पृथ्वीने मुंबई सोडली! देशांतर्गत क्रिकेटमध्ये अन्य संघाकडून खेळणार

प्रतिभावान २५ वर्षीय फलंदाज पृथ्वी शॉने आता मुंबई सोडण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघातून बराच काळ बाहेर असलेला पृथ्वी देशांतर्गत क्रिकेटमध्ये (रणजी स्पर्धा) मुंबईचे प्रतिनिधित्व करायचा. मात्र आता त्याने अन्य संघाकडून खेळण्याची इच्छा प्रकट केली असून मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) त्याला ना-हरकत प्रमाणपत्र दिले आहे.
पृथ्वीने मुंबई सोडली! देशांतर्गत क्रिकेटमध्ये अन्य संघाकडून खेळणार
Published on

मुंबई : प्रतिभावान २५ वर्षीय फलंदाज पृथ्वी शॉने आता मुंबई सोडण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघातून बराच काळ बाहेर असलेला पृथ्वी देशांतर्गत क्रिकेटमध्ये (रणजी स्पर्धा) मुंबईचे प्रतिनिधित्व करायचा. मात्र आता त्याने अन्य संघाकडून खेळण्याची इच्छा प्रकट केली असून मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) त्याला ना-हरकत प्रमाणपत्र दिले आहे.

भारताला २०१८चा युवा विश्वचषक (१९ वर्षांखालील) जिंकवून देण्यात पृथ्वीने मोलाची भूमिका बजावतानाच यशस्वी नेतृत्व केले होते. मात्र कालांतराने ढासळलेली तंदुरुस्ती व सुमार कामगिरीमुळे तो संघातून बाहेर फेकला गेला. तसेच बेशिस्त वर्तनामुळे त्याने मुंबईच्या संघातीलही स्थान गमावले. नुकताच झालेल्या टी-२० मुंबई स्पर्धेतही पृथ्वीला छाप पाडता आली नाही. अखेरीस पृथ्वीने एका पत्राद्वारे एमसीएकडे त्याला एनओसी देण्याची मागणी केली.

“माझे कौशल्य दाखवण्यासाठी सातत्याने संधी दिल्याबद्दल मी एमसीएचा आभारी आहे. क्रिकेटपटू म्हणून स्वत:च्या कारकीर्दीला आणखी उंचीवर नेण्यासाठी मी अन्य राज्याकडून खेळण्याचा निर्णय घेत आहे. त्यामुळे तुम्ही माझ्या अर्जाची दखल घेत मला एनओसी प्रमाणपत्र द्यावे,” असे पृथ्वी म्हणाला.

त्यावर एमसीएचे सचिव अभय हडप यांनी प्रतिक्रिया देत पृथ्वीला पुढील कारकीर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. “एमसीएने पृथ्वीची विनंती मान्य केली आहे. मुंबईसाठी तिन्ही प्रकारांच्या देशांतर्गत स्पर्धेत पृथ्वीने अमूल्य योगदान दिले आहे. २०१७मध्ये मुंबईसाठी पदार्पण केल्यापासून त्याने सातत्याने चमक दाखवली. यापुढील भविष्यासाठी त्याला शुभेच्छा,” असे हडप म्हणाले. पृथ्वीच्या नेतृत्वात मुंबईने विजय हजारे स्पर्धा जिंकलेली आहे. तसेच २०२४ मध्ये रणजी ट्रॉफी जिंकणाऱ्या मुंबई संघाचा तो भाग होता.

भारतासाठी ५ कसोटी व ६ एकदिवसीय सामने खेळलेल्या पृथ्वीला गतवर्षी रणजी स्पर्धेत मध्यातूनच मुंबई संघातून बाहेर करण्यात आले. वाढते वजन आणि क्रिकेटवरील लक्ष विचलित झाल्यामुळे पृथ्वीला वगळण्यात आल्याचे समजले होते. तसेच मुंबईच्या संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरनेही पृथ्वीला कडक शब्दांत इशारा देत स्वत:च्या कार्यपद्धतीवर लक्ष देण्याचे सुचवले होते. आयपीएलमध्येही पृथ्वीला कोणीही विकत घेतले नाही. मैदानांबाहेरील काही प्रकरणांमुळेही पृथ्वी चर्चेत होता. त्यामुळेच एकेकाळी भारतीय संघाचे भविष्य म्हणून पाहिले जात असलेला पृथ्वी आता दिसेनासा झाला आहे, तर त्याच्याच सोबतीने २०१८च्या युवा विश्वचषकात खेळलेला शुभमन गिल भारताच्या कसोटी संघाचा कर्णधार आहे. आता अन्य राज्याकडून खेळत पृथ्वीचे नशीब पालटणार का, हे पाहणे रंजक ठरेल.

logo
marathi.freepressjournal.in