गर्व से कहो...

दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटमध्ये प्रथमच भारतीय वंशाच्या आणि तेही हिंदू असलेल्या व्यक्तीला नेतृत्व मिळण्याचा इतिहास घडला आहे
गर्व से कहो...

एखाद्या भारतीयाने परदेशात चमकदार कामगिरी केली किंवा त्याची कुठे महत्त्वाच्या पदावर नियुक्ती झाली की आपल्याला किती अभिमान वाटतो नाही? त्यातही अशी व्यक्ती ही हिंदू असेल तर आणखीनच छाती छप्पन्न इंचाची होते म्हणा ना! त्यातही मग ती व्यक्ती मराठी असेल तर प्रादेशिक अस्मितेलाही झळाळी आल्यासारखे वाटते. अर्थात हा मानवी स्वभावाचाच गुणधर्म आहे. त्यात गैर काहीच नाही. ‘गर्व से कहो...’ म्हणण्यातही चुकीचे काहीच नाही. केवळ ते अन्य धर्मियांना चिडविण्यासाठी नसावे आणि अभिमान बाळगण्यापुरतेच असावे, इतकेच. बिगरहिंदूही भारताचा उल्लेख आवर्जून ‘हिंदूस्थान’ असा करीतच असतातच ना! एकनिष्ठा दृढ होण्यासाठी धर्म, संस्कृती, अस्मिता, परंपरा, जात-पात, पंथ-संप्रदाय, पक्ष-संघटना यांचा अभिमान असलाच पाहिजे. म्हणूनच मग दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी मूळ भारतीय वंशाच्या आणि तेही हिंदू असलेल्या केशव महाराज या खेळाडूची निवड जाहीर झाली, तेव्हा छाती गर्वाने फुगून गेली, खरोखरच!

दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटमध्ये प्रथमच भारतीय वंशाच्या आणि तेही हिंदू असलेल्या व्यक्तीला नेतृत्व मिळण्याचा इतिहास घडला आहे. कट्टर हिंदुत्ववाद्यांना तर 'गर्व से कहो...' चा गर्व बाळगण्यास वाव देणारीच ही घटना आहे, जणू. जुलै महिन्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ इंग्लंड दौऱ्यावर रवाना होणार आहे. उभय संघात टी-२०, वन-डे आणि कसोटी सामने होणार आहेत; पण मर्यादित षटकांच्या क्रिकेट संघाचा कर्णधार टेंबा बावुमा या दौऱ्यावर जाऊ शकणार नाही. त्यामुळे बावुमाच्या जागी केशव महाराज वन-डे आणि डेव्हिड मिलर टी-२० संघाचे नेतृत्व करणार आहेत. टेंबा बावुमा दुखापतीमुळे संपूर्ण इंग्लंड दौऱ्यातूनच आऊट झाला आहे. तेव्हा मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये विजयाचा टेंभा प्रज्वलित करण्याची जबाबदारी आता केशव आणि मिलर यांना मिळून पार पाडावी लागणार आहे. बावुमा दुखापतीमुळे इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय आणि टी-२० सामन्यांच्या मालिकेबरोबरच तीन कसोटी सामान्यांनाही मुकणार आहे. बावो! तो आयर्लंडविरुद्धचे दोन टी-२० सामने देखील खेळू शकणार नाही. बावुमाला जूनमध्ये भारत दौऱ्यावर झालेल्या टी-२० मालिकेत दुखापत झाली होती. क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या माहितीनुसार त्याला पूर्णपणे बरे होण्यासाठी आठ आठवड्यांचा कालावधी लागणार आहे. तोपर्यंत केशव महाराज याला नेतृत्वाचे ओझे वाहावे लागणार आहे. या संधीचे सोने करण्याची हिम्मत केशवला मिळावी, अशीच अपेक्षा सर्व भारतीयांनी बाळगली