
डॉर्टमंड (जर्मनी) : ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पोर्तुगालने शनिवारी मध्यरात्री युरो चषक फुटबॉल स्पर्धेच्या बाद फेरीत प्रवेश केला. तसेच केव्हिन डीब्रुएनेने केलेल्या चमकदार कामगिरीमुळे बेल्जियमने स्पर्धेतील पहिला विजय नोंदवताना आव्हान कायम राखले.
सिग्नल पार्क येथे झालेल्या फ-गटातील लढतीत पोर्तुगालने तुर्कीएला ३-० अशी धूळ चारली. बर्नार्डो सिल्व्हाने २१व्या मिनिटाला पहिला गोल नोंदवला. त्यात समेत अकायदीनने २८व्या मिनिटाला स्वयंगोल केल्यामुळे पोर्तुगालची आघाडी २-० अशी वाढली. मग दुसऱ्या सत्रात रोनाल्डोच्या पासवर ब्रुनो फर्नांडीसने ५६व्या मिनिटाला तिसरा गोल झळकावून पोर्तुगालचा विजय पक्का केला. पोर्तुगालचे २ लढतींमध्ये ६ गुण असून त्यांचा अखेरचा साखळी सामना २७ तारखेला होईल.
दुसरीकडे इ-गटातील सामन्यात बेल्जियमने रोमानियावर २-० अशी मात केली. युरी टेलिमॅन्सने दुसऱ्याच मिनिटाला बेल्जियमचे खाते उघडले. तर कर्णधार डीब्रुएनेने ८०व्या मिनिटाला दुसरा गोल नोंदवून बेल्जियमच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. पहिल्या लढतीत स्लोव्हाकियाकडून बेल्जियमचा पराभव झाला होता. या विजयामुळे ते गटात ३ गुणांसह दुसऱ्या स्थानी असून त्यांची अखेरच्या लढतीत युक्रेनशी गाठ पडेल.
अन्य लढतींमध्ये, ड-गटात ऑस्ट्रियाने पोलंडला ३-० असे नेस्तनाबूत केले. फ-गटात झेक प्रजासत्ताकने जॉर्जियाला १-१ असे बरोबरीत रोखले. आतापर्यंत जर्मनी, स्पेन आणि पोर्तुगाल या संघांनी ‘राऊंड ऑफ १६’मध्ये प्रवेश केला आहे.
आजचे सामने
> स्पेन वि. अल्बानिया (मध्यरात्री १२.३० वा.)
> इटली वि. क्रोएशिया (मध्यरात्री १२.३० वा.)
> थेट प्रक्षेपण : सोनी सिक्स, टेन ३
यंदाच्या युरो चषकात आतापर्यंतच्या २४ सामन्यांत ६ स्वयंगोलची नोंद झाली आहे. २०२०च्या युरो चषकात सर्वाधिक ११ स्वयंगोल नोंदवण्यात आले होते. यंदा हा विक्रम मोडला जाऊ शकतो.