प्रणॉय उपांत्य फेरीत; पुरुष दुहेरीत सात्त्विक-चिरागची आगेकूच

पॅरिस ऑलिम्पिकच्या दृष्टीने प्रणॉय व सात्त्विक-चिराग हेच भारतीय फक्त क्रमवारीत अव्वल १६मध्ये स्थान टिकवून आहे
प्रणॉय उपांत्य फेरीत; पुरुष दुहेरीत सात्त्विक-चिरागची आगेकूच

नवी दिल्ली : भारताचा अनुभवी एच. एस. प्रणॉय आणि सात्त्विकसाइराज रंकीरेड्डी-चिराग शेट्टी यांच्या युवा जोडीने शुक्रवारी इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत पुरुष एकेरीच्या

उपांत्यपूर्व लढतीत प्रणॉयने तैवानच्या वँग वेईला २१-११, १७-२१, २१-१८ असे तीन गेममध्ये पराभूत केले. क्रमवारीत आठव्या स्थानी असलेल्या प्रणॉयने १ तास, १७ मिनिटांच्या संघर्षानंतर ही लढत जिंकली. प्रणॉयसमोर आता चीनच्या सहाव्या मानांकित शी यूकीचे आव्हान असेल.

पुरुष दुहेरीत जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेल्या सात्त्विक-चिराग यांच्या जोडीने यांग पोहान आणि लू चिंग या तैवानच्या जोडीवर २१-१४, २१-१५ असा सरळ दोन गेममध्ये विजय मिळवला. सात्त्विक-चिरागची आता किम ॲस्ट्रप आणि आंद्रे रास्मुसेन या डेन्मार्कच्या पाचव्या मानांकित जोडीशी गाठ पडेल.

ऑलिम्पिकच्या दिशेने वाटचाल

पॅरिस ऑलिम्पिकच्या दृष्टीने प्रणॉय व सात्त्विक-चिराग हेच भारतीय फक्त क्रमवारीत अव्वल १६मध्ये स्थान टिकवून आहे. अन्य सर्व भारतीयांना मात्र एप्रिल महिन्यापर्यंत क्रमवारीतील स्थान सुधारावे लागणार आहे. प्रणॉय एकेरीत आठव्या स्थानी, तर सात्त्विक-चिराग दुसऱ्या स्थानी आहेत. किदाम्बी श्रीकांत २४व्या, तर लक्ष्य सेन १७व्या स्थानी आहे. पी. व्ही. सिंधूही क्रमवारीत १६पेक्षा खालच्या स्थानी आहे.

logo
marathi.freepressjournal.in