पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात कोहली, लोकेश राहुल यांना खेळविणे हा जुगार ठरण्याची शक्यता

सामन्यात खोळण्याची संधी मिळाल्यास राहुलचा हा ९४ दिवसानंतरचा आणि विराटचा ४१ दिवसानंतरचा सामना असणार आहे.
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात कोहली, लोकेश राहुल यांना खेळविणे हा जुगार ठरण्याची शक्यता

येत्या २७ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत २८ ऑगस्ट रोजी पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या पहिल्याच सामन्यात विराट कोहली आणि लोकेश राहुल यांना खेळविणे हा जुगार ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या पहिल्याच सामन्यात खोळण्याची संधी मिळाल्यास राहुलचा हा ९४ दिवसानंतरचा आणि विराटचा ४१ दिवसानंतरचा सामना असणार आहे. इतक्या मोठ्या ब्रेकनंतर कोणताही सराव सामना किंवा अन्य मालिका न खेळता दोन्ही खेळाडूंना पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात मैदानात उतरणे हा मोठा धोका असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

कोहलीचा फॉर्म गेल्या काही काळापासून निराशाजनक आहे. पाच महिन्यापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराटला अर्धशतक आणि अडीच वर्षापासून शतक करता आलेले नाही. धावा करण्यात तो अपयशी ठरत आहे. कोहलीने १७ जुलै रोजी मँचेस्टरमध्ये इंग्लंडविरुद्ध अखेरची वन-डे खेळली होती. त्या सामन्यात विराटने १७ धावा केल्या होत्या. इंग्लंड दौऱ्यातील ६ डावात विराटला फक्त ७६ धावा करता आल्या होत्या. राहुलने काही दिवसांपूर्वी जर्मनीत ग्रोइनची सर्जरी केली होती. त्यानंतर तो बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत रिहॅबसाठी आला होता. तेथे त्याला कोरोनाची लागण झाली. राहुल आता ठीक असला; तरी थेट पाकिस्तानविरुद्धच्या मोठ्या सामन्यात त्याला मैदानावर उतरविणे धाडसाचे ठरू शकते, असे बोलले जात आहे. राहुलने अखेरचा सामना आयपीएलमध्ये २५ मे रोजी खेळला होता. त्यावेळी त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरूध्द (आरसीबी) ७९ धावा केल्या होत्या. त्याआधीच्या सामन्यात कोलकाता नाईटरायर्डसविरुध्द (केकेआर) नाबाद ६८ धावा केल्या होत्या.

तो फॉर्ममध्ये असला, तरी सर्जरीनंतर थेट आशिया कप स्पर्धेत तेही पाकिस्तानविरुद्ध खेळणे योग्य ठरणार नसल्याचे मत काहीजण व्यक्त करीत आहेत. कोहली आणि राहुल यांचा मोठ्या कालावधीनंतर समावेश झाला आहे. राहुलकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in