सेंट लुईस : भारताचा तारांकित ग्रँडमास्टर बुद्धिबळपटू आर. प्रज्ञानंदने गुरुवारी मध्यरात्री ऐतिहासिक कामगिरी नोंदवली. ग्रँड चेस टूर बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकावणारा पहिला भारतीय ठरण्याचा मान २१ वर्षीय प्रज्ञानंदने मिळवला. महाअंतिम फेरीत प्रज्ञानंदने अमेरिकेच्या फॅबियानो कारुआनाचा जबरदस्त पुनरागमन करत पराभव केला.
सेंट लुईस बुद्धिबळ क्लबमध्ये अखेरच्या दिवसाच्या सुरुवातीला २१ वर्षीय प्रज्ञानंद कारुआनापेक्षा सहा गुणांनी मागे होता. मात्र, चेन्नईच्या या खेळाडूने दोन्ही रॅपिड सामने जिंकून २ गुणांची आघाडी घेतली. त्यानंतरच्या चार ब्लिट्झ सामन्यांमध्ये प्रत्येकी एक विजय आणि दोन सामने बरोबरीत सुटल्याने ही २ गुणांची आघाडी निर्णायक ठरली. अखेर १५-१३ अशा फरकाने सामना जिंकत त्याने २ लाख डॉलरचे (सुमारे १ कोटी ६७ लाख रुपये) बक्षीस आणि पहिल्यावहिल्या ग्रँड बुद्धिबळ टूरच्या विजेतेपदावर नाव कोरले.
या विजेतेपदामुळे प्रज्ञानंदने कारुआना आणि तिसऱ्या स्थानावर राहिलेल्या अमेरिकेच्या वेस्ली सो सोबत पुढील वर्षाच्या ‘ग्रँड टूर’मधील आपले स्थान निश्चित केले आहे. वेस्ली सोने जर्मनीच्या व्हिन्सेंट केमरचा १८-१२ असा पराभव केला. पाचवेळचा जागतिक चॅम्पियन विश्वनाथन आनंदचे प्रज्ञानंदला मार्गदर्शन लाभते.
प्रज्ञानंदने काही दिवसांपूर्वीच आपला धडाका कायम राखत पहिल्यांदाच सेंट लुईस जलद आणि अतिजलद बुद्धिबळ स्पर्धेचे (रॅपिड अँड ब्लिट्झ) विजेतेपद पटकावले आहे. अंतिम फेरी शिल्लक असतानाच प्रज्ञानंदने २३.५ गुणांची कमाई करत जेतेपदावर शिक्कामोर्तब केले होते.
एकूणच गेल्या काही वर्षांत भारताची बुद्धिबळातील प्रगती लक्षणीय आहे. यामध्ये प्रज्ञानंदसह जगज्जेता डी. गुकेश, विश्वचषक विजेती नागपूरची दिव्या देशमुख, आर. वैशाली, कोनेरू हम्पी यांचेही मोलाचे योगदान आहे. २०२४मध्ये भारताने ऑलिम्पियाडचे दुहेरी विजेतेपद मिळवले होते. आता २०२६मध्येही भारताकडून तीच अपेक्षा आहे. तसेच वर्षाखेरीस होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद लढतीत गुकेश जेतेपद कायम राखणार का, हे पाहणेही रंजक ठरेल. १५ सप्टेंबर रोजी समरकंद येथे ऑलिम्पियाडचा उद्घाटन सोहळा पार पडणार असून १६ ते २७ सप्टेंबर दरम्यान ११ क्लासिकल फेऱ्यांमध्ये ही स्पर्धा रंगणार आहे.
मुख्यमंत्र्यांकडून दखल
प्रज्ञानंदच्या ऐतिहासिक कामगिरीची दखल तमिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांनी घेतली आहे. त्याशिवाय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीसुद्धा प्रज्ञानंदसाठी विशेष ट्वीट केले. प्रज्ञानंदने मिळवलेले यश हे त्यामुळेच खास असून भविष्यातही तो असेच यश मिळवत राहील, अशी अपेक्षा आहे.
कामगिरीत सातत्य
स्पर्धेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरूनही प्रज्ञानंदचे या ऐतिहासिक विजयाबद्दल अभिनंदन करण्यात आले आहे. या वर्षाच्या सुरुवातीला प्रज्ञानंदने नॉर्वे चेसचे विजेतेपदही पटकावले होते. तसेच सिंकफिल्ड चषक बुद्धिबळ स्पर्धेत तो दुसऱ्या स्थानी राहिला. कँडिडेट्स स्पर्धेसही प्रज्ञानंद पात्र झाला होता. मात्र त्याला जागतिक अजिंक्यपद लढतीसाठी पात्र ठरता आले नाही. एकूणच वर्षभरात प्रज्ञानंदने सातत्याने चमकदार कामगिरी केली आहे. आता सप्टेंबरमध्ये होणाऱ्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये पुन्हा एकदा त्याच्यासह भारताच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असेल.
प्रामाणिकपणे सांगायचे तर मला विजयाची फारशी आशा नव्हती. फॅबीविरुद्ध दररोज विजय मिळत नाही, पण रॅपिड प्रकारात दोन विजय मिळवणे महत्त्वाचे ठरले.
आर. प्रज्ञानंद
२०२५ : टाटा स्टील स्पर्धेत अजिंक्य
२०२५ : ग्रँड चेस टूर (रोमानिया टप्पा)
२०२६ : नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत जेतेपद
२०२६ : जागतिक जलद व अतिजलद स्पर्धेत विजेतेपद
२०२६ : सेंट लुईस जलद स्पर्धा जिंकली
२०२६ : ग्रँड चेस टूर अंतिम फेरीत बाजी