पुण्यात उभारणार देशातील पहिले ऑलिम्पिक संग्रहालय! राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवारांची घोषणा

आंतरराष्ट्रीयसह राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील ३३१ पदकविजेत्यांना रोख पारितोषिकाने गौरवून पुण्यात राष्ट्रीय क्रीडा दिन जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी देशातील पहिले ऑलिम्पिक संग्रहालय पुण्यात उभारण्याची घोषणा केली.
पुण्यात उभारणार देशातील पहिले ऑलिम्पिक संग्रहालय! राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवारांची घोषणा
Photo : X (ajit pawar)
Published on

पुणे : आंतरराष्ट्रीयसह राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील ३३१ पदकविजेत्यांना रोख पारितोषिकाने गौरवून पुण्यात राष्ट्रीय क्रीडा दिन जल्लोषात साजरा करण्यात आला. खेलो इंडियासह आंतरराष्ट्रीय खेळाडूंसाठी ५८ कोटींचा अतिरिक्त निधी मंजूर करून रोख बक्षिसे ही खेळाडूंना कष्टाला दिलेली दाद असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले. तसेच देशातील पहिले ऑलिम्पिक संग्रहालय पुण्यात उभारण्याची घोषणाही त्यांनी केली.

पुण्यातील म्हाळुंगे बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलातील वेटलिफ्टिंग सभागृहात महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभाग आयोजित राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त अजित पवार यांच्या हस्ते रोख पारितोषिकाने १३ आंतरराष्ट्रीय, ३१८ राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी 'मिशन लक्ष्यवेध' हाय परफॉर्मन्स सेंटरच्या लोगोचे अनावरण पवार व क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ऑलिम्पिक पदक विजेता स्वप्निल कुसाळे, आमदार बाबाजी काळे, क्रीडा आयुक्त शीतल तेली उगले, सहसंचालक सुधीर मोरे, नामदेव शिरगांवकर, संजय शेटे आदी मान्यवर उपस्थित होते.

सलग दुसऱ्यांदा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पदकांचे द्विशतक झळकावून महाराष्ट्राच्या खेळाडूंनी अभिमानास्पद कामगिरी केली असे सांगून पवार पुढे म्हणाले की, महाराष्ट्राच्या १३ कोटी जनतेच्या वतीने खेळाडूंचे कौतुक होत आहे. रोख पारितोषिके ही त्यांच्या कष्टाला, योगदानाला दिलेली दाद आहे. खेलो इंडियासह इतर खेळाडूंच्या बक्षिसांसाठी ५८ कोटी अतिरिक्त निधी देण्याची क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांची मागणीही आपल्या भाषणात पवार यांनी मंजूर केली. बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात देशातील पहिले ऑलिम्पिक संग्रहालय उभा करण्याचा निर्णय घेतला आहे.

उत्तराखंड येथे फेब्रुवारीत संपन्न झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्रने गौरवशाली कामगिरी केली होती. ५५ सुवर्ण, ७० रौप्य व ७६ कांस्य अशी एकूण २०१ पदके पटकावून सहभागी राज्यांमध्ये प्रथम क्रमांक संपादन केला. या स्पर्धेतील सुवर्ण, रौप्य व कांस्यपदक विजेत्यांना अनुक्रमे ७, ५, ३ लाख रोख बक्षीस दिले गेले. तसेच मार्गदर्शकांना अनुक्रमे ५०, ३० व २० हजारांचे पारितोषिक देण्यात आले. वार्षिक १६० कोटी इतका खर्च असलेल्या मिशन लक्ष्यवेध या महत्त्वाकांक्षी योजनेचा शुभारंभही करण्यात आला. पहिल्या टप्प्यातील सहा क्रीडा प्रकारांच्या प्रशिक्षण योजनेचा शुभांरभशुक्रवारी होईल. यामध्ये अॅथलेटिक्स हॉकी, कुस्ती, वेटलिफ्टिंग, रोईंग व लॉन टेनिस खेळाचा समावेश करण्यात आला आहे.

भारताचे महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी २९ ऑगस्ट या दिवशी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो. ध्यानचंद हे १९२८, १९३२ व १९३६च्या ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या भारतीय हॉकी संघाचे सदस्य होते. त्यामुळेच त्यांच्या सन्मानार्थ हा दिवस देशभरात साजरा केला जातो.

logo
marathi.freepressjournal.in