पाहिजे. मराठी माणसाला आपल्याच देशात कमी लेखण्याची जशी प्रवृत्ती असते, तशीच भारतीयांना कमी लेखण्याची मानसिकता परदेशात असते. अशा प्रवृत्तींना टोला मारल्यासारखे वाटावे म्हणून निदान केशव महाराजला यश मिळण्याच्या शुभेच्छा समस्त भारतीयांकडून मिळायलाच हव्यात. म्हणूनच तर 'यारों सब दुआ करो.. यारों तुम मेरा साथ दो जरा...' असे कळकळीचे आवाहन करावेसे वाटते. केशव महाराज हा काही तसा एकटाच परदेशी संघातील मूळ भारतीय वंशाचा खेळाडू नाही. वेस्ट इंडिज संघात सध्या सुनील नरेन हा जबरदस्त कर्तृत्व गाजवित आहे. न्यूझीलंड संघात एजाझ पटेल देदीप्यमान कामगिरी करीत आहे. एजाझ तर मूळचा मुंबईकरच. त्याने लॉकडाऊननंतर झालेल्या मालिकेत मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर डिसेंबर २०२१ मध्ये दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताच्या पहिल्या डावात सर्वच्या सर्व दहा फलंदाज बाद करण्याचा चमत्कार केला होता. ‘मी मुंबईकर’ म्हणून प्रत्येक मुंबईकराला त्याच्याही बाबतीत मोठा अभिमान असायला हवा. हा सामना भारताने ३७२ धावांनी जिंकला होता, हेही विशेष. पाकिस्तानच्याही संघात अनिल दलपत याचा समावेश करण्यात आला होता. १९८३-८४ मध्ये त्याने कराचीत इंग्लंडविरुध्द कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. पाकिस्तानसाठी तो ९ कसोटी आणि १५ वन-डे सामने खेळला. त्याने या फॉरमॅटमध्ये अनुक्रमे १६७ आणि ८७ धावा केल्या. कसोटीत त्याने २२ झेल टिपले आणि तीन फलंदाज यष्टीचीत केले. वन-डेमध्ये त्याने १३ झेल टिपले आणि दोन फलंदाज यष्टीचीत केले. निवृत्तीनंतर तो कॅनडात उद्योगधंद्याच्या निमित्ताने कुटुंबियांसह स्थायिक झाला, हा भाग वेगळा; पण यष्टीरक्षक-फलंदाज म्हणून त्याची पाकिस्तानसाठी कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी निवड झाली होती, तेव्हा समस्त भारतीयांना किती अप्रूप झाले होते म्हणून सांगू! अनिल दलपत याच्यानंतर दानिश कनेरिया या हिंदू खेळाडूचीही पाकिस्तानच्या संघात निवड झाली होती, तेव्हाही भारतीयांची अशीच काहीशी टाइट कॉलर असल्यासारखी अवस्था होती. २९ नोव्हेंबर २००० मध्ये त्याने इंग्लंडविरुध्द कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. कनेरिया पाकिस्तानसाठी ६१ कसोटी सामने आणि १८ वन-डे सामने खेळला. गुगलीसाठी ओळखल्या जाणाऱ्या दानिशने कसोटीत २६१, तर वन-डेमध्ये १५ विकेट्स मिळविल्या होत्या. २००९ मध्ये झालेल्या स्पॉट फिक्सिंग गैरव्यवहारात सामील असल्याची कबुली त्याने ऑक्टोबर २०१८ मध्ये दिली, तेव्हा मात्र भारतीयांची मान खाली झुकली. केशव महाराजच्या बाबतीत असे वावगे काही घडू नये, हीच सदिच्छा. महाराज शब्दाला आपल्या देशात आणि विशेषत: महाराष्ट्रात अत्यंत पावित्र्य आणि तितकेच महत्त्व आहे. वास्तविक, महाराज हे राज्यकर्त्यांना उद्देशून वापरायचे संस्कृत संबोधन आहे. बॉस अर्थात प्रमुख, नायक यासारख्या