टोरंटो : भारताचा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने आपल्यातील अलौकिक प्रतिभेचे दर्शन घडवताना कँडिडेट्स बुद्धिबळ स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत काळ्या मोहऱ्यांनी खेळताना आपला सहकारी विदित गुजराथीला नमवण्याची किमया साधली. डी. गुकेशला मात्र बरोबरीवर समाधान मानावे लागले.
खुल्या विभागात, विदितने दुसऱ्या फेरीत विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात असलेल्या अमेरिकेच्या हिकारू नाकामुराला पराभवाचा धक्का दिला होता. मात्र, त्याला आपली ही लय प्रज्ञानंदविरुद्ध कायम राखता आली नाही. दुसऱ्या फेरीत गुकेशकडून पराभव पत्करावा लागल्यानंतर प्रज्ञानंदने दमदार पुनरागमन केले. त्याने ग्रँडमास्टर बुद्धिबळपटूंमधील लढतीत क्वचितच वापरल्या जाणाऱ्या रुय लोपेझमधील शिमन बचावपद्धतीचा वापर करताना विदितला गोंधळात टाकले. प्रज्ञानंदने चौथ्या चालीतच आपला मोहरा ‘एफ५’वर नेऊन ठेवला. संगणकाने त्याची ही चाल चुकल्याचे म्हटले, पण अखेर हीच चाल निर्णायक ठरली. यानंतर विदितला चाली रचण्यासाठी खूप विचार करावा लागला. त्याने आठवी आणि ११वी चाल रचण्यासाठी जवळपास २० मिनिटे घेतली. त्याला शेवटपर्यंत वेळेचा ताळमेळ साधणे अवघड गेले. अखेर ४५व्या चालीअंती विदितने हार मान्य केली आणि प्रज्ञानंदने स्पर्धेतील पहिला विजय नोंदवला.
दुसरीकडे, गुकेशला जागतिक अजिंक्यपदाच्या गेल्या दोन लढतींतील उपविजेत्या इयान नेपोम्नियाशीला बरोबरीत रोखण्यात यश आले. गुकेशने विजयासाठी प्रयत्न केले, पण नेपोम्नियाशीचा भक्कम बचाव त्याचा भेदता आला नाही. तिसऱ्या फेरीअखेर गुकेश, कारुआना आणि नेपोम्नियाशी प्रत्येकी दोन गुणांसह संयुक्तरीत्या अग्रस्थानी आहेत.
महिलांमध्ये वैशाली विजयी, हम्पीची बरोबरी
महिलांच्या विभागात प्रज्ञानंदची बहीण आर. वैशालीलाही यंदाच्या स्पर्धेतील आपला पहिला विजय नोंदवण्यात यश आले. कोनेरू हम्पीला बरोबरीवर समाधान मानावे लागले. वैशालीने बल्गेरियाच्या नुरग्युल सलिमोवाला पराभूत केले. वैशाली आणि सलिमोवा यंदाच्या स्पर्धेतील सर्वांत युवा महिला बुद्धिबळपटू आहेत. वैशालीच्या कौशल्यपूर्ण खेळाचा सामना करण्यात सलिमोवा अपयशी ठरली. वैशालीने ३३ चालींमध्ये विजय मिळवला. हम्पीला विजयाचे खाते उघडता आले नसले, तरी तिसऱ्या फेरीत तिने टॅन झोंगीला बरोबरीत रोखण्यात यश मिळवले.