

नवी दिल्ली : आयपीएलमध्ये मंगळवारी होणाऱ्या लढतीत पंजाब किंग्जचा विजयरथ रोखण्याचे मोठे आव्हान राजस्थान रॉयल्स संघापुढे असेल. मुल्लानपूर येथील स्टेडियमवर रंगणाऱ्या या सामन्यात चाहत्यांचे मात्र भरपूर मनोरंजन होणार असून चौकार-षटकारांची आतषबाजी अपेक्षित आहे.
मार्च महिन्याच्या सुरुवातीला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर टी-२० विश्वचषकाच्या महामुकाबल्यात भारताने न्यूझीलंडचा ९६ धावांनी फडशा पाडला. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारताने एकंदर तिसऱ्यांदा, तर सलग दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम केला. भारताच्या या विश्वविजयात अनेक हिऱ्यांचे मोलाचे योगदान लाभले. भारत हा सलग दोन टी-२० विश्वचषक जिंकणारा तसेच मायदेशात जेतेपद मिळवणारा पहिलाच संघ ठरला. त्यानंतर काही दिवसांच्या विश्रांतीनंतर भारताचे सर्व तारे पुन्हा आयपीएलच्या निमित्ताने मैदानात दिसत आहेत.
२८ मार्चपासून आयपीएलच्या १९व्या पर्वाला प्रारंभ झाला. बहुतांश लढतींमध्ये धावांचा पाठलाग करणारा संघ जिंकला. मात्र गेल्या काही दिवसांत प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांनीही बाजी मारली आहे. त्यामुळे बॅट-बॉलमधील द्वंद्व रंगतदार होत आहे. नाणेफेकीच्या कौलावर विसंबून न राहता कोणत्याही क्षणी सामन्यांची दिशा बदलत आहे. आता प्रत्येक संघाचे किमान ७ ते ८ सामने झाले असून गुणतालिकेचे समीकरण आणखी रंजक होणार आहे. त्यामुळेच आयपीएलचा ज्वर हळूहळू वाढणार आहे.
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात खेळणाऱ्या पंजाबने सातपैकी सहा सामने जिंकले आहेत. गेल्या लढतीत चक्क २६५ धावांचे लक्ष्य पंजाबने गाठले. त्यामुळे त्यांना अद्याप कोणताही संघ रोखू शकलेला नाही. दुसरीकडे रियान परागच्या नेतृत्वात राजस्थानचे फलंदाज फॉर्मात असले, तरी गोलंदाज संघर्ष करत आहेत. गेल्या लढतीत राजस्थानचा संघ हैदराबादकडून पराभूत झाला. त्यामुळे आता विजयपथावर परतण्यासाठी हा संघ उत्सुक असेल. मात्र त्यासाठी त्यांना पंजाबसारख्या कडव्या संघाचे आव्हान पेलावे लागणार आहे.
सँटनरच्या जागी महाराज मुंबईकडे
डावखुरा फिरकीपटू मिचेल सँटनर डोक्यासह खांद्याला झालेल्या दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर गेला आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या केशव महाराजचा मुंबई इंडियन्स संघात समावेश करण्यात आला आहे. महाराज सोमवारीच मुंबईच्या ताफ्यात दाखल झाला आहे. सँटनरला चेन्नईविरुद्ध झेल घेताना दुखापत झाली होती. त्याच्या जागी मुंबईने शार्दूल ठाकूरला कन्कशन खेळाडू म्हणून पाठवले होते. आता मात्र सँटनर स्पर्धेबाहेर गेला आहे.