प्रभावशाली व्यक्तीबाबतही ते वापरले जाते. त्यातच छत्रपती शिवाजी महाराज हे तर आपले आराध्य दैवत. त्यामुळे क्रिकेटपटू केशवला जर महाराष्ट्राचा इतिहास माहित असेल तर दक्षिण आफ्रिकी संघाचा नायक म्हणून वावरताना त्याने महाराज या शब्दाची शान वाढविण्याचे कसोशीने प्रयत्न केले पाहिजेत. राजकारणाचे काय होईल, ते होवो; पण शिवकालीन इतिहासातील फंद-फितुरीप्रमाणे स्पॉट फिक्सिंगच्या माध्यमातून निदान सद् गृहस्थांचा खेळ समजल्या जाणाऱ्या क्रिकेटमध्ये तरी गैरवर्तन पुन्हा डोके वर काढणार नाही, याची दक्षता केशवने नायक म्हणून काटेकोरपणे घेतली पाहिजे. आपल्याकडे कीर्तनकारांना महाराज संबोधले जाते, तर कीर्तनकारही भाविकांना कीर्तनात अधूनमधून महाराज म्हणून पुकारत असतात. कीर्तनात केवळ सज्जनांचाच मेळा गृहित धरला जात असतो. त्यामुळे या शब्दाचे पावित्र्य आपसुकच राखले जाते. देवाधिकांची किंवा महापुरुषांची नावे असलेल्या व्यक्तींच्या चारित्र्यामुळे मात्र या नावांनाच बट्टा लागल्याचे सर्रासपणे प्रत्ययास येत असते. सामान्यजनांकडून तशी आदर्श वर्तणुकीची अपेक्षाच नसते, मुळी; परंतु सार्वजनिक क्षेत्रात वावरणाऱ्या व्यक्तीकडून मात्र नेहमीच आदर्श प्रतिमेची अपेक्षा ठेवावी लागते. समाज हा अनुकरणप्रिय असतो ना. केशव हा देव, तर महाराज हे दैवत. तेव्हा केशवने होतकरू खेळाडूंना प्रेरक ठरणारा आदर्श निर्माण करावा, हीच अपेक्षा. म्हणूनच गड्या हो, मी म्हणतो केशवसाठी ' यारो सब दुआ करो... ' केशव महाराज हा दक्षिण आफ्रिका संघात तशी चमकदार कामगिरी करीतच आहे; परंतु आता त्याची कर्णधारपदी निवड झाल्याने खास कोडकौतुक आहे. केशवने ३ नोव्हेंबर २०१६ रोजी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने आतापर्यंत कसोटीमध्ये १५० विकेट‌्स घेतले आहेत, तर वन-डेमध्ये २६ विकेटस‌् मिळविले आहेत. कसोटीत त्याने चार अर्धशतकेही झळकविली आहेत. २०२२ मध्ये केशवने जो रूटच्या एका षटकात २८ धावा फटकविल्या होत्या. केशवची ही अभिमानास्पद अशीच कामगिरी आहे. खरे तर अभिमान बाळगण्यात आपण भारतीयच सदैव पुढे असतो. ‘इट हॅपन्स ओन्ली इन इंडिया!’ भारतीयत्त्वाचे हेच अनोखे एक वैशिष्ट्य असावे, कदाचित. दक्षिण आफ्रिकेच्या इंग्लंड दौऱ्याची सुरुवात १९ जुलैपासून पहिल्या वन-डे सामन्याने होणार आहे. केशव महाराजच्या कर्णधारपदाच्या मोहिमेलाही अर्थातच याच दिवसापासून सुरूवात होणार आहे. या केशवसाठी त्याचे सुयश चिंतण्याची अर्जी ‘एक हौस पुरवा महाराज...’ असे सांगत करावीशी वाटते. ‘एवढी अर्जी ऐकावी आज...!’ असे हे आर्जवच आहे, खासच. ‘गर्व से कहो..’चा उद‌‌‌्घोष करताना धर्मनिरपेक्षवाद्यांनी ‘भारतीय’ या पर्यायी शब्दाचा वापर करावा, हवा तर! पण केशव महाराजचा अभिमान जरूर बाळगावा, खचितच. केशव महाराजला यशस्वी नेतृत्त्व करण्यासाठी खूप खूप शुभेच्छा. यशस्वी भव!

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in