दिवसभर फक्त 'मनू की बात'! भारताच्या युवा नायिकेवर चोहीकडून कौतुकाचा वर्षाव

पॅरिस ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी मनू भाकरने तमाम भारतीयांना कांस्यपदकाची भेट दिली. दुपारी ४च्या सुमारास मनूने मिळवलेल्या या यशामुळे त्यानंतर समाज माध्यमांपासून गल्लीबोळात दिवसभर तिचीच चर्चा सुरू होती.
दिवसभर फक्त 'मनू की बात'! भारताच्या युवा नायिकेवर चोहीकडून कौतुकाचा वर्षाव
Published on

पॅरिस : पॅरिस ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी मनू भाकरने तमाम भारतीयांना कांस्यपदकाची भेट दिली. रविवारी दुपारी ४च्या सुमारास मनूने मिळवलेल्या या यशामुळे त्यानंतर समाज माध्यमांपासून गल्लीबोळात दिवसभर तिचीच चर्चा सुरू होती.

महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकाराच्या अंतिम फेरीत मनूने तिसरे स्थान प्राप्त केले. हरयाणाच्या मनूने २२१.७ गुण कमावले. दक्षिण कोरियाची किम येजी (२४१.३) आणि जिन ये (२४३.२) या दोघी अनुक्रमे सुवर्ण व रौप्य पदकाच्या मानकरी ठरल्या. मनूच्या ऐतिहासिक पराक्रमामुळे नेमबाजीतील भारताचा पदकदुष्काळ संपुष्टात आला. २०१२नंतर प्रथमच भारताच्या नेमबाजाने ऑलिम्पिकमध्ये पदक पटकावले.

अंतिम फेरीत एकवेळस मनू दुसऱ्या स्थानी होती. मात्र शेवटच्या नेममध्ये तिला १०.३ गुण मिळवता आले, तर प्रतिस्पर्धीने १०.५ गुणांसह बाजी मारली. त्यामुळे मनूची तिसऱ्या स्थानी घसरण झाली. मनू आणखी दोन प्रकारांत पदकासाठी दावेदारी सादर करणार आहे. मात्र तिच्या या यशामुळे भारताचा दमदार श्रीगणेशा झाला असून पुढील काही दिवसांत नक्कीच पदकांचे दशक गाठले जाईल, याची क्रीडाप्रेमींना खात्री आहे.

२०२०मध्ये टोकियो येथे झालेल्या ऑलिम्पिकमध्ये मनूला याच प्रकारात अंतिम फेरीसुद्धा गाठता आली नव्हती. बदुंकीतील बिघाडामुळे तिचा बराचसा वेळ वाया गेला. तसेच तिला पिस्तूल बदलण्याची परवानगीही देण्यात आली नाही. त्यामुळे मनू पूर्णपणे निराश झाली होती. तिला रडू आवरणे कठीण गेले. २०१८च्या राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेत्या मनूने त्यानंतर नेमबाजी सोडण्याचाही विचार केला. तसेच प्रशिक्षक जसपाल राणा यांच्याशीही तिने करार मोडीत काढला होता.

मात्र गतवर्षी मनूने पुन्हा राणा यांची मदत मागितली. त्यांनी ही मनूला मदत करण्यासाठी हात पुढे केला. आशियाई क्रीडा स्पर्धेत मनूने महिलांच्या सांघिक विभागात सुवर्णपदक काबिज केले. यंदा ऑलिम्पिकमध्ये तिच्याकडे सर्वांचेच लक्ष लागून होते. शनिवारी मनूने अंतिम फेरीत प्रवेश केला मग रविवारी तिने कांस्यपदकावर नाव कोरून भारताचे ऑलिम्पिकमधील पदकाचे खाते उघडले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती द्रौपर्दी मुर्मू यांनी मनूचे कौतुक केले.

  • भारतासाठी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक पदक जिंकल्याबद्दल मनूचे अभिनंदन. हे यश आणखी खास यासाठी आहे कारण ती भारतासाठी ऑलिम्पिक पदक पटकावणारी पहिली महिला नेमबाज ठरली आहे. - नरेंद्र मोदी, पंतप्रधान

  • मनू तुझे ऐतिहासिक यशाबद्दल अभिनंदन. तू भारताचे पदकांचे खाते उघडलेस. संपूर्ण देशाला तुझा अभिमान आहे. तुझ्या या यशामुळे असंख्य महिलांना त्यांच्या क्षेत्रात भरारी घेण्याची प्रेरणा मिळेल. तुला भविष्यातील यशासाठी शुभेच्छा. - द्रौपदी मुर्मू, राष्ट्रपती

  • भारतासाठी अभिमानाचा क्षण. मनू भाकरने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये देशासाठी पहिले पदक जिंकले. मनू तुझी चिकाटी, एकाग्रता आणि कौशल्य कौतुकास्पद आहे. - डॉ. मनसूख मांडविया, केंद्रीय क्रीडामंत्री

  • पदकतालिकेचा धडाक्यात शुभारंभ. नेमबाजीत भारताचा कांस्य वेध. मनू भाकर तुझे अभिनंदन. टोकियो ऑलिम्पिकमधील अपयश बाजूला सारून तू ज्याप्रकारे पुनरागमन केलेस, ते वाखाणण्याजोगे आहे. - सचिन तेंडुलकर, माजी क्रिकेटपटू

logo
marathi.freepressjournal.in