

मुंबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू तथा प्रो गोविंदाच्या तिसऱ्या पर्वाचे ख्रिस गेल, महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती राम शिंदे आणि परिवहन मत्री प्रताप सरनाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत शानदार उद्घाटन करण्यात आले. वरळी येथील एनएससीआय डोम स्टेडियम येथे मोठ्या उत्साहात हा सोहळा पार पडला. यावेळी प्रो गोविंदा लीगचे अध्यक्ष पुर्वेश सरनाईक व इतर मान्यवर उपस्थित होते. तसेच पार्श्वगायक कैलाश खेरच्या गाण्यांनी या सोहळ्याला चारचाँद लावले.
या लीगने पारंपरिक दहीहंडी उत्सवाला व्यावसायिकरीत्या साहसी खेळ म्हणून एक नवी ओळख दिली आहे. महाराष्ट्र शासनाने याला अधिकृत मान्यता दिली असून ही लीग सांस्कृतिक वारसा जतन करते. त्याच वेळी तरुण गोविंदांना त्यांचे कौशल्य दाखवण्यासाठी एक स्पर्धात्मक आणि आधुनिक व्यासपीठ उपलब्ध करून देते. या खेळातून ताकद, शिस्त आणि सांघिक कौशल्य प्रदर्शित केले जाते. गोविंदा या मराठमोळा खेळाला मोठं करण्यासाठी व त्याला हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी मागील दोन वर्षांपासून प्रताप सरनाईक यांच्या पुढाकाराने व पूर्वेश यांच्या नेतृत्वात प्रो गोविंदा स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.
प्रो गोविंदाचे तिसरे पर्व ९ ऑगस्टपर्यंत वरळी येथील डोम स्टेडियममध्ये रंगणार आहे. यावर्षीचे पर्व अधिक भव्य आणि नेत्रदीपक असणार आहे, ज्यात १६ व्यावसायिक संघ, ३२००हून अधिक गोविंदा आपले कौशल्य, सामर्थ्याचे प्रदर्शन करतील. तिसऱ्या पर्वात एकूण दीड कोटींची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत, स्पर्धेत प्रथम पारितोषिक ७५ लाख रुपये, दुसरे पारितोषिक ५० लाख रुपये, तृतीय पारितोषिक २५ लाख रुपये आणि प्रत्येक सहभागी संघांना प्रत्येकी ३ एक लाख रुपये पारितोषिक म्हणून दिले जाणार आहेत.
“गोविंदांची ऊर्जा, त्यांचे संघटन कौशल्य मला प्रचंड भावले. हा केवळ खेळ नाही तर संघटन, परंपरा आणि धैर्याची अभिव्यक्ती आहे. या समृद्ध परंपरेला व्यावसायिकरीत्या संघटित, जागतिक दर्जाच्या क्रीडा लीगमध्ये रूपांतरित करण्यासाठी प्रताप सरनाईक आणि पूर्वेश सरनाईक यांच्या दूरदृष्टी आणि वचनबद्धतेचे मला फार कौतुक वाटते. प्रो गोविंदा लीगमध्ये सहभागी झाल्याचा मला अभिमान आहे,” असे गेल म्हणाला.
“मला आनंद आहे की, मातीतून सुरू झालेला दहीहंडी उत्सव आज प्रो गोविंदाच्या मंचावरून राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचला आहे. मी पाहिलेले स्वप्न पूर्वेश सरनाईक यांनी सत्यात उतरवले. आज प्रो गोविंदाचे तिसरे पर्व आपण साजरा करत आहोत याचा मला अभिमान आहे,” असे प्रताप सरनाईक म्हणाले. तसेच प्रो गोविंदाच्या भक्कमपणे पाठीशी उभे राहिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांचे त्यांनी आभार मानले.
पहिल्या दिवशी १६ संघांनी ताकद, संघटन कौशल्य, समयसूचकता यांचे प्रदर्शन करत उपस्थितांची मनं जिंकली. आता दुसऱ्या दिवशी गुणांकनानुसार आपले सादरीकरण करतील. अंतिम दिवस उत्कंठावर्धक असणार आहे. या दिवशी वाईल्ड कार्ड एन्ट्री, उपांत्यपूर्व, उपांत्य आणि अंतिम सामना रंगणार आहे. प्रसिद्ध संगीत संयोजक सलीम-सुलेमान यांच्या लाईव्ह कॉन्सर्टने तिसऱ्या पर्वाची सांगता होईल.