच्या प्रवक्त्याने सांगितले. परंतु पीसीबीने या घटनेला "वारंवार घडणाऱ्या चुका" म्हणून युक्तिवाद केला आहे.

आयसीसीच्या विश्वासार्हतेवर गंभीर प्रश्नचिन्ह

"आयसीसीच्या सततच्या चुका, दुहेरी निकष आणि पक्षपाती कारभारामुळे त्यांच्या विश्वासार्हतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे," असे पीसीबीच्या प्रवक्त्याने नमूद केले. "आयसीसीने यजमान देशालाच त्यांच्या स्वतःच्या स्पर्धेत दुय्यम स्थानावर ठेवून पुन्हा एकदा निष्पक्षता आणि न्यायाचा अभाव असल्याचे गंभीर संकेत दिले आहेत. आम्ही संपूर्ण सार्वजनिक स्पष्टीकरण आणि अशी पक्षपाती व अन्यायकारक वागणूक पुन्हा होणार नाही याची खात्री मागितली आहे. पीसीबीला क्रिकेटच्या प्रशासकीय संस्थेकडून व्यावसायिकता, पारदर्शकता आणि समान प्रतिनिधित्वाची अपेक्षा आहे. पीसीबीने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. हा फक्त एका सन्मान समारंभाचा विषय नाही, तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सन्मान, प्रामाणिकपणा आणि न्याय्य प्रशासनाच्या मूलभूत तत्त्वांचा प्रश्न आहे. संपूर्ण जग याकडे पाहत आहे. आयसीसी शेवटी व्यावसायिकतेला प्राधान्य देईल का, की क्रिकेटच्या जागतिक अखंडतेच्या किंमतीवर निवडक हितसंबंधांना प्राधान्य देईल?" असे पीसीबीच्या अधिकाऱ्याने म्हटले आहे.

दरम्यान, पीसीबीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांना या समारंभासाठी अधिकृतपणे आमंत्रित करण्यात आले होते परंतु त्यांची तब्येत बिघडल्यामुळे ते दुबईला जाऊ शकले नाहीत.

logo
marathi.freepressjournal.in