आशियाई पदक विजेत्यांचा पंतप्रधान मोदींशी खास संवाद; २०३६च्या ऑलिम्पिकचे यजमानपद भूषवण्याचा पंतप्रधानांचा संकल्प

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी नवी दिल्लीत आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदक विजेत्या भारतीय खेळाडूंची भेट घेतली.
आशियाई पदक विजेत्यांचा पंतप्रधान मोदींशी खास संवाद; २०३६च्या ऑलिम्पिकचे यजमानपद भूषवण्याचा पंतप्रधानांचा संकल्प
आशियाई पदक विजेत्यांचा पंतप्रधान मोदींशी खास संवाद; २०३६च्या ऑलिम्पिकचे यजमानपद भूषवण्याचा पंतप्रधानांचा संकल्प(Photo-X)
Published on: 

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी नवी दिल्लीत आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदक विजेत्या भारतीय खेळाडूंची भेट घेतली. यात सुवर्णपदक विजेते पुरुष आणि महिला क्रिकेट संघ तसेच इतर खेळांमधील विजेत्यांचा समावेश होता. यावेळी देश केवळ क्रीडा प्रदर्शनातच बलशाली होत नाही, तर मोठ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी एक विश्वासू यजमान म्हणूनही विकसित होत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

नवी दिल्लीतील मेजर ध्यानचंद स्टेडियमवर झालेल्या या कार्यक्रमाला केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांच्यासह भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षा पी. टी. उषा आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) अध्यक्ष जय शहा उपस्थित होते. पदक विजेत्या खेळाडूंना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, “खेळाडूंनी १४० कोटी भारतीयांना अभिमान वाटावा अशी कामगिरी केली असून, तिरंगा उंच फडकवणे हेच सर्वात मोठे यश आहे. भारत आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांसाठी एक विश्वासू आणि आतिथ्यशील देश म्हणून समोर येत आहे.” आपण २०३६ ऑलिम्पिकच्या यजमानपदासाठी दावा केला असून ते आयोजित करण्याचा आपला संकल्प असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने २१ सुवर्णपदकांसह एकूण ८५ पदके जिंकली. महिला खेळाडूंनी एकूण ३८ पदके जिंकली असून त्यापैकी ११ सुवर्णपदके असल्याचे सांगत पंतप्रधानांनी महिला क्रिकेट, हॉकी संघांसह तिरंदाजांच्या कामगिरीचे विशेष कौतुक केले.

प्रतिभावंत खेळाडू शोधण्याची मोहीम

गेल्या १२ वर्षांत भारताने क्रीडा परिसंस्थेची उभारणी करण्यासाठी मोठी मेहनत घेतली असल्याचे सांगत पंतप्रधान म्हणाले की, पूर्वी भारत मोठ्या स्पर्धांमध्ये मोजकीच पदके जिंकायचा, मात्र आता पारदर्शक व्यवस्थेमुळे ज्या खेळांमध्ये कधीही पदके मिळाली नव्हती, त्यातही देश पदके जिंकत आहे. खेळाडूंना टॉप्स योजनेंतर्गत ५० हजार रुपयांचा भत्ता आणि परदेशात प्रशिक्षणासाठी थेट आर्थिक मदत दिली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पुढे लॉस एंजेलिस ऑलिम्पिक २०२८, अहमदाबाद येथील राष्ट्रकुल स्पर्धा आणि २०३६ ऑलिम्पिक यजमानपदाच्या लक्ष्यासाठी गावोगावी प्रतिभावंत खेळाडू शोधण्याची मोहीम राबवली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in