प्रज्ञानंदची पहिल्यांदाच बाजी! सेंट लुईस जलद आणि अतिजलद बुद्धिबळ स्पर्धेत सिंदारोव्हवर सरशी

भारताचा २० वर्षीय ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने आपला धडाका कायम राखत पहिल्यांदाच सेंट लुईस जलद आणि अतिजलद बुद्धिबळ स्पर्धेचे (रॅपिड अँड ब्लिट्झ) विजेतेपद पटकावले आहे.
प्रज्ञानंदची पहिल्यांदाच बाजी! सेंट लुईस जलद आणि अतिजलद बुद्धिबळ स्पर्धेत सिंदारोव्हवर सरशी
प्रज्ञानंदची पहिल्यांदाच बाजी! सेंट लुईस जलद आणि अतिजलद बुद्धिबळ स्पर्धेत सिंदारोव्हवर सरशी(Photo-X/@ChessbaseIndia)
Published on

सेंट लुईस : भारताचा २० वर्षीय ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने आपला धडाका कायम राखत पहिल्यांदाच सेंट लुईस जलद आणि अतिजलद बुद्धिबळ स्पर्धेचे (रॅपिड अँड ब्लिट्झ) विजेतेपद पटकावले आहे. अंतिम फेरी शिल्लक असतानाच प्रज्ञानंदने २३.५ गुणांची कमाई करत जेतेपदावर शिक्कामोर्तब केले.

यंदाच्या वर्षातील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेचा दावेदार मानल्या जाणाऱ्या उझबेकिस्तानच्या जवोखिर सिंदारोव्हला मागे टाकत त्याने हे यश संपादन केले. ग्रँड चेस टूर (जीसीटी) मधील शेवटच्या जलद आणि अतिजलद स्पर्धेच्या अंतिम दिवशी प्रज्ञानंदने एकही सामना गमावला नाही. या कामगिरीमुळे त्याने क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली असून, या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या अंतिम फेरीतील आपले स्थान जवळपास निश्चित केले आहे. १० ते १९ ऑगस्ट दरम्यान क्लासिकल फॉरमॅटमध्ये खेळल्या जाणाऱ्या सिंकफिल्ड चषक या हंगामातील शेवटच्या स्पर्धेत त्याला हाच फॉर्म कायम ठेवावा लागेल.

रॅपिड फेरीत सिंदारोव्हविरुद्ध एका गुणाची निसटती आघाडी घेतल्यानंतर प्रज्ञानंदने ब्लिट्झ फेरीत केवळ एक सामना गमावला. त्याने १८ पैकी ११.५ गुण मिळवत विजेतेपदाला गवसणी घातली. सिंदारोव्ह २२ गुणांसह दुसऱ्या स्थानावर फेकला गेला, तर अमेरिकेचा वेस्ली सो २० गुणांसह तिसऱ्या स्थानावर राहिला. फ्रान्सच्या अलिरझा फिरोजा याने स्पर्धेतून माघार घेतल्याचा फायदाही भारतीय खेळाडूला मिळाला. या वर्षाच्या सुरुवातीला मॅग्नस कार्लसनला पराभूत करून नॉर्वे चेस स्पर्धा जिंकणाऱ्या प्रज्ञानंदला तीन दिवसांत सुरू होणाऱ्या आगामी सिंकफिल्ड चषकात अव्वल तीनमध्ये स्थान मिळवण्याची मोठी संधी आहे.

“जलद विभागात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या पातळीवरील विजेतेपद पटकावल्याचा मला खूप आनंद आहे. संपूर्ण संघ आणि कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे हे शक्य झाले,” असे प्रज्ञानंद म्हणाला. सिंकफिल्ड चषकात चांगली कामगिरी करण्यासाठी उत्सुक असल्याचेही त्याने नमूद केले.

ऑलिम्पियाडसाठी महिलांना अग्रमानांकन

समरकंद : ४६व्या फिडे बुद्धिबळ ऑलिम्पियाडसाठी जगभरातील नामांकित संघांची यादी जाहीर झाली असून यामध्ये जागतिक विजेते, प्रस्थापित राष्ट्रीय संघ आणि उदयोन्मुख खेळाडूंचा भरणा आहे. या स्पर्धेसाठी भारतीय महिलांना अग्रमानांकन लाभले आहे, तर पुरुष विभागात भारताला दुसरे मानांकन देण्यात आले आहे.

या ऐतिहासिक स्पर्धेत एकूण ४०० संघ सहभागी होणार असून खुल्या विभागात २०८, तर महिला विभागात १९२ संघ आमनेसामने असतील. बुडापेस्ट २०२४ मधील ३८० संघांच्या विक्रमापेक्षा ही संख्या २०हून जास्त आहे. १५ सप्टेंबर रोजी समरकंद येथे उद्घाटन सोहळा पार पडणार असून १६ ते २७ सप्टेंबर दरम्यान ११ क्लासिकल फेऱ्यांमध्ये ही स्पर्धा रंगेल.

सादर केलेल्या खेळाडूंच्या यादीनुसार खुल्या विभागाच्या सुरुवातीच्या मानांकनात अमेरिका अव्वल स्थानी आहे. त्यापाठोपाठ विद्यमान विजेता भारत, यजमान उझबेकिस्तान, चीन आणि जर्मनीचा क्रमांक लागतो. महिलांच्या स्पर्धेत भारतीय संघाला अव्वल मानांकन मिळाले असून, जॉर्जिया, चीन, कझाकस्तान आणि अमेरिका अनुक्रमे दुसऱ्या ते पाचव्या स्थानावर आहेत.

भारतीय संघ खुल्या विभागाचे विजेतेपद राखण्यासाठी उतरणार असून बुडापेस्ट विजेत्या संघातील चार खेळाडूंचा यामध्ये समावेश आहे. अर्जुन एरिगेसी (२७५९) भारतीय क्रमात आघाडीवर असून पहिल्या पटावर खेळेल, तर प्रज्ञानंद (२७५०) दुसऱ्या पटावर असेल. पाच खेळाडूंच्या या संघात पेंटाला हरिकृष्णाच्या जागी समाविष्ट झालेला निहाल सरिन (२७१८) तिसऱ्या स्थानावर आहे.

विद्यमान जागतिक विजेता गुकेश डोम्माराजू (२७०३) चौथ्या आणि विदित गुजराती (२६९७) पाचव्या स्थानावर असून श्रीनाथ नारायणन पुन्हा एकदा कर्णधार म्हणून पुनरागमन करत आहेत. गुकेशच्या स्थानातील हा बदल लक्षवेधी मानला जात आहे. बुडापेस्ट येथे त्याने पहिल्या पटावर खेळताना १० पैकी ९ गुण मिळवत ३०५६ रेटिंग कामगिरीसह वैयक्तिक सुवर्णपदक पटकावले होते आणि भारताला विजेतेपद मिळवून दिले होते.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in