

ओस्लो : ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने इतिहास रचत अंतिम फेरीत जर्मनीच्या व्हिन्सेंट कीमरवर शानदार विजय मिळवून 'नॉर्वे बुद्धिबळ' स्पर्धेचे विजेतेपद संपादन केले. ही स्पर्धा जिंकणारा तो भारताचा पहिला बुद्धिबळपटू ठरला आहे.
शुक्रवारी अंतिम फेरीची सुरुवात झाली तेव्हा प्रज्ञानंद १५ गुणांसह दुसऱ्या स्थानावर होता. अंतिम सामन्यात त्याने क्लासिकल प्रकारात विजय मिळवून तीन गुणांची कमाई केली. एकूण १८ गुणांसह त्याने या एलिट बुद्धिबळ स्पर्धेच्या सर्वात प्रतिष्ठेच्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले. पाच वेळा वर्ल्ड चॅम्पियन ठरणारा विश्वनाथन आनंद तसेच विद्यमान जगज्जेता डी. गुकेश यांनीही या स्पर्धेचे जेतेपद पटकावता आलेले नाही.
आपल्या कारकिर्दीत दुसऱ्यांदाच 'नॉर्वे चेस' स्पर्धेत खेळणाऱ्या प्रज्ञानंदची सुरुवात संथ झाली होती. मात्र स्पर्धेच्या उत्तरार्धात त्याने सलग चार विजय मिळवून गुणांची कमाई केली. जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या आणि सात वेळा 'नॉर्वे चेस'चे जेतेपद पटकावणाऱ्या मॅग्नस कार्लसनचा क्लासिकल बुद्धिबळात दोनदा पराभव करणे हे या स्पर्धेतील त्याचे सर्वात मोठे यश राहिले.
या वर्षाच्या सुरुवातीला पाफोस येथे झालेल्या कॅन्डिडेट्स स्पर्धेतील निराशाजनक कामगिरीनंतर त्याने दमदार पुनरागमन केले. विद्यमान जागतिक विजेता डी. गुकेश अंतिम टप्प्यात शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर प्रज्ञानंदने भारताचे आव्हान जिवंत ठेवत थेट जेतेपदाला गवसणी घातली.
अंतिम फेरीपूर्वी १५.५ गुणांसह अव्वल स्थानी असलेल्या अमेरिकेच्या ग्रँडमास्टर वेस्ली सो याला अलिरेझा फिरौझाने क्लासिकल गेममध्ये बरोबरीत रोखले. त्यामुळे हा सामना आर्मागेडन टाय-ब्रेकमध्ये गेला. या निकालामुळे प्रज्ञानंदसाठी जेतेपदाचा मार्ग मोकळा झाला. कीमरविरुद्ध क्लासिकल विजय मिळवल्यास आपण गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचू, हे प्रज्ञानंदला माहीत होते. वेस्ली सो याने आर्मागेडन टाय-ब्रेक जिंकला असला तरी त्याला केवळ १.५ गुण मिळाले. त्यामुळे त्याची एकूण गुणसंख्या १७ झाली, जी प्रज्ञानंदच्या १८ गुणांपेक्षा एक गुणाने कमी होती. अंतिम फेरीत जेतेपदाच्या आशेने उतरलेला अलिरेझा १५.५ गुणांसह तिसऱ्या स्थानावर राहिला.
सामन्यानंतर प्रज्ञानंधाने सांगितले की, "चेन्नईतून आईने फोनवर दिलेल्या पाठिंब्यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढला. जून महिना तुझ्यासाठी चांगले नशीब घेऊन येईल. नवीन महिना सुरू होत असल्याने तू नक्कीच चांगली कामगिरी करशील, असे आईने त्याला सांगितले होते."
ही माझ्या कारकिर्दीतील सर्वात मोठी कामगिरी -आर. प्रज्ञानंद
कारकिर्दीतील ही आतापर्यंतची सर्वात मोठी कामगिरी ठरली. जागतिक बुद्धिबळ क्षेत्रातील अव्वल आणि बलाढ्य खेळाडूंचा, विशेषतः महान खेळाडू मॅग्नस कार्लसनचा पराभव केल्यामुळे हे जेतेपद अत्यंत संस्मरणीय ठरले. या स्पर्धेतील खेळाडूंचे सरासरी रेटिंग अत्यंत उच्च दर्जाचे होते आणि अशा कठीण स्पर्धेत विजय मिळवल्याने या जेतेपदाचे महत्त्व अधिक वाढले आहे, असे प्रज्ञानंदने जेतेपदानंतर सांगितले. "नेदरलँड्समधील विज्क आन झी येथे होणाऱ्या 'टाटा स्टील चेस' स्पर्धेत २,६०० रेटिंग असलेले काही खेळाडू असतात. मात्र या स्पर्धेत केवळ जगातील सर्वोत्तम खेळाडूच समोरासमोर होते. त्यामुळे हे जेतेपद पटकावणे अधिक विशेष आहे. त्यातच मॅग्नस कार्लसन या स्पर्धेत खेळत होता आणि मी सलग चार सामने जिंकले. यामुळे निश्चितच हा विजय माझ्या कारकिर्दीत सर्वोच्च स्थानावर राहील, असेही त्याने सांगितले.