
जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक आणि फलंदाज क्विंटन डी कॉकने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय सोमवारी मागे घेतला. त्यामुळे आगामी पाकिस्तान दौऱ्यासाठी त्याला संघात स्थान देण्यात आले आहे. दुखापतीमुळे कर्णधार टेम्बा बवुमाला कसोटी मालिकेतून वगळण्यात आले आहे.
१२ ते २४ ऑक्टोबर दरम्यान दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यात दोन कसोटी सामने होणार आहेत. लाहोर आणि रावळपिंडी येथे हे कसोटी सामने खेळवले जाणार आहेत.
डी कॉकने २०२४ च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत अखेरचा मर्यादित षटकांचा सामना दक्षिण आफ्रिकेसाठी खेळला होता.
२०२३ च्या विश्वचषक स्पर्धेनंतर या डावखुऱ्या सलामीवीराने एकदिवसीय क्रिकेटला अलविदा केला होता. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचे प्रशिक्षक रॉब वॉल्टर यांनी त्याला टी-२० संघात स्थान दिले नव्हते. त्याच्या भविष्यातील निर्णयाबद्दल माहिती नसल्याने त्याला संघात स्थान मिळाले नसल्याचे सांगण्यात येते.
मात्र संघाचे विद्यमान प्रशिक्षक शुक्री कॉनरड यांनी अलिकडेच त्याच्याशी चर्चा करून क्विंटनला पुन्हा मर्यादित षटकांच्या संघात स्थान दिले आहे.
क्विंटॉनच्या पुनरागमनाने दक्षिण आफ्रिकेच्या संघाची ताकद वाढली आहे. गेल्या महिन्यात त्याच्याशी चर्चा केल्यानंतर देशासाठी काही तरी करण्याचे त्याचे लक्ष्य असल्याचे समजले. त्याच्याकडे असलेली गुणवत्ता सर्वांनाच माहित आहे. त्यामुळे त्याच्या परत येण्याचा फायदा संघाला होणार असल्याचे कॉनरड यांनी सांगितले.
डी कॉकने आतापर्यंत १५५ एकदिवसीय सामन्यांत दक्षिण आफ्रिकेचे प्रतिनिधीत्व केले आहे. त्याने ४५.७४ च्या सरासरीने आणि ९६.६४च्या स्ट्राईक रेटने ६७७० धावा जमवल्या आहेत.
टी-२० क्रिकेटमध्येही डी कॉकने उपयुक्त कामगिरी केली आहे. त्याने ९२ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्यात त्याने १३८.३२च्या स्ट्राईक रेटने २५८४ धावा जमवल्या आहेत.
डी कॉककडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा तगडा अनुभव आहे. त्यामुळे त्याच्या पुनरागमनाने दक्षिण आफ्रिकेच्या मर्यादित षटकांतील संघाची ताकद वाढेल असा अंदाज जाणकार वर्तवत आहेत. फलंदाजी आणि यष्टीरक्षक अशा दोन्ही आघाड्यांवर तो उपयुक्त आहे. त्यामुळे त्याला पुन्हा संघात स्थान दिल्याचे बोलले जाते. यासाठी प्रशिक्षक आणि क्विंटन डी कॉक यांच्यात अलिकडेच चर्चा झाली. त्यात डी कॉकने पुन्हा खेळण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यानंतर त्याला संघात स्थान देण्यात आले आहे.
दुखापतीमुळे बवुमाला वगळले
कसोटी कर्णधार टेम्बा बवुमाला इंग्लंड दौऱ्यात झालेल्या दुखापतीतून तो अजूनही सावरलेला नाही. त्यामुळे पाकिस्तानविरुद्ध कसोटी मालिकेत तो खेळू शकणार नाही. त्याच्या अनुपस्थितीत एडन मार्कराम दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व करेल. टेम्बाबाबत मी खूप चिंतीत आहे, असे कॉनराड म्हणाले.