अपमान केल्यामुळे अश्विनची निवृत्ती? मुलाच्या निर्णयाबाबत वडिलांचा गौप्यस्फोट

भारताचा अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने बुधवारी तडकाफडकी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. मात्र सततच्या अपमानामुळे अश्विनला निवृत्ती पत्करावी लागली, असा गौप्यस्फोट अश्विनचे वडील रविचंद्रन यांनी केला आहे.
अपमान केल्यामुळे अश्विनची निवृत्ती? मुलाच्या निर्णयाबाबत वडिलांचा गौप्यस्फोट
Published on

चेन्नई : भारताचा अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने बुधवारी तडकाफडकी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. मात्र सततच्या अपमानामुळे अश्विनला निवृत्ती पत्करावी लागली, असा गौप्यस्फोट अश्विनचे वडील रविचंद्रन यांनी केला आहे.

३८ वर्षीय अश्विनने १५ वर्षांच्या प्रदीर्घ कारकीर्दीनंतर निवृत्तीचा निर्णय घेतला. मुख्य म्हणजे भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिका सुरू असतानाच अश्विनने तिसऱ्या कसोटीनंतर निवृत्ती जाहीर केल्यामुळे अनेक चाहत्यांना धक्का बसला. तसेच काहींनी संघात सारे काही आलबेल नसल्याचे मत व्यक्त केले. अश्विनची भारतीय संघात जागा बनत नसल्याने त्याने हा निर्णय घेतला असावा, असे चाहत्यांचे म्हणणे आहे.

“अश्विनच्या निवृत्तीविषयी मलाही कल्पना नव्हती. मात्र त्याने ज्याप्रकारे निवृत्ती जाहीर केली, यामागे नक्कीच काहीतरी कारण असावे. कदाचित त्याचा अपमान होत असावा. अश्विनशी शांतपणे संवाद साधल्यावरच मी अधिक भाष्य करू शकेन,” असे रविचंद्रन एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले.

अश्विनला पहिल्या कसोटीत संघात स्थान लाभले नाही. दुसऱ्या कसोटीत गुलाबी चेंडूने संधी मिळाल्यावर त्याला फारशी छाप पाडता आली नाही. त्यामुळे तिसऱ्या कसोटीसाठी अश्विन पुन्हा संघाबाहेर गेला. पुढील २ कसोटींमध्येही कदाचित संघ व्यवस्थापनाला त्याची गरज भासणार नव्हती. तसेच ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर जुलै २०२५ पर्यंत भारतीय संघ एकही कसोटी सामना खेळणार नाही. त्यामुळे तोपर्यंत थांबून राहण्यापेक्षा अश्विनने निवृत्ती जाहीर केली.

“अश्विनचा निर्णय धक्कादायक होता. मात्र अनुभवी खेळाडू असूनही संघाबाहेर बसणे त्याला अपमानास्पद वाटले असावे. यापुढेही त्याला डावलून अन्य खेळाडूंना संधी देण्यात आली असावी. अश्विन व त्याची पत्नी यांनी निवृत्तीच्या निर्णयाविषयी नक्कीच चर्चा केली असेल. त्याच्या निर्णयाचा मला आदर आहे. मात्र त्याने आणखी काही काळ खेळून सन्मानाने निवृत्त व्हावे, अशी माझी इच्छा होती,” असेही वडील रविचंद्रन यांनी सांगितले.

दरम्यान, भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका १-१ अशा बरोबरीत आहे. चौथी कसोटी २६ डिसेंबरपासून मेलबर्नला होणार आहे. उर्वरित कसोटींसाठी दोन फिरकीपटूंची गरज लागल्यास रवींद्र जडेजाच्या साथीने वॉशिंग्टन सुंदरला खेळवण्याचा एकमेव पर्याय भारताकडे आहे.

अश्विन चेन्नईत परतला

बुधवारी निवृत्ती जाहीर केल्यानंतर गुरुवारी दुपारी अश्विन चेन्नईतील राहत्या घरी परतला. यावेळी त्याचे स्वागत करण्यासाठी चेन्नई विमानतळावर चाहत्यांनी गर्दी केली होती. तसेच निवृत्तीच्या निर्णयाविषयी कोणताही खेद नाही, असेही अश्विनने यावेळी सांगितले. “माझा निर्णय चाहत्यांना पचनी पडण्यास काही वेळ लागेल. मात्र गेल्या काही काळापासून हा विचार माझ्या मनात घोळत होता. संघासाठी उपयुक्त नसल्यास थांबून राहणे गरजेचे नाही. तसेच स्वत:चे १०० टक्के योगदान न दिल्यास जागा अडवून बसणे चुकीचे आहे, असे मला वाटले. म्हणूनच मी निवृत्ती पत्करली,” असे ३८ वर्षीय अश्विन यावेळी म्हणाला.

वडिलांच्या म्हणण्याचा अर्थ काढू नका : अश्विन

अश्विन जेव्हा चेन्नईत परतला, तेव्हा त्याच्या वडिलांनी केलेल्या प्रतिक्रियेविषयी समजले. अश्विनने मग ट्विटवरवर याविषयी मत मांडले. वडिलांनी त्यांचे मत मांडले. मात्र हे खरे नसून कुणीही याचा चुकीचा अर्थ काढू नये, असे अश्विन म्हणाला. “माझ्या वडिलांना माध्यमांसमोर कसे बोलावे, याचे ज्ञान नाही. अनावधानाने ते काही तरी बोलून गेले. तुम्ही सर्वांनी त्यांना क्षमा करावी तसेच त्यांना एकटे सोडावे,” असे अश्विनने ट्वीट केले.

हेझलवूड उर्वरित मालिकेतून बाहेर

ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड अपेक्षेप्रमाणे स्नायूंच्या दुखापतीमुळे उर्वरित दोन्ही कसोटींना मुकणार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने गुरुवारी अधिकृतपणे याविषयी घोषणा केली. त्याच्या जागी स्कॉट बोलंडचे संघात पुनरागमन निश्चित मानले जात आहे. उभय संघांत २६ डिसेंबरपासून मेलबर्न येथे चौथी कसोटी खेळवण्यात येईल.

logo
marathi.freepressjournal.in