

टोकयो : दोन वेळच्या ऑलिम्पिक पदक विजेत्या पी. व्ही. सिंधूने रविवारी जपान ओपन सुपर ७५० बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्थानिक खेळाडू अकाने यामागुची हिचा सरळ गेममध्ये पराभव करत पहिल्यांदाच या जेतेपदावर नाव कोरले. हे जेतेपद पटकावणारी सिंधू ही पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे.
सिंधूने अत्यंत आक्रमक खेळ करत आणि संयम राखत तीन वेळच्या जागतिक चॅम्पियन यामागुचीचा २१-१७, २१-१७ असा पराभव केला. या विजयासह सिंधूने गेल्या दोन वर्षांहून अधिक काळापासून असलेला जेतेपदाचा दुष्काळ संपवला. तिचे यापूर्वीचे जेतेपद २०२४ मधील सय्यद मोदी इंटरनॅशनल स्पर्धेत मिळाले होते.
विजयानंतर आनंद व्यक्त करताना सिंधू म्हणाली की, मला जपान ओपन जिंकल्याचा खूप आनंद होत असून माझ्याकडे शब्दांची कमतरता आहे. कारण जेतेपद मिळवून तब्बल १९ महिने झाले होते. अंतिम फेरीत खेळणे आणि जिंकून सुवर्णपदकासह पोडियमवर उभे राहणे यात खूप फरक असतो. या विजयामुळे माझा आत्मविश्वास वाढला असून मी माझे प्रशिक्षक, आई-वडील, सपोर्ट स्टाफ आणि पतीची आभारी आहे. २०१९ मधील विश्व अजिंक्यपद स्पर्धेनंतरचे सिंधूचे हे सर्वात मोठे जेतेपद असून तिने २०२२ मध्ये सिंगापूर सुपर ५०० स्पर्धाही जिंकली होती.
जपान ओपनमध्ये यामागुची सहाव्यांदा अंतिम फेरीत खेळत होती, तर सिंधूने गेल्या चार वर्षांत तिच्याविरुद्ध पूर्ण झालेल्या सामन्यात एकदाही विजय मिळवला नव्हता. या वर्षाच्या सुरुवातीला मलेशिया ओपनमध्ये यामागुचीने पहिल्या गेममंतर माघार घेतली होती, तर सिंधूचा तिच्याविरुद्ध पूर्ण सामन्यातील शेवटचा विजय २०२२ मधील थायलंड ओपनमध्ये झाला होता.
सामन्याच्या सुरुवातीला सिंधूने नेटच्या खेळावर पूर्णपणे नियंत्रण ठेवत ३-० अशी आघाडी घेतली, पण यामागुचीने जोरदार पुनरागमन करत ९-९ अशी बरोबरी साधली. मध्यंतरापर्यंत यामागुचीने दोन गुणांची आघाडी घेतली होती, पण ब्रेकनंतर सिंधूने ३६ शॉट्सची रॅली जिंकत सामना ११-११ असा बरोबरीत आणला. त्यानंतर ३८ शॉट्सच्या प्रदीर्घ रॅलीत यामागुचीने उत्कृष्ट बचाव केला, मात्र सिंधूने तणावाच्या क्षणी जबरदस्त क्रॉस-कोर्ट स्मॅश मारत पहिला गेम २१-१७ असा खिशात टाकला.
दुसऱ्या गेममध्ये सिंधूने सुरुवातीपासून वर्चस्व राखत सलग सहा गुण मिळवून ८-३ अशी आघाडी घेतली. यामागुचीने काही चुका करत सिंधूचे गुण वाढवले, पण नंतर खेळ उंचावत फरक १४-१२ असा कमी केला. अखेरच्या क्षणी सिंधूने दोन दमदार स्मॅश मारत सामना आपल्या बाजूने झुकवला. यामागुचीचे परतीचे शॉट्स कोर्टबाहेर गेल्याने आणि व्हिडिओ रिव्ह्यूनंतरही कॉल कायम राहिल्याने सिंधूने २१-१७ ने दुसरा गेम आणि जेतेपद निश्चित केले. विजयानंतर तिने आपल्या प्रशिक्षकाला मिठी मारून आनंद साजरा केला.
तेलंगणा, आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांकडून स्तुती
हैदराबाद : तब्बल दोन वर्षांच्या कालावधीनंतर जेतेपदावर नाव कोरलेल्या पी. व्ही. सिंधूचे तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी स्तुती केली आहे. “कठोर तपश्चर्या, मेहनत, जिद्द आणि गुणवत्तेमुळे सिंधू ही देशातील युवा खेळाडूंसाठी नेहमीच प्रेरणास्थान ठरली आहे. तिने यापुढेही असेच यश संपादन करावे, याच शुभेच्छा,’’ असे रेवंत रेड्डी यांनी म्हटले आहे. “हे जेतेपद भारतीय बॅडमिंटनसाठी अभिमानास्पद आहे. यामागुचीवरील विजयासाठी सिंधूचे मनापासून अभिनंदन. सिंधूला पुढील ऑलिम्पिकसाठी शुभेच्छा,” असे चंद्राबाबू नायडू म्हणाले.