
नवी दिल्ली : विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या अनुपस्थितीत प्रतिस्पर्धी संघाला पराभूत करणे भारतासाठी आव्हानात्मक असेल. मात्र या दोन खेळाडूंच्या कसोटीतील निवृत्तीने इतर खेळाडूंसाठी संधीचे दार उघडले असल्याचे भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर म्हणाले.
रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोन दिग्गज खेळाडूंनी या महिन्यात आठवड्याच्या अंतराने कसोटी क्रिकेटला अलविदा केला आहे. इंग्लंड दौऱ्याच्या तोंडावर या दोन दिग्गज खेळाडूंनी निवृत्ती स्वीकारल्याने निवडकर्त्यांसमोर संघ निवडीचा पेच निर्माण झाला आहे. तसेच ऑस्ट्रेलिया दौऱ्यावेळी अष्टपैलू खेळाडू रविचंद्रन अश्विनने कसोटीतून निवृत्ती स्वीकारली होती. या तीन दिग्गज खेळाडूंच्या अनुपस्थितीत भारतासाठी इंग्लंड दौरा आव्हानात्मक मानला जात आहे. आज (शनिवार) इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड केली जाणार आहे. या संघात युवा खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता आहे. रोहितच्या अनुपस्थितीत शुभमन गिलच्या खांद्यावर कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्याची शक्यता आहे. दरम्यान रोहित आणि विराटच्या निवृत्तीवर गंभीर यांनी गुरुवारी मौन सोडले.
खेळाडूने कधी निवृत्ती घ्यायची हा त्याचा वैयक्तिक निर्णय आहे. प्रशिक्षक, निवडकर्ते यांच्यापैकी कोणालाही खेळाडूला सांगण्याचा अधिकार नाही की त्याने निवृत्त व्हावे किंवा नाही.
या दोन खेळाडूंच्या निवृत्तीने भारताला केवळ नव्या कर्णधाराची आवश्यकता नसून अनुभवी खेळाडू, नेतृत्व यांची कमतरता भासेल, असे गंभीर म्हणाले.
भारतीय संघ या दोन दिग्गज खेळाडूंव्यतिरिक्त इंग्लंडला जाणार आहे. काहीवेळा अशी वेळ काही खेळाडूंसाठी संधी असते.
गंभीर यांनी भारताच्या चॅम्पियन्स ट्रॉफी विजयाचे उदाहरण दिले. या स्पर्धेत जसप्रीत बुमराच्या अनुपस्थितीत भारताने यश मिळवले होते. त्यामुळे रोहित आणि विराट यांच्याशिवाय इंग्लंडला खेळणे कठीण नक्कीच असेल, पण यातून काही खेळाडू नक्कीच पुढे येतील, असे गंभीर म्हणाले.
जून महिन्यात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारत आणि इंग्लंड यांच्यात ५ कसोटी सामने खेळले जाणार आहेत. इंग्लंडमधील खेळपट्ट्यांवर यजमान संघाला पराभूत करण्याचे आव्हान भारतासमोर असेल.
इंग्लंड दौऱ्यानंतर टी-२० विश्वचषकावर लक्ष
कोहली आणि रोहित यांनी कसोटी आणि टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली असली, तरी ते एकदिवसीय क्रिकेट खेळत राहणार आहेत. २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी हे दोघे संघात असतील का, या प्रश्नावर गंभीर म्हणाले की, त्या स्पर्धेला अजून बराच वेळ आहे. त्या स्पर्धेआधी टी-२० विश्वचषक होणार आहे. टी-२० विश्वचषक ही मोठी स्पर्धा असून फेब्रुवारी-मार्चमध्ये ती भारतात होणार आहे. त्यामुळे इंग्लंड दौऱ्यानंतर संपूर्ण लक्ष टी-२० विश्वचषकावर असेल. २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकाला अजून दोन-अडीच वर्षे आहेत. मी नेहमी एक गोष्ट म्हणतो की, जर तुम्ही सातत्यपूर्ण कामगिरी करत असाल, तर वय ही फक्त एक संख्या आहे, असेही गंभीर म्हणाले.