पिकलबॉलचा विद्यापीठ स्तरावर समावेश करण्याची मागणी; लवकरच ऑलिम्पिकच्या समावेशासाठीही प्रयत्न

टेनिस आणि टेबल टेनिस या खेळाचे मिश्रण असलेला पिकलबॉल या क्रीडा प्रकाराचा विद्यापीठ स्तरावर समावेश करण्याची मागणी करण्यात आली आहे. पिकलबॉल हा खेळ अलीकडच्या काळात जगभरात वेगाने लोकप्रिय होत आहे.
पिकलबॉलचा विद्यापीठ स्तरावर समावेश करण्याची मागणी; लवकरच ऑलिम्पिकच्या समावेशासाठीही प्रयत्न
Published on

ठाणे : टेनिस आणि टेबल टेनिस या खेळाचे मिश्रण असलेला पिकलबॉल या क्रीडा प्रकाराचा विद्यापीठ स्तरावर समावेश करण्याची मागणी करण्यात आली आहे. पिकलबॉल हा खेळ अलीकडच्या काळात जगभरात वेगाने लोकप्रिय होत आहे.

हा खेळ खेळणाऱ्या सुमारे ७० देशांपैकी अमेरिका, कॅनडा आणि इंग्लंडनंतर भारत हा पिकलबॉल खेळणारा चौथा सर्वात मोठा देश आहे. या पार्श्वभूमीवर या खेळाचा विद्यापीठ स्तरावर समावेश करण्याची मागणी भाजपाचे कोकण पदवीधर प्रकोष्ठचे संयोजक सचिन मोरे यांनी केली आहे. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू रवींद्र कुलकर्णी यांची ३०जुलै रोजी भेट घेऊन या संबंधीचे पत्र मोरे यांनी त्यांना दिले आहे.

पिकलबॉलच्या विद्यापीठीय समावेशामुळे भविष्यात अनेक संधी निर्माण होतील. या खेळाला अधिकृत मान्यता मिळाल्याने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळेल. यामुळे नवीन प्रशिक्षक आणि खेळाडू तयार होतील, ज्यामुळे भारताला या खेळात जागतिक स्तरावर स्थान मिळवता येईल. २०३०पर्यंत पिकलबॉल ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट होण्याची शक्यता असल्याने, विद्यापीठांतील स्पर्धांमध्ये झालेला समावेश भारतीय खेळाडूंना ऑलिम्पिक पदकांचे स्वप्न पाहण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरू शकतो. त्यामुळेच सचिन मोरे यांनी या खेळाचा विद्यापीठ स्तरावर समावेश करावा, अशी मागणी केली आहे.

पिकलबॉल हा एक सोपा आणि कमी जागेत खेळता येणारा खेळ आहे. त्याचे नियमही तुलनेने सोपे असल्याने, नवशिक्यांसाठी तो सहज शिकता येतो. गेल्या काही वर्षांपासून भारतातही या खेळाची लोकप्रियता वाढताना दिसत आहे. अनेक शहरांमध्ये पिकलबॉल कोर्ट्स तयार केली जात आहेत आणि स्पर्धांचे आयोजनही मोठ्या प्रमाणावर होत आहे.

पिकलबॉलचा विद्यापीठ स्तरावर समावेश केल्याने अनेक फायदे होतील. यामुळे विद्यार्थ्यांना एका नवीन खेळाची ओळख होईल. यामुळे त्यांची क्रीडा कौशल्याची क्षितिज विस्तारतील. हा खेळ शारीरिक तंदुरुस्तीसाठी अत्यंत उपयुक्त आहे, कारण त्यात धावणे, उड्या मारणे आणि जलद हालचालींचा समावेश असतो. यामुळे विद्यार्थ्यांची चपळता, समन्वय आणि सहनशक्ती वाढेल.

या खेळात टेनिससारखे काहीसे समान नियम आहेत. सर्व्हिस करताना ११ गुणांचा, तर रॅली करताना १५ ते २१ गुणांचा सेट असतो. आपल्या सर्व्हिसवरच येथे गुण मिळवता येतात. त्यामुळे सामना अधिक रंगतदार होतो. या खेळात वापरण्यात येणारा बॉल हा प्लास्टिकचा असतो. त्यास २५ ते ४० छिद्रे असतात, तर रॅकेट ही टेबल टेनिसप्रमाणेच असते. माजी टेनिसपटू गौरव नाटेकर यांच्या पुढाकाराने गतवर्षी या खेळाची पहिली जागतिक लीग चेन्नईत आयोजित करण्यात आली.

logo
marathi.freepressjournal.in