Pro Kabaddi : प्रो कबड्डीच्या ११व्या हंगामासाठी स्वातंत्र्यदिनी लिलाव; पवन सेहरावत, प्रदीप नरवाल रिंगणात उतरणार

प्रो कबड्डी लीगच्या (पीकेएल) ११व्या पर्वासाठी खेळाडूंची लिलाव प्रक्रिया १५ व १६ ऑगस्ट रोजी मुंबईत पार पडणार आहे.
Pro kabaddi
प्रो कबड्डीच्या ११व्या हंगामासाठी स्वातंत्र्यदिनी लिलाव
Published on

मुंबई : प्रो कबड्डी लीगच्या (पीकेएल) ११व्या पर्वासाठी खेळाडूंची लिलाव प्रक्रिया १५ व १६ ऑगस्ट रोजी मुंबईत पार पडणार आहे. या हंगामासाठी पवन सेहरावत, प्रदीप नरवाल असे तारांकित कबड्डीपटू पुन्हा लिलावाच्या रिंगणात उतरतील. तर पुणेरी पलटणचा अस्लम इनामदार, दबंग दिल्लीचा नवीन कुमार यांसारख्या युवा ताऱ्यांना त्यांच्या संघानी कायम राखले आहे.

एलिट रिटेन्ड प्लेयर्स (ईआरपी) श्रेणीतील २२ खेळाडू, रिटेन्ड यंग प्लेयर्स (आरवायपी) श्रेणीतील २६ खेळाडू आणि विद्यमान नवीन तरुण खेळाडू (ईएनवायपी) मधील ४०खेळाडू अशा एकूण ८८ खेळाडूंना तीन श्रेणींमध्ये कायम ठेवण्यात आले. कायम न राहिलेल्या खेळाडूंमध्ये पवन सेहरावत, परदीप नरवाल, मनिंदर सिंग, फझल अत्राचली आणि मोहम्मद रेझा शादलुई चियानेह यांसारख्या 'स्टार' खेळाडूंचा समावेश आहे, ते मुंबईत होणाऱ्या खेळाडूंच्या लिलावात नशीब आजमावणार आहेत.

Pro kabaddi
श्रीजेशसमोर प्रशिक्षकपदाचा प्रस्ताव, हॉकी संघाचे मायदेशी आगमन

पीकेएल ११च्या लिलावात देशांतर्गत आणि परदेशी खेळाडूंची चार श्रेणींमध्ये विभागणी केली जाणार आहे: अ, ब, क आणि ड श्रेणीतील खेळाडूंची अष्टपैलू, बचावपटू आणि चढाईपटू अशी उपविभागणी केली जाणार आहे. अ-श्रेणीतील खेळाडूंची किंमत ३० लाख, ब-गटातील २० लाख, क-श्रेणीतील खेळाडूंची १३ लाख, तर ड-गटातील खेळाडूंची ९ लाख असेल. ११व्या पर्वातील खेळाडूंच्या पूलमध्ये खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धांच्या दोन अंतिम फेरीतील २४ खेळाडूंसह ५०० हून अधिक खेळाडूंचा समावेश असेल. प्रत्येक फ्रँचायझीला त्यांच्या संघासाठी एकूण पाच कोटी रुपयांची मर्यादा असणार आहे.

२०१४पासून सुरू झालेल्या प्रो कबड्डीचे आतापर्यंत १० हंगाम झाले आहेत. त्यांपैकी गेल्या हंगामात पुणेरी पलटणने विजेतेपद पटकावले. पाटणा पायरेट्सने सर्वाधिक ३ वेळा ही स्पर्धा जिंकलेली आहे. त्यामुळे यंदा कोण बाजी मारणार, याकडे चाहत्यांचे लक्ष लागून असून सध्या लिलावची उत्सुकता आहे.

logo
marathi.freepressjournal.in