आशिया चषकातील उपविजेते पाकिस्तानवरही बक्षिसांचा वर्षाव

आशिया चषक २०२२चे विजेते ठरलेल्या श्रीलंकेच्या संघाला सुमारे १ कोटी २० लाख रुपयांचे बक्षीस मिळाले
आशिया चषकातील उपविजेते पाकिस्तानवरही बक्षिसांचा वर्षाव
Published on

श्रीलंकेत बिकट परिस्थिती असताना त्यांच्या देशाच्या क्रिकेट संघाने आशिया चषक पटकावून आपल्या देशवासीयांना आनंदाचे क्षण अनुभवण्याची संधी दिली. आर्थिक संकटामुळे राजकीय अशांती पसरलेल्या श्रीलंकेच्या संघाला या विजयांनंतर कोट्यवधी रुपयांच्या बक्षिसांची रक्कम मिळाली. त्याचप्रमाणे आशिया चषकातील उपविजेते पाकिस्तानवरही बक्षिसांचा वर्षाव झाला.

आशिया चषक २०२२चे विजेते ठरलेल्या श्रीलंकेच्या संघाला सुमारे १ कोटी २० लाख रुपयांचे बक्षीस मिळाले. श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाका याला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली यांनी दीड लाख रुपयांचे बक्षीस दिले. पाकिस्तानला आशियाई क्रिकेट काऊन्सिलकडून (एसीसी) बक्षीस म्हणून सुमारे ६० लाख रुपये मिळाले.

वैयक्तिक बक्षिसांमध्येही श्रीलंकेचे क्रिकेटपटू मालामाल झाले. प्लेअर ऑफ द टूर्नामेंटचा पुरस्कार जिंकणारा श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू वानिंदू हसरंगा याला सुमारे १२ लाख रुपयांचे बक्षीस मिळाले. अंतिम फेरीत सामनावीर ठरलेल्या भानुका राजपक्षेला सुमारे चार लाख रुपये मिळाले. शिवाय, बेस्ट कॅच ऑफ द मॅचसाठी त्याने तीन हजार डॉलर्सचे बक्षीस मिळविले. वानिंदू हसरंगाची (३६ धावा व तीन बळी) अष्टपैलू खेळी, भानुका राजपक्षेची (नाबाद ७१) अप्रतिम खेळी आणि मदूशानच्या (चार बळी) भेदक माऱ्याच्या जोरावर श्रीलंकेने रविवारी अंतिम सामन्यात पाकिस्तानवर २३ धावांनी मात करून सहाव्यांदा आशिया चषकावर आपले नाव कोरले.

logo
marathi.freepressjournal.in