Commonwealth Games : पिंकी-राणीची कमाल! लॉन बॉलमध्ये सलग दुसरा विजय; दक्षिण आफ्रिकेवर मात

राष्ट्रकुल स्पर्धेतील लॉन बॉल्स क्रीडा प्रकारात महिला दुहेरी गटात भारतीय महिला जोडीने चमकदार कामगिरी कायम ठेवत सलग दुसरा विजय नोंदवला आहे.
Commonwealth Games : पिंकी-राणीची कमाल! लॉन बॉलमध्ये सलग दुसरा विजय; दक्षिण आफ्रिकेवर मात
Commonwealth Games : पिंकी-राणीची कमाल! लॉन बॉलमध्ये सलग दुसरा विजय; दक्षिण आफ्रिकेवर मात(Photo-X)
Published on

ग्लासगो : राष्ट्रकुल स्पर्धेतील लॉन बॉल्स क्रीडा प्रकारात महिला दुहेरी गटात भारतीय महिला जोडीने चमकदार कामगिरी कायम ठेवत सलग दुसरा विजय नोंदवला आहे. स्कॉटिश इव्हेंट कॅम्पस (एसईसी) येथे पार पडलेल्या ब-गटातील दुसऱ्या सामन्यात भारताच्या रूपाराणी तिर्की आणि पिंकी सिंह या जोडीने दक्षिण आफ्रिकेचा २-० (६-४, ७-५) असा पराभव केला. या विजयासह भारतीय संघाने आपल्या गटातील गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या थाबेलो मुव्हांगो आणि जॅकी जॅन्से व्हॅन रेन्सबर्ग या जोडीने सामन्यात कडवी झुंज दिली, मात्र भारतीय खेळाडूंनी शानदार खेळ करत सामना आपल्या बाजूने झुकवला. गुरुवारी झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने माल्टाचा तीव्र टाय-ब्रेकरमध्ये पराभव केला होता. त्या सामन्यात भारताने पहिला सेट ७-१ असा जिंकला होता, परंतु रेबेका लुईस रिक्सन आणि कॉनी-ली रिक्सन या माल्टीज जोडीने दुसरा सेट ३-४ असा जिंकून पुनरागमन केले होते. त्यानंतर रंगलेल्या अटीतटीच्या टाय-ब्रेकरमध्ये पिंकीने टाकलेल्या शेवटच्या गोलंदाजीच्या जोरावर भारताने विजय निश्चित केला होता.

लॉन बॉल्स या खेळात स्कीप हा संघाचा कर्णधार आणि सर्वात अनुभवी खेळाडू असतो, जो खेळाची रणनीती ठरवतो आणि एका एंडचे शेवटचे दोन चेंडू फेकतो. एका सेटमध्ये असे पाच एंड असतात, तर लीड हा पहिला खेळाडू असतो, जो मॅट ठेवण्याची जबाबदारी पार पाडतो आणि लक्ष्य गाठण्याचा प्रयत्न करतो. भारतीय जोडीतील रुपा राणी तिर्की आणि पिंकी सिंह या दोन्ही खेळाडू २०२२च्या बर्मिंगहॅम येथील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या महिला संघाच्या भाग होत्या. यंदाच्या ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेतून फोर प्रकार वगळण्यात आला असून केवळ एकेरी आणि दुहेरी सामने समाविष्ट करण्यात आले आहेत. भारताने बर्मिंघम स्पर्धेत पुरुषांच्या सांघिक प्रकारात रौप्यपदकही जिंकले होते.

दरम्यान, यंदा राष्ट्रकुलचे २३वे पर्व रंगणार असून या स्पर्धेत क्रीडा प्रकारांची संख्या कमालीची घटवण्यात आली आहे. यावेळी फक्त १० खेळांचा समावेश आहे. बर्मिंगहॅम २०२२च्या तुलनेत यात ९ खेळ कमी करण्यात आले आहेत, जिथे भारताने २२ सुवर्ण, १६ रौप्य, २३ कांस्य अशा ६१ पदकांसह चौथे स्थान पटकावले होते. आता भारतीय संघ किती पदक जिंकणार, याकडे लक्ष असेल.

ज्युडोपटू तुलिका निलंबित

बर्मिंघम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक जिंकणाऱ्या भारतीय ज्युडोपटू तुलिका मान हिला राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंध संस्थेने (नाडा) तात्पुरते निलंबित केले आहे. गेल्या १२ महिन्यांत तीन वेळा आपल्या ठावठिकाण्याची माहिती (व्हेअरअबाऊट्स) देण्यास अपयशी ठरल्यामुळे ही कारवाई करण्यात आली असून, तिला आगामी ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेतून मागे घेण्यात आले आहे.

दिल्लीच्या २७ वर्षीय तुलिकाने २०२२च्या स्पर्धेत ७८ किलो वजनी गटात रौप्यपदक पटकावले होते आणि यंदाच्या ग्लासगो स्पर्धेतही ती भारताची प्रमुख पदक दावेदार मानली जात होती. मात्र, नाडाच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे आता तिच्यावर दोन वर्षांच्या बंदीची टांगती तलवार आहे. एका १२ महिन्यांच्या कालावधीत वास्तव्याची माहिती देण्यास तीन वेळा अपयशी ठरल्याने नाडाने तिला नोटीस बजावली आहे, गुरुवारी भारताचा ७३ किलो वजनी गटातील अरुण कुमारसुद्धा डोपिंगमध्ये दोषी आढळल्याने स्पर्धेबाहेर गेला होता.

राष्ट्रकुलचा दिमाखदार उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न

संगीत आणि स्कॉटिश परंपरेच्या भव्य सोहळ्यात २३व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा ओव्हो हायड्रो इनडोअर स्टेडियममध्ये गुरुवारी रात्री दिमाखदार प्रारंभ झाला. ग्लासगोच्या ऐतिहासिक वारशाचे दर्शन घडवणाऱ्या या सोहळ्यात राजा चार्ल्स तिसरे यांनी 'किंग्स बॅटन'मधील संदेश वाचून दाखवत स्पर्धेचे अधिकृत उद्घाटन केले. या सोहळ्यासाठी बॉक्सर लवलिना बोर्गोहैन आणि वेटलिफ्टंगपटू मीराबाई चानू भारताच्या ध्वजवाहक होत्या.

या बॅटनने गेल्या ५०० दिवसांत राष्ट्रकुलच्या सर्व ७४ सदस्य देशांचा प्रवास केला आहे. उद्घाटन प्रसंगी बोलताना ब्रिटनचे राजे चार्ल्स तिसरे यांनी महासागर आणि जलस्रोत प्लॅस्टिक प्रदूषणापासून मुक्त करण्याचे आवाहन केले. २०३० पर्यंत जगातील ३० टक्के महासागरांचे संरक्षण करण्यासाठी जागतिक स्तरावर प्रयत्न आवश्यक असल्याचे सांगत, मानवी आरोग्य आणि सागरी परिसंस्था टिकवण्यासाठी प्लॅस्टिक प्रदूषण रोखणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. तसेच २०१४ च्या यशस्वी आयोजनानंतर ग्लासगो शहर पुन्हा एकदा राष्ट्रकुल कुटुंबाचे स्वागत करत असल्याचे त्यांनी नमूद केले.

राष्ट्रकुल स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच खुल्या मैदानाऐवजी १४,३०० क्षमतेच्या इनडोअर स्टेडियममध्ये उद्घाटन सोहळा पार पडला. याशिवाय, इतिहासात प्रथमच सर्व ७४ देशांच्या खेळाडूंनी कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच संचलन केले. भारतीय पथकाचे नेतृत्व ऑलिम्पिक पदकविजेती मीराबाई चानू आणि लव्हलिना बोरगोहेन यांनी केले. पुरुष खेळाडूंनी गडद निळ्या रंगाचे सूट तर महिला खेळाडूंनी साडी आणि ब्लेझर परिधान करून स्टेडियममध्ये प्रवेश करताच उपस्थितांनी टाळ्यांच्या गजर केला. या सोहळ्यात स्कॉटलंडच्या पारंपरिक आणि कलासंस्कृतीचा मिलाफ पाहायला मिळाला.

यंदा फक्त १० खेळांचा समावेश आहे. बर्मिंगहॅम २०२२च्या तुलनेत यात ९ खेळ कमी करण्यात आले आहेत, जिथे भारताने २२ सुवर्ण, १६ रौप्य, २३ कांस्य अशा ६१ पदकांसह चौथे स्थान पटकावले होते. मात्र यंदा भारताच्या पदकसंख्येत घट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. २ ऑगस्टपर्यंत राष्ट्रकुल रंगणार आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in