प्रो कबड्डी लीग : पुणेरी पलटण-हरयाणा स्टीलर्स यांच्यात आज जेतेपदासाठी द्वंद्व

महाराष्ट्राच्या अस्लम इनामदारच्या नेतृत्वात खेळणारा पुणेरी पलटण आणि युवा जयदीप दहियाच्या कर्णधारपदाखाली भरारी घेणारा हरयाणा स्टीलर्स, हे दोन संघ आज प्रो कबड्डी लीगच्या १०व्या हंगामाचे जेतेपद पटकावण्यासाठी आमनेसामने
प्रो कबड्डी लीग : पुणेरी पलटण-हरयाणा स्टीलर्स यांच्यात आज जेतेपदासाठी द्वंद्व

हैदराबाद : महाराष्ट्राच्या अस्लम इनामदारच्या नेतृत्वात खेळणारा पुणेरी पलटण आणि युवा जयदीप दहियाच्या कर्णधारपदाखाली भरारी घेणारा हरयाणा स्टीलर्स, हे दोन संघ आज प्रो कबड्डी लीगच्या १०व्या हंगामाचे जेतेपद पटकावण्यासाठी आमनेसामने येतील. हैदराबादच्या गचीबोवली इनडोअर स्टेडियमवर महाअंतिम फेरीचा थरार रंगणार असून पुण्याने दुसऱ्यांदा, तर हरयाणाने यंदा प्रथमच अंतिम फेरीत धडक मारली आहे.

पुण्याने बुधवारी उपांत्य सामन्यात तीन वेळच्या विजेत्या पाटणा पायरेट्सला ३७-२१ अशी धूळ चारली. गतवर्षी पुण्याला अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला होता. मात्र यंदा ते कोणतीही कसर कमी ठेवणार नाहीत. उपांत्य लढतीत त्यांच्याकडून अस्लम व पंकज मोहित यांनी चढायांचे प्रत्येकी ७ गुण कमावले. तसेच बचावात मोहम्मदरेझा शादलूने ५ गुणांसह छाप पाडली.

दुसऱ्या उपांत्य सामन्यात मनप्रीत सिंगच्या मार्गदर्शनाखाली खेळताना हरयाणाने गतविजेत्या जयपूर पिंक पँथर्सला ३१-२७ असे नमवले. हरयाणाला पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठून देण्यात चढाईपटू विनयने मोलाची भूमिका बजावली. त्याने ११ गुण मिळवले. तसेच शिवम पाठारेने ७, तर बचावपटू आशिषने ४ गुण कमावले.

विजेत्यांना चषकासह ३ कोटी, तर उपविजेत्या संघाला १.८ कोटी देण्यात येणार आहेत. तसेच उपांत्य फेरीतील पराभूत संघांनाही प्रत्येकी ९० लाख रुपये देण्यात येतील.

वेळ : रात्री ८ वाजल्यापासून , थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स वाहिनी आणि हॉटस्टार ॲप

logo
marathi.freepressjournal.in