
मुंबई : आगामी विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेसाठी मुंबईचा संघ जाहीर करण्यात आला आहे. या संघातून सलामीवीर पृथ्वी शॉ याला वगळण्यात आले आहे. तसेच सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरलेल्या अनुभवी अजिंक्य रहाणेला विजय हजारे स्पर्धेसाठी मात्र विश्रांती देण्यात आली आहे.
२१ डिसेंबर ते १८ जानेवारी या कालावधीत विजय हजारे या देशांतर्गत एकदिवसीय स्पर्धेचे ३२वे पर्व विविध शहरांत खेळवण्यात येईल. श्रेयस अय्यरकडेच मुंबईचे नेतृत्व कायम राखण्यात आले आहे. तूर्तास पहिल्या ३ सामन्यांसाठी मुंबईचा संघ जाहीर करण्यात आला असून सिद्धेश लाड, तनुष कोटियन, जय बिस्ता यांचे संघात पुनरागमन झाले आहे. मात्र २५ वर्षीय पृथ्वीला मुश्ताक अली स्पर्धेत ९ सामन्यांत एकही अर्धशतक झळकावता आले नाही. त्यामुळे रणजी स्पर्धेतून वगळल्यानंतर आता विजय हजारे स्पर्धेतही तो नसेल. आयपीएल लिलावात पृथ्वीवर कोणीही बोली लावली नाही.
रणजी स्पर्धेत वाढते वजन व वर्तनाचे कारण देत पृथ्वीला वगळण्यात आले होते. त्यानंतर मुंबईने श्रेयसच्या नेतृत्वखाली मुश्ताक अली स्पर्धा जिंकली. या स्पर्धेत पृथ्वीने ९ सामन्यांत १९७ धावा केल्या. विदर्भाविरुद्ध त्याने सर्वाधिक ४९ धावा केल्या. मात्र एकंदर त्याचा फॉर्म व मैदानावरील देहबोली, खेळण्याचा दृष्टिकोन या बाबींमुळे पृथ्वी सध्या निवड समितीच्या नापसंतीस उतरला आहे. त्यामुळे आता त्याला उर्वरित हंगामातही स्थान मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे.
दरम्यान, रहाणेने मुश्ताक अली स्पर्धेत पाच अर्धशतकांसह सर्वाधिक ४६९ धावा फटकावल्या. रणजीचा दुसरा टप्पा लवकरच सुरू होणार असल्याने रहाणेला तूर्तास विश्रांती देण्यात आली आहे.
मुंबईचा संघ
श्रेयस अय्यर (कर्णधार), आयुष म्हात्रे, अंक्रिश रघुवंशी, जय बिस्ता, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, सूर्यांश शेडगे, सिद्धेश लाड, हार्दिक तामोरे, प्रसाद पवार, अथर्व अंकोलेकर, तनुष कोटियन, शार्दूल ठाकूर, रॉयस्टन डायस, जुनेद खान, हर्ष तन्ना, विनायक भोईर.
पृथ्वीचा निशाणा
लिस्ट-ए म्हणजेच देशांतर्गत एकदिवसीय स्पर्धांमध्ये ६५ सामन्यांत ५५.७च्या सरासरीने ३,३९९ धावा पृथ्वीने केल्या आहेत. यामध्ये १० शतके व १४ अर्धशतकाचांही समावेश आहे. मात्र तरीही आपल्याकडे दुर्लक्ष केल्याने पृथ्वीने इन्स्टाग्रामवर खोचक पोस्ट टाकून नाराजी व्यक्त केली. “१२६च्या स्ट्राइक रेटने ६५ सामन्यांत ३,३९९ धावा करूनही जर मला संघात स्थान मिळत नसेल, तर मी आणखी काय करावे. माझ्यात अजूनही कमतरता आहे. मात्र मला माझ्या क्षमतेवर विश्वास असून जे चाहते माझ्या पाठिशी आहेत, त्यांना निराश करणार नाही. मी आणखी चमकदार कामगिरी करून झोकात पुनरागमन करेल. ओम साई राम,” असा संदेश पृथ्वीने त्या पोस्टमध्ये लिहिला. सोबत त्याची आकडेवारीही जोडली.