Video : प्रीती झिंटाकडून IPL लिलावात झाली घोडचूक! चुकीच्या खेळाडूला 20 लाखांत विकत घेतले, नंतर...

पंजाब किंग्सच्या टेबलावर बसलेल्या प्रीती झिंटा, नेस वाडिया आणि इतरांना चूक लक्षात आली. पण, तोपर्यंत उशीर झाला होता.
Video : प्रीती झिंटाकडून IPL लिलावात झाली घोडचूक! चुकीच्या खेळाडूला 20 लाखांत विकत घेतले, नंतर...

मंगळवारी आयपीएल लिलावादरम्यान पंजाब किंग्सच्या मालकांनी मोठी चूक केली ज्याची सोशल मीडियावर चर्चा आहे. वास्तविक, पंजाब किंग्सने चुकून एका नको असलेल्या खेळाडूला लिलावात विकत घेतले. यानंतर सह-मालक प्रीती झिंटा आणि फ्रेंचायझीने खेळाडूला परत करण्याची मागणी केली, परंतु लिलावकर्ता मल्लिका सागरने स्पष्ट नकार दिला. लिलाव प्रक्रिया पूर्ण झाली असल्याने निर्णय बदलण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे मल्लिका सागरने सांगितले आणि प्रीती झिंटाच्या संघात नको असलेला खेळाडू दाखल झाला.

लिलावात शशांक सिंग या खेळाडूचे नाव आले. त्याची मूळ किंमत 20 लाख होती. यानंतर प्रीती झिंटाने शशांक सिंगसाठी बोली लावली. पंजाब किंग्सशिवाय इतर संघांनी शशांक सिंगसाठी बोली न लावल्याने त्याची लगेच विक्री झाले. त्यानंतर लिलाव करणारी मल्लिका सागर पुढील खेळाडूंच्या सेटकडे वळाली. तेव्हा कुठे पंजाब किंग्सला आपल्याकडून चूक झाल्याचे लक्षात आले.

पंजाब किंग्सच्या टेबलावर बसलेल्या प्रीती झिंटा, नेस वाडिया आणि इतरांना आपण शशांक सिंग याला अन्य कोणीतरी खेळाडू समजलो आणि चूक झाली हे लक्षात आले. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. तरी, प्रीती आणि नेस वाडियाने मल्लिमाचे लक्ष आपल्याकडे वेधून खेळाडू नको असल्याचे सांगितले. तथापि, एकदा खेळाडूंच्या लिलावासाठी हातोडा खाली गेला की तो परत घेता येत नाही. पंजाबला हा खेळाडू ठेवावाच लागेल असे मल्लिकाने स्पष्ट केले.

पंजाबचे स्पष्टीकरण -

तथापि, पंजाबच्या एका चुकीमुळे शशांक सिंग या खेळाडूला मात्र 20 लाखांचा फायदा झाला, अशा अनेक प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटायला सुरूवात होताच, "शशांक सिंगला पंजाब किंग्सने चुकून विकत घेतल्याचे वृत्त मीडियाने दिले आहे. आम्ही हे स्पष्ट करू इच्छितो की हा खेळाडू नेहमीच आमच्या यादीत होता. एकाच नावाचे 2 खेळाडू यादीत असल्याने गोंधळ झाला. त्याला घेऊन आम्‍हाला आनंद झाला आहे", असे स्पष्टीकरण पंजाब संघाकडून देण्यात आले आहे.

सोशल मीडियावर नेटकरी या व्हिडिओखाली अनेक मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in