अचूक टप्प्यावर चेंडू फेकण्यात अपयशी; प्रसिद्ध कृष्णाची कबुली

मी नेहमीच अचूक टप्प्यावर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतो, परंतु इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या कसोटीत अचूक टप्प्यावर गोलंदाजी करण्यात मी अपयशी ठरल्याची कबुली भारताचा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाने दिली. लीड्स कसोटीत २०० पेक्षा अधिक धावा मोजल्यावर माजी खेळाडूंनी प्रसिद्धवर टीकास्त्र डागले. त्यावर शनिवारी प्रसिद्धने आपले मत व्यक्त केले.
अचूक टप्प्यावर चेंडू फेकण्यात अपयशी; प्रसिद्ध कृष्णाची कबुली
Published on

बर्मिंगहम : मी नेहमीच अचूक टप्प्यावर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतो, परंतु इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या कसोटीत अचूक टप्प्यावर गोलंदाजी करण्यात मी अपयशी ठरल्याची कबुली भारताचा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाने दिली. लीड्स कसोटीत २०० पेक्षा अधिक धावा मोजल्यावर माजी खेळाडूंनी प्रसिद्धवर टीकास्त्र डागले. त्यावर शनिवारी प्रसिद्धने आपले मत व्यक्त केले.

पहिल्या डावात ६ ते ८ मीटर हा योग्य टप्पा होता. मात्र मी त्यापेक्षा कमी अंतरावर चेंडू फेकले. दुसऱ्या डावात मी थोडीशी सुधारणा केली. त्यावेळी खेळपट्टी काहीशी संथ झाली होती. ज्या एरियात चेंडू टाकायचा होता तेथे मी टाकू शकलो नाही. उताराच्या बाजूचा फायदा मला घेता आला नाही. गोलंदाज म्हणून मी योग्य जागेवर चेंडू टाकायला हवे होते. निराशाजनक कामगिरीची संपूर्ण जबाबदारी मी स्वीकारतो आणि पुढच्या वेळी अधिक चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न असेल, असे प्रसिद्ध पत्रकार परिषदेत म्हणाला.

पहिल्या डावात प्रसिद्धने २० षटकांत ६.४० च्या सरासरीने १२८ धावा मोजल्या. भारतीय गोलंदाजाची ही खराब कामगिरी ठरली. दरम्यान त्याने ऑली पोप, ब्रुक आणि जेमी स्मिथ यांच्या विकेट घेतल्या. मात्र तरीही त्याला धावांना ब्रेक लावता आला नाही.

दुसऱ्या डावात क्राऊली आणि पोपची विकेट घेत प्रसिद्धने भारताला विजयाची आस दाखवली होती. मात्र याही डावात त्याने १५ षटकांत ६.१० च्या सरासरीने ९२ धावा मोजल्या.

जेव्हा मी गोलंदाजी करायला येतो तेव्हा प्रत्येक वेळी निर्धाव चेंडू फेकण्याचा माझा प्रयत्न असतो. चौकार देण्याचा माझा प्रयत्न नसतो. पहिल्या कसोटीत आऊटफिल्ड जलद होती. गोलंदाजी करताना माझी लाइन आणि लेन्थ या दोन्ही चुकीच्या होत्या. त्यामुळे प्रतिस्पर्धी फलंदाजांनी माझ्या गोलंदाजीवर हल्ला चढवला, असे प्रसिद्ध म्हणाला.

काही वेळा मी उसळते चेंडू टाकले. मात्र तरीही धावा थांबण्याचे नाव घेत नव्हत्या. मी जेव्हा गोलंदाजीला येत होतो तेव्हा सरासरी कमी करून इंग्लंडवर दबाव टाकण्याचा माझा प्रयत्न होता, असे प्रसिद्धने सांगितले.

२९ वर्षीय प्रसिद्ध म्हणाला की, पहिल्या कसोटीत पराभव झाल्यानंतरही भारतीय संघ सकारात्मक आहे. पहिल्या कसोटीत आम्ही दोनदा सलग बळी घेतले. त्यामुळे खेळाडूंमध्ये उत्साह होता. आम्ही शेवटपर्यंत हार मानली नाही. शेवटच्या चेंडूपर्यंत आम्ही जीवतोड खेळलो, असे प्रसिद्ध म्हणाला. दुसऱ्या कसोटीत खेळ उंचावण्याचा भारतीय संघाचा असेल, असे प्रसिद्ध म्हणाला.

इंग्लंडविरुद्धच्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटीत भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. या कसोटीत भारताचे क्षेत्ररक्षण ढिसाळ झाले. त्यासोबतच गोलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीचा फटका भारतीय संघाला बसला. वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाने पहिल्या डावात ३ फलंदाजांना माघारी धाडले, तर दुसऱ्या डावात २ फलंदाजांना आपल्या सापळ्यात अडकवले. त्याने या सामन्यात ५ विकेट्स मिळवल्या असल्या तरी त्याने एकट्याने २०० धावा मोजल्या. त्यामुळे या भारतीय वेगवान गोलंदाजाबाबत माजी खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली. त्यावर शनिवारी स्वतः प्रसिद्धने खुलासा केला. अचूक टप्प्यावर चेंडू फेकण्यात आपल्याला अपयश आल्याची कबुली प्रसिद्धने दिली.

भारती आणि इंग्लंड यांच्यात ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिली कसोटी जिंकत यजमान इंग्लंडने १-० ने आघाडी घेतली आहे. युवा खेळाडू शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ प्रथमच इंग्लंड दौऱ्यावर आला आहे. विशेष म्हणजे रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवीचंद्रन अश्विन या दिग्गज खेळाडूंनी कसोटी क्रिकेटला अलविदा केल्यानंतर प्रथमच भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर आला आहे. फलंदाजांनी शानदार कामगिरी केली असली तरी पहिल्या कसोटीत भारताच्या गोलंदाजांनी मात्र निराश केले.

इंग्लंडमध्ये 'वारा' महत्त्वाचा फॅक्टर

हेडिंग्ले कसोटीत वारा महत्त्वाचा फॅक्टर ठरला. तेथील वातावरण थंड होते. त्या वातावरणाला जुळवून घेऊन खेळणे कठीण जात होते, असे प्रसिद्ध म्हणाला. कधी जोरदार वारे होते तर कधी ते थांबत होते. इंग्लंडमध्ये खेळताना या गोष्टींचा अनुभव असणे महत्त्वाचे आहे. कारण त्याचा गोलंदाजीवर परिणाम होतो. वारा असेल आणि नसेल तेव्हा धाव घेणे यातही फरक पडतो. वातावरणाचा गोलंदाजीवर परिणाम होत होता. ढग, वारे असल्यावर चेंडू स्विंग व्हायचा. पण ऊन असेल तेव्हा चेंडू स्विंग व्हायचा नाही, असे प्रसिद्ध म्हणाला.

logo
marathi.freepressjournal.in