नवी दिल्ली : एफआयएच हॉकी विश्वचषकातील भारतीय संघाच्या निराशाजनक कामगिरीवर भारताचा माजी गोलरक्षक पी. आर. श्रीजेश याने तीव्र संताप व्यक्त केला आहे. विश्वचषक ही कोणतीही ड्रेस रिहर्सल नसून संघ व्यवस्थापन आणि खेळाडूंचे उत्तरदायित्व निश्चित केले पाहिजे, अशी आक्रमक भूमिका श्रीजेशने घेतली आहे. तसेच माजी हॉकी कर्णधार विरेन रस्किन्हाने संघात बदलाची गरज असल्याचे सांगितले.
सोमवारी झालेल्या सामन्यात भारतीय पुरुष संघाला अर्जेंटिनाकडून ३-५ असा पराभव पत्करावा लागल्याने त्यांचे उपांत्य फेरीतील उरलेसुरले आव्हानही संपुष्टात आले. दुसरीकडे, भारतीय महिला संघालाही ऑस्ट्रेलियाविरुद्ध ०-० अशी बरोबरी स्वीकारावी लागल्याने उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडावे लागले. २०२० टोकियो आणि २०२४ पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक विजेत्या भारतीय संघाचा भाग राहिलेल्या श्रीजेशने या सुमार कामगिरीवर कठीण प्रश्न विचारण्याची वेळ आल्याचे नमूद केले. “आपण केवळ चांगली हॉकी खेळणारा संघ बनवत आहोत की जगातील सर्वोत्तम संघांना हरवणारा संघ तयार करत आहोत, असा सवाल श्रीजेशने सोशल मीडियावरून उपस्थित केला. पराभवानंतर ‘शिकण्याची प्रक्रिया’, ‘चांगला खेळ’ अशा कारणांमागे लपणे बंद केले पाहिजे,” असे सांगत त्याने आगामी आशियाई खेळांचे कारण देऊन विश्वचषकातील अपयश झाकता येणार नाही, असा टोलाही लगावला.
महिला संघाचे मुख्य प्रशिक्षक शोर्ड मरिन हे विश्वचषकासारख्या महत्त्वाच्या स्पर्धेच्या अंतिम टप्प्यात सुट्टीवर गेल्याच्या वृत्तावरही श्रीजेशने कडक शब्दांत टीका केली. एवढ्या महत्त्वाच्या क्षणी मुख्य प्रशिक्षक अनुपस्थित असतानाही महिला खेळाडूंनी क्षमतेपेक्षा जास्त लढा दिला, मात्र अशा वेळी उत्तरदायित्व कोणाचे असा प्रश्न त्याने उपस्थित केला. केवळ आशियाई प्रतिस्पर्ध्याला हरवून आनंद साजरा करण्याच्या मानसिकतेवरही त्याने बोट ठेवले.
तब्बल ५१ वर्षांचा जेतेपदाचा दुष्काळ संपवण्याच्या इराद्याने कर्णधार हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील भारतीय पुरुष संघ मैदानात उतरला होता. मात्र त्यांना उपांत्य फेरीपूर्वीच गाशा गुंडाळावा लागला. भारताने एकमेव विश्वचषक १९७५ मध्ये अजितपाल सिंग यांच्या नेतृत्वाखाली क्वालालंपूर येथे पाकिस्तानचा पराभव करून जिंकला होता.
दुसरीकडे भारतीय महिला संघाने १९७४च्या विश्वचषकात उपांत्य फेरीपर्यंत मजल मारून चौथा क्रमांक पटकावला होता. हीच भारताची विश्वचषकातील आजवरची सर्वोत्तम कामगिरी आहे. २०२०च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला कांस्यपदकाच्या लढतीत पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर भारताची कामगिरी सातत्याने खालावली आहे.