पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून केला राष्ट्रकुलमधील कामगिरीचा गौरव
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने केलेल्या दमदार कामगिरीचा गौरव केला. यावेळी त्यांनी नागरिकांना खेळांना पाठिंबा आणि प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, “भारताने क्रीडा विश्वात केलेली चमकदार कामगिरी भारताच्या गुणवत्तेची झळाळी दाखविते. अशा प्रकारच्या गुणवत्तेला पाठिंबा आणि प्रोत्साहन दिले पाहिजे.” भारताने राष्ट्रकुल स्पर्धा २०२२मध्ये पदकतालिकेत चौथे स्थान मिळविले. भारताने २२ सुवर्ण, १६ रौप्य आणि २३ कांस्यपदके अशी एकूण ६१ पदके पटकाविली.
मोदी पुढे म्हणाले की, “मोठी स्वप्ने पूर्ण करण्यासाठी भरपूर कष्ट करावे लागतात. आपल्याला स्वातंत्र्य सैनिकांच्या दृढ निश्चयापासून प्रेरणा घेण्याची गरज आहे. मी देशातील युवकांना पुढील २५ वर्षे देशाच्या विकासासाठी समर्पित करण्याचे आवाहन करत आहे. आपण संपूर्ण मानवजातीच्या विकासासाठी काम केलं पाहिजे.”