अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत पोलंडच्या इगा स्वातेकला विजेतेपद

महिला एकेरीच्या अंतिम फेरीत इगाने ट्युनिशियाच्या ओन्स जेबूरचा ६-२, ७-६ असा पराभव केला.
अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत पोलंडच्या इगा स्वातेकला विजेतेपद

पोलंडच्या इगा स्वातेकने अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेचे पहिल्यांदाच विजेतेपद पटकाविले. ती पहिल्यांदाच या स्पर्धेची चॅम्पियन बनली. तिच्या कारकीर्दीतील हे तिसरे ग्रँडस्लॅम असून तिने याआधी दोनदा फ्रेंच ओपनचे विजेतेपद पटकावले आहे.

अमेरिकन ओपनला नवीन चॅम्पियन मिळाली. आर्थर ऐश स्टेडियमवर झालेल्या महिला एकेरीच्या अंतिम फेरीत इगाने ट्युनिशियाच्या ओन्स जेबूरचा ६-२, ७-६ असा पराभव केला. इगाने या सामन्यात सुरुवातीपासूनच एखाद्या चॅम्पियनप्रमाणे चमकदार खेळ करीत पहिला सेट ६-२ अशा फरकाने सहज जिंकला. ओन्सने तिला दुसऱ्या सेटमध्ये जोरदार आव्हान दिले; परंतु स्वातेकने हार मानली नाही तिने ७-६ ने सेट जिंकून अमेरिकन ओपन जिंकण्याचे ध्येय प्रथमच पूर्ण केले. इगा आणि ओन्स अंतिम फेरीपूर्वी चार वेळा समोरासमोर उभ्या ठाकल्या होत्या. प्रत्येकी दोन सामने जिंकून दोन्ही खेळाडू बरोबरीत होते. आता अमेरिकन ओपनच्या अंतिम फेरीत विजय मिळवत स्वातेकने ओन्सला मागे टाकले. या विजयासह दोघांमधील पाचपैकी तीन सामने स्वातेकच्या खात्यात जमा झाले आहेत. ओन्सच्या खात्यात फक्त २ विजय आहेत.

एका हंगामात दोन ग्रँड जिंकणारी इगा दुसरी खेळाडू

एका हंगामात दोन ग्रँड जिंकणारी इगा दुसरी खेळाडू ठरली. याआधी एजेलंकी कर्बरने एका हंगामात दोन ग्रँड जिंकले होते. इगाने यावर्षी ३८ सामने आणि सात स्पर्धा जिंकल्या.

अमेरिकन ओपनमधील इगाची आगेकूच

पहिल्या फेरीत जास्मिन पाओलिनीवर ६-३, ६-० असा विजय

दुसऱ्या फेरीत स्लोएन स्टीफन्सचा ६-३, ६-२ असा पराभव

तिसऱ्या फेरीत लॉरेन डेव्हिसवर ६-३, ६-४ अशी मात

चौथ्या फेरीत ज्युली निमेयरचा २-६, ६-४, ६-० ने पराभव

अंतिम-८ मध्ये जेसिका पेगुलाचा ६-३, ७-६ ने पराभव

उपांत्य फेरीत सबालेंकाचा ३-६, ६-१, ६-४ असा पराभव

अंतिम फेरीत ओन्स जेबूरवर ६-२, ७-६ ने विजय

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in