अर्शदीपच्या समर्थनार्थ 'हे' खेळाडू आले समोर ; नेटिझन्सला सुनावले बोल

एक महत्त्वाचा झेल सोडल्यानंतर अर्शदीप सिंग सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. भारताच्या पराभवानंतर नेटिझन्स अर्शदीप सिंगवर नाराज दिसत आहेत
अर्शदीपच्या समर्थनार्थ 'हे' खेळाडू आले समोर ; नेटिझन्सला सुनावले बोल
ANI

रविवारी झालेल्या सामन्यात टीम इंडियाला पाकिस्तान संघाकडून पराभव पत्करावा लागला आहे. या सामन्यात भारतीय खेळाडूंकडून काही चुका झाल्याचे दिसून आले. या सामन्यात नेटिझन्सनी भारतीय गोलंदाज अर्शदीप सिंगवर निशाणा साधला आहे. या सामन्यात अर्शदीप सिंगने आसिफ अलीचा झेल सोडला. ही चूक भारतीय संघाला महागात पडली. कारण आसिफने आठ चेंडूत 16 धावा करत पाकिस्तानला विजय मिळवून दिला. यानंतर सोशल मिडीयावर अर्शदीपला ट्रोल केले जात आहे. दरम्यान, पाकिस्तानी खेळाडू मोहम्मद हाफिज अर्शदीपच्या समर्थनार्थ पुढे आला आहे. त्याने अर्शदीपला ट्रोल न करण्याचे आवाहन केले आहे. पाकिस्तानी खेळाडू मोहम्मद हाफीजने ट्विटरवर म्हटले आहे की, 'खेळात प्रत्येकजण चुका करतो. मी भारतीय संघाच्या चाहत्यांना आवाहन करतो की, अशा खेळातील चुकांमुळे कोणाचाही अपमान करू नका.' 

भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगनेही अर्शदीपच्या समर्थनार्थ ट्विट केले आहे. हरभजनने ट्विट केले की, अर्शदीप सिंगवर टीका करणे थांबवा. कोणीही हेतुपरस्पर झेल सोडत नाही. आम्हाला भारतीय खेळाडूंचा अभिमान आहे. भारत पाकिस्तानविरुद्ध चांगला खेळला. अर्शदीप आणि संघाबद्दल वाईट बोलणे लज्जास्पद आहे.

भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहलीने अर्शदीप सिंगला पाठिंबा दिला आहे. विराटने पत्रकार परिषदेत सांगितले की, 'जेव्हा मी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानविरुद्ध माझा पहिला सामना खेळत होतो, तेव्हाही मी खराब शॉट खेळून बाद झालो होतो. दबावाखाली कोणीही चुका करू शकतो. संघातील वातावरण सध्या चांगले आहे. अर्शदीपला त्याची चूक लक्षात आली पाहिजे जेणेकरून तो पुढच्या वेळी दबावाच्या परिस्थितीत चांगली कामगिरी करू शकेल.'

दरम्यान, एक महत्त्वाचा झेल सोडल्यानंतर अर्शदीप सिंग सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. भारताच्या पराभवानंतर नेटिझन्स अर्शदीप सिंगवर नाराज दिसत आहेत. सोशल मीडियावर नेटकरी अर्शदीपला ट्रोल करत आहेत. या संदर्भातील अनेक मीम्स सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in