ऑलिम्पिकमध्ये यंदा जांभळ्या रंगाचे ट्रॅक! स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच प्रयोग; धावपटूंना गती वाढवण्यास अधिक फायदेशीर

ऑलिम्पिक स्पर्धेचे आकर्षण असलेल्या ॲथलेटिक्सच्या शर्यती या आतापर्यंत लाल मातीच्या रंगाने निर्माण केलेल्या सिंथेटिकच्या ट्रॅकवर पार पडतात.
ऑलिम्पिकमध्ये यंदा जांभळ्या रंगाचे ट्रॅक! स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच प्रयोग; धावपटूंना गती वाढवण्यास अधिक फायदेशीर

पॅरिस : ऑलिम्पिक स्पर्धेचे आकर्षण असलेल्या ॲथलेटिक्सच्या शर्यती या आतापर्यंत लाल मातीच्या रंगाने निर्माण केलेल्या सिंथेटिकच्या ट्रॅकवर पार पडतात. पण, पॅरिस ऑलिम्पिक याला अपवाद असेल. या वेळी ऑलिम्पिकमध्ये ट्रॅकचा रंग जांभळा ठेवण्यात आला आहे.

२६ जुलैपासून यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेला प्रारंभ होईल. या स्पर्धेतील ॲथलेटिक्समधील सिथेंटिक ट्रॅक इटलीतील एका कारखान्यात तयार करण्यात आला असून, कारखान्यातील कामगार जातीने लक्ष देऊन हा ट्रॅक मुख्य मैदानावर बसवण्याचे काम करत आहेत. तीन वर्षांपूर्वी झालेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये तीन विश्वविक्रम आणि १२ ऑलिम्पिक विक्रम नोंदवण्यात आले. या वेळचा जांभळा ट्रॅक वेगवान असेल आणि त्यावर अधिक विक्रम नोंदविण्यासाठी धावपटू उत्सुक राहतील असे सांगण्यात येत आहे.

मॉन्डो ही कंपनी १९७६ मॉन्ट्रियल ऑलिम्पिकपासून प्रत्येक उन्हाळी ऑलिम्पिकसाठी ट्रॅक बनवून देत आहे आणि ही प्रथा पॅरिसमध्येही कायम राहिली आहे. डेकॅथलॉन प्रकारातील माजी ऑलिम्पियन ब्लोंडेल म्हणाले, “हा अतिशय चांगला ट्रॅक आहे. फ्रान्स ऑलिम्पिकसाठी निळा, हिरवा असे काही रंग निश्चित केले आहेत. त्यातील जांभळा हा एक रंग आहे.” ११ ऑगस्टपर्यंत यंदाचे ऑलिम्पिक रंगणार आहे.

उद्घाटन सोहळा स्टेडियममध्ये?

  • पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार सीन नदीवर आयोजित पॅरिस ऑलिम्पिकचा उद्घाटन सोहळा सुरक्षेच्या कारणास्तव पुन्हा स्टेडियममध्ये स्थानांतरित केला जाऊ शकतो, असे फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉं यांनी सांगितले.

  • ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिकच्या स्पर्धेच्या निमित्ताने सहभागी देशांच्या खेळाडूंसह लाखो क्रीडाप्रेमी फ्रान्सला भेट देण्याची अपेक्षा आहे. या पार्श्वभूमीवर फ्रान्समध्ये उच्चस्तरीय सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

  • उद्घाटन सोहळा अभूतपूर्व करण्यासाठी फ्रान्सने सीन नदीवर या सोहळ्याचे आयोजन निश्चित केले आहे. यामध्ये बोटीवरून ६ कि.मी. अंतराचे खेळाडूंचे संचलन होणार आहे. हा सोहळा पाहण्यासाठी नदीच्या दोन्ही तटबंदीवर प्रचंड गर्दी अपेक्षित आहे.

logo
marathi.freepressjournal